रविवार १९ फेब्रुवारी २०१२
साचलेल्या पाण्याचे नेहमीच डबके होते, कालांतराने त्यात शेवाळ साचते, घाण आणि चिखल यापलीकडे तिथे काही उरत नाही; परंतु प्रवाहित असलेले पाणी नेहमीच ताजे, स्वच्छ, पारदर्शक असते. आपल्या समाजाचेही असेच डबके होऊ पाहत आहे. विचारांचा प्रवाह कुंठीत झाला आहे, जुन्या रूढी-परंपरा,
त्यांची जळमटे या समाजाचे चित्र अधिकच भेसूर करीत आहेत.
एखादा समाज, एखादे राज्य, एखादे राष्ट्र प्रगत होते आणि एखादा समाज मागास राहतो, राज्य किंवा राष्ट्र अविकसित राहते, असे होण्यामागे मुख्य कारण हेच असते, की बदलत्या युगाची गरज एकाने ओळखली असते आणि दुसरा भूतकाळाच्या, अज्ञानाच्या बेड्यांना आपले अलंकार समजण्याची चूक करीत असतो. समाजाची आपली एक मानसिकता असते, ही मानसिकता लवचिक असेल, तर तो समाज निश्चितच प्रगती करेल; परंतु एखादा समाज पोथीनिष्ठ असेल, तर मात्र तो समोर जाणे, त्याची प्रगती होणे अतिशय दुष्कर ठरते. हिंदू म्हणवून घेणार्या समाजाची या पृष्ठभूमीवर चिकित्सा केली, तर आपल्याला हेच दिसून येते, की या समाजाने विज्ञानवादापेक्षा धर्मवादाला आणि त्या अनुषंगाने येणार्या अनेक प्रथा, परंपरा, चालीरीतींना कवटाळल्यामुळेच जगातील इतर समाजाच्या तुलनेत त्याची म्हणावी तशी प्रगती होऊ शकली नाही. हिंदू समाजाच्या या पोथीनिष्ठ मानसिकतेवर प्रहार करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक लोक आजही तो करत आहेत; परंतु या समाजाने अशा लोकांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना वाळीत टाकणे, त्यांना अनुल्लेखाने मारणे, त्यांची हेटाळणी करणे असेच उद्योग केले.
हिंदू समाजासमोर जळजळीत वास्तव आपल्या थेट शब्दातून मांडणार्या संत तुकारामांना अशाच छळाचा सामना करावा लागला. अशी एखादी विभुती या समाजातील पाखंडावर सडेतोड टीका करू लागली, की त्या व्यक्तीला दोन प्रकारे बाजूला सारले जाते. एकतर त्याला वाळीत टाकले जाते, बहिष्कृत केले जाते किंवा शक्य झाले, तर त्याचा काटाच काढल्या जातो किंवा मग अशा व्यक्तींना देव बनवून त्यांना देव्हार्यात कैद केले जाते. पुढे त्यांच्याच देवत्वाचा बाजार मांडून त्यांचे सडेतोड विचार, त्यांनी समाजासमोर मांडलेले प्रखर सत्य बेमालूमपणे दडपून टाकले जाते. हिंदू समाजाची ही स्थितीशीलता, कोणताही नवा विचार, मग तो कितीही शास्त्रीय असला, तरी सहजासहजी न स्वीकारण्याचा धर्ममुढ अट्टहास या समाजाच्या प्रगतीत नेहमीच बाधक ठरला आहे. जुने ते सोनेच असते, या वेडगळ वैचारिक घुसमटीतून हा समाज आजही बाहेर पडू शकला नाही. या समाजातील ज्या लोकांनी ही कोळीष्टके झुगारून सत्याचा, विज्ञानवादाचा मार्ग चोखाळला तेच खर्या अर्थाने प्रगत होऊ शकले. जिजाऊंच्या काळात सती जाण्याची अशीच एक अनिष्ट आणि मानवतेला कलंक असलेली प्रथा रूढ होती. शहाजी महाराजांच्या निधनानंतर सती न जाता त्यांचे स्वप्न शिवबाच्या माध्यमातून साकारण्याचा जिजाऊंनी निर्णय घेतला आणि पुढचा देदिप्यमान इतिहास उभा झाला. रूढीवादाला बळी पडून जिजाऊंनी सती जाण्याचा निर्णय घेतला असता, तर केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर या देशाचा इतिहास खूप वेगळा राहिला असता. कदाचित आजही आपण कुणाची तरी गुलामीच करीत राहिलो असतो. जिजाऊंनी धाडस दाखविले, त्यांनी कुठलाही पाया नसलेल्या थोतांडाला आव्हान दिले म्हणूनच शिवबा घडू शकले.
आज याचेच आश्चर्य वाटते, की ज्या समाजात जिजाऊंसारखी प्रेरणादायी स्त्री घडून गेली त्याच समाजात स्त्रियांच्या संदर्भात अतिशय अन्यायकारक अशा चालीरीती या एकविसाव्या शतकातही टिकून आहेत. इकडे विज्ञानाने चंद्रावर पाय ठेवला, तर तिकडे अजूनही त्या मातीच्या कोरड्या गोळ्याला देव्हार्यात दिलेले स्थान बदलायला हा समाज तयार नाही. इतर अनेक देशांत, इतर अनेक समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाते, खरेतर ते दिले जात नाही, तर ते असतेच, शेवटी बरोबरीचे किंवा कुठलेही स्थान देणे म्हणजे ते देणार्याची वर्चस्ववादी वृत्ती मान्य करण्यासारखेच ठरते. त्यामुळे अमुक एका समाजात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना स्थान आहे, हे जर कौतुकाने सांगितल्या जात असेल, तर ते अप्रत्यक्षरित्या त्या समाजातील पुरुषांच्या दातृत्वाचे कौतुक करणेच ठरते. हिंदू समाजात मिरविण्यापुरतेही इतके दातृत्व दाखविले जात नाही. स्त्रीचा विनयभंग करणारा पुरुष असतो, दोष त्याचा असतो; मात्र समाज शिक्षा देतो ते त्या स्त्रीला, बदनामी तिची होते, तिच्याचकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जाते. एखाद्या मुलीचे लग्न ठरले आणि नंतर मुलाची काही लफडी समजल्यामुळे त्या मुलीकडच्यांनी ते लग्न मोडले, तर त्यानंतर त्या मुलीचे पुन्हा लग्न जुळणे महाकठीण होऊन जाते. ठरलेले लग्न मोडले म्हणजे एकतर मुलीत काही दोष असावा किंवा तिचे बाहेर कुठेतरी काही असावे, असा निष्कर्ष काढल्या जातो. पुरुषांना वाट्टेल तिथे वाट्टेल तसे शेण खाण्याची मुभा आणि पावित्र्याची सगळी भाकड बंधने मात्र स्त्रियांवर, ही कुठली मानसिकता. आजच्या विज्ञान युगात ही मानसिकता कायम राहू शकते, केवळ कायमच राहत नाही, तर ती अधिक घट्ट होताना दिसते, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती?
विज्ञानवादी दृष्टीकोन समोर ठेवून, तर्काच्या साहाय्याने प्रश्न सोडविणे या समाजाला मान्यच नाही. पोथ्या, पुराणात जे सांगितले आहे तेच सत्य ही या समाजाची मानसिकता! आज जग बदलले आहे, ते अतिशय वेगवान झाले आहे, विज्ञानाने अनेक पाखंडी विचार परास्त केले आहेत, तर्कशास्त्रापुढे अनेक पारंपरिक प्रथांनी शरणागती पत्करली आहे; परंतु हे सगळे मान्य करायला आम्ही तयारच नाही. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर फारतर तीन दिवस दुखवटा पाळून चौथ्या दिवशी आपापल्या कामाला लागण्याची प्रथा किंवा संकेत अनेक समाजात आहेत. त्या समाजाच्या किती पिढ्या नरकात गेल्या आणि तेरा दिवसांचे सुतक, तेरवीचा थाटमाट करणार्या किती लोकांना स्वर्गाची हमी मिळाली, याची काही आकडेवारी कुणी देऊ शकेल का? जिथे तेरा मिनिटे वाया घालविणे परवडण्यासारखे नाही तिथे तेरा दिवस
घरी बसून दु:खाच्या नावाखाली आपण आराम तर फर्मावत नाही ना, याचा विचार का केल्या जात नाही? काळासोबत आपण बदलायला नको का? जे काळासोबत बदलतात तेच काळाच्या प्रवाहात टिकून राहतात आणि तेच प्रगती करतात. ज्यांनी अज्ञानाची, केवळ काही लोकांच्या हितसंबधांला कुरवाळणार्या परंपरांची, अनिष्ट रूढींची झापडे आपल्या डोळ्याला लावून घेतली आहेत त्यांना आजूबाजूचे बदललेले जग दिसणे शक्यच नाही. ज्यांनी ही झापडे झुगारली ते खर्या अर्थाने वैश्विक झाले आणि त्यांनी आपली प्रगती करून घेतली.
साचलेल्या पाण्याचे नेहमीच डबके होते, कालांतराने त्यात शेवाळ साचते, घाण आणि चिखल यापलीकडे तिथे काही उरत नाही; परंतु प्रवाहित असलेले पाणी नेहमीच ताजे, स्वच्छ, पारदर्शक असते. आपल्या समाजाचेही असेच डबके होऊ पाहत आहे. विचारांचा प्रवाह कुंठीत झाला आहे, जुन्या रूढी-परंपरा, त्यांची जळमटे या समाजाचे चित्र अधिकच भेसूर करीत आहेत. या सगळ्याला कुठेतरी छेद द्यायला हवा, आपण तो देऊ शकत नसू तर जे कुणी ही हिंमत करीत आहेत त्यांच्या पाठीशी तरी आपण उभे राहायला हवे. केशवसुतांनी म्हटलेलेच आहे, “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी अथवा पुरूनी टाका….” खरोखरच जाळून, पुरून टाकण्याच्या योग्यतेचे सगळे जुने आपण सोन्यासारखे मिरवित आहोत. ही खोटी श्रीमंती एकदिवस उघडीबोडकी झाल्याशिवाय राहणार नाही.
जुने प्रहार वाचण्याकरिता:फेसबुकवर प्रकाश पोहरे टाईप करा.मोबाईल क्र. – 91-9822593921
— प्रकाश पोहरे
Leave a Reply