आगळ्या अनुभूतींची साहित्यात भर
पुस्तक परिचयः – उदय सातारकर
जेफ्री आर्चर, डॅन ब्राऊन, रेई किमुरा या जगप्रसिद्ध लेखकांच्या साहित्याचे अनुवाद रसिकांच्या भेटीला आले आहेत. आर्चर यांच्या धक्कातंत्राच्या कथा, रेई किमुरा यांच्या समलिगी आकर्षणाची कादंबरी तर डॅन ब्राऊन यांनी चितारलेले सामाजिक राजकीय परिस्थितीचे वास्तव वाचकांना हलवून
सोडते. लीना सोहोनी, अशोक पाध्ये, निर्मला मोने यांच्या सशक्त अनुवादामुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे.
जेफ्री आर्चर यांचा ‘कॅट ओ-नाईन टेल्स’ हा पाचवा कथासंग्रह. या कथासंग्रहातील व्यक्तीचित्रे अत्यंत स्पष्ट, ठसठशीत आणि सशक्त आहेत. कथांचे शेवट वाचकांची मती गुंग करणारे आहेत. जेफ्री आर्चर यांचे नाव जगातील सर्वोत्कृष्ट दहा लेखकांमध्ये होते. त्यांनी अनेक कथा, कादंबर्या, लघुकथा, नाटके लिहिली. त्यांच्या कादंबर्यांवर आधारित दूरवाहिन्यांवर मालिकाही गाजल्या आहेत. त्यांच्या तुरुंगवासातील अनुभवावर आधारित ‘प्रिझनर डायरी’चे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक, धावपटू त्यानंतर उद्योजक, कंपनीचे दिवाळे वाजल्यामुळे दिवाळखोर आणि शेवटी संसदसदस्य, महापौरपदाचे उमेदवार असे विविधांगी जीवन ते जगले. फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवास भोगला आणि त्यांचे जीवन कादंबरीचा विषय होऊन राहिला. तुरुंगातील विविध अनुभवांचे कथाबीज त्यांना मिळाले. त्यांनी या बीजावर साहित्याचा मोठा वृक्ष निर्माण केला.
‘कॅट ओ-नाईन टेल्स’ या कथासंग्रहात बारा कथा आहेत. प्रत्येक कथेचा शेवट अनपेक्षित आहे. ‘द रेड किग’ या कथेत एका संग्राहकाला एका बुद्धीबळाच्या सेटमधील लाल रंगाचा राजा मिळवून देण्यासाठी एक भामटा जीवाचा आटापिटा करतो याची कहाणी आहे. तर मुंबईतील एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलीस कमिशनरच्या आयुष्यावर घडलेली ‘द कमिशनर’ ही कथा वाचकांना थक्क करून सोडणारी आहे. ‘इन द आय ऑफ दी होल्डर’ ही जेफ्री आर्चर यांना सर्वात आवडणारी कथा या संग्रहात आहे. सर्व कथांचे अनुवाद
लीना सोहोनी यांनी अत्यंत समर्थपणे केले आहेत. मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पृष्ठे २१७ असून किमत २०० रुपये इतकी आहे.
‘डिसेप्शन पॉईंट’ ही डॅन ब्राऊन यांची कादंबरी अशोक पाध्ये यांनी भाषांतरीत केली आहे. डॅन ब्राऊन यांच्या ‘द दा विची कोड’, ‘एन्जल्स अॅन्ड डेमन्स’ या कादंबर्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. ‘द दा विची कोड’ या कादंबरीवरील चित्रपटाने जगभरात हंगामा केला. टाईम्स मॅगझीनने जगातील शंभर प्रभावी व्यक्तीपैकी एक म्हणून ब्राऊन यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहीलेल्या कादंबर्यांचे ५१ हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. साहजिकच त्यांच्या ‘डिसेप्शन पॉईंट’ या कादंबरीबद्दल उत्सुकता होती. अशोक पाध्ये यांनी अत्यंत सुंदर अनुवाद करून मराठी वाचकांची अपेक्षा पूर्ण केली आहे. कादंबरीचे कथानक आर्टिकच्या बर्फमय, अत्यंत थंड अशा भूमीवर घडते. या भागात एक उल्का नॅसाला सापडते. विज्ञानातील त्या घटनेमुळे नॅसाला नवसंजिवनी मिळते. कथानक अनेक घटनांच्या घडामोडीतून पुढे सरकत राहते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॅकेल सेक्टनला आर्टिकच्या मोहिमेवर पाठवतात. तो गुप्त माहितीचे विश्लेषण करण्यात हुशार असतो. तो काय करतो हे अत्यंत थरारकपणे कादंबरीत मांडले आहे. तो तिथे गेल्यावर सुरू झालेली खर्याखोट्यांची, वैज्ञानिक फसवणुकींची आणि जनता राष्ट्राच्या लुबाडणुकीची मालिका स्पष्ट होत जाते. राजकारण, सूडसत्र तसेच फसवाफसवीच्या अनेक टप्प्यातून अद्यायावत तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा मागोवा माणसाच्या विचाराच्या पातळ्यांवरुन घेत ही कादंबरी पूर्ण होते.
६०० पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत ५०० रुपये आहे.
‘जॅपनीज मॅग्नोलिया’ हे रेई किमुरा या मूळ जपानी लेखिकेची कादंबरी निर्मला मोने यांनी अनुवादित केली आहे. अत्यंत नाजूक विषय तितक्याच सहज सुंदरतेने मांडत ही कादंबरी वाचकांना कथानकात गुंगवुन ठेवते. किमुरा या व्यवसायाने वकील आहेत. अनेक चांगल्या कादंबर्या त्यांच्या नावावर आहेत. आशियाई आणि युरोपियन भाषांमध्ये त्याचे अनुवादही झाले आहेत. बहुतेक लेखन ऐतिहासिक घटनांवर आधारित असून त्या ऐतिहासिक काळातल्या अनेक घटना, प्रसंग, व्यक्तिमत्व जिवंत करतात. ‘जॅपनीज मॅग्नोलिया’ ही अशीच एक कहाणी आहे. कादंबरीचा विषय समलिगी आकर्षणावर आधारित आहे. या आकर्षणात वाहत गेलेला सामुराई आणि सामान्य शेतकर्याचा मुलगा यांची प्रेमकहाणी वाचकाचे मन हेलावून टाकते. ऐतिहासिक दस्तऐवजातून उलगडत जाणारी ही कादंबरी सुसंस्कृत अशा मार्गाने चरम टप्प्यावर पोहोचते. शेतकर्याचा मुलगा त्याचे आईवडील, पत्नी, सामुराईची कौटुंबिक पार्श्वभूमी दोघांमधील सामाजिक आर्थिक अंतर याचे चित्रण अत्यंत चपखलतेने येत राहते. सामुराई आणि शेतकर्याचा मुलगा या दोघांमधील संबंध अत्यंत संयत पद्धतीने, सुसंस्कृत व्यवहाराने वाचकांसमोर येतात. मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केलेल्या २७५ पृष्ठांच्या या पुस्तकाची किमत २०० रुपये इतकी आहे.
‘त्यांची सिंड्रोमची कथा’ या पुस्तकाच्या लेखिका कल्पना चारुदत्त यांनी लिहिलेले हे मेहता पब्लिशिग हाऊसने प्रसिद्ध केलेले अनुभवकथन. स्वतःची रोगप्रतिकारकशक्ती स्वतःसाठीच घातक ठरवणारा आजार म्हणजे जीबी सिंड्रोम ! चारुदत्त भागवत यांना झालेला हा आजार पत्नी म्हणून अनुभवताना जे अनुभव कल्पना चारुदत्त यांना आले त्यांनी ते या पुस्तकात व्यक्त केले आहेत. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढे पुढे फुफ्फुसं आणि श्वसनलिकेवरही हल्ला करतो. लाखामागे केवळ दोन-तीन जणांना होणारा असा हा आजार. अशा आजाराने पछाडल्यानंतर त्याच्याशी झगडताना चारुदत्त भागवतांना आणि त्यांची पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव, तीव्र मानसिक चढ-उतार आणि त्यातून वाढीला लागलेली श्रद्धा यांचे संवेदनक्षम चित्रण पुस्तकात आढळते. निव्वळ भयंकर आजाराच्या पुढे जाऊन हे कथन वाचकाला शरीर-मनाबद्दल अधिकाधिक प्रगल्भ करते. हॉस्पिटलच्या परिसरातील वातावरण, बरे-वाईट प्रसंग, नर्सेस, सेवक, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक त्याचबरोबर सकाळ,
दुपार, संध्याकाळ, रात्र या काळात झालेल्या भावावस्था तसेच या आजारावर मात करून जेव्हा चारुदत्त
घरी येतात त्यावेळी त्यांच्या आईला झालेला, मुक्या जनावरांनी व्यक्त केलेला आनंद याचे प्रत्ययकारी चित्रण या कथेत पदोपदी दिसून येते. १५७ पृष्ठांच्या या पुस्तकाची किमत १०० रुपये इतकी आहे.
(अद्वैत फीचर्स)
— उदय सातारकर – अद्वैत फीचर्स
Leave a Reply