नवीन लेखन...

जेलची हवा

आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या उक्ती प्रमाणे किंवा बळी तो कान पिळी, या तत्त्वाने प्रत्येक जण वागत आहे. संस्कार, नितीमत्ता, चांगुलपणा असले गुणधर्म फक्त पुस्तकातच बंदीस्त झालेले आहेत. न ते कुणी वाचत, न ते ऐकू येतात न ते सांगितले जातात. लोकांनादेखील असल्या महान तत्त्वज्ञानाचा कंटाळा आलेला दिसतो. कारण एकच. असले तत्त्वज्ञान जीवनात आणले जाऊच शकत नाही, ही धारणा. जर ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तर मग कसला मानसिक धाक उरत नाही. सरकार फक्त नावालाच असल्याचे जाणवते. खा, प्या, मजा करा, मी खूर्चीवर बसतो. मरु द्या इतरांना. ज्यांनी त्यांनी स्वत:ला सांभाळतच जगायच. हाच मंत्र दिला जातो. असल्या बेछुट, बेशरम तत्त्वज्ञानांनी प्रत्येक व्यक्तींनी आपली सत्ता काबीज केली आहे. जर निमीमत्ता, प्रतिष्ठा, सद्‍गुण लोपच पावले असतील तर निर्लजपणाच्या चक्रातच व्यक्ती वावरत असतो.

‘अटक’ अर्थात ‘Arrest’ हा हास्यापद शब्द होऊ पाहात आहे. काही होत नाही त्या संकल्पनेमुळे. ती व्यक्ती पोलीसांच्या संरक्षणात जास्त सुरक्षित राहते. त्यांच्या खाण्या, पिण्याची सर्व गरजांची, दुखल्या-खुपल्याची सोय पद्धतशीर होते. गाडीत फिरणे होते इत्यादी. शिक्षा झाली तर तो जेलमध्ये जातो. कशासाठी फक्त त्याला बंदीस्त करण्यासाठी इतरांपासून दूर करण्यासाठी. “काय तर म्हणे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते.” अभ्यास केला तर वाटते किती हास्यापद हे सांगणे आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळ, ब्रिटीशांचा तो काळ होता. जेव्हा अटक, बंदीस्त व जेलची सजा या संकल्पना होत्या. त्यावेळी किती वेगळी परिस्थिती होती. खरी सजा ही त्यावेळी गुन्हेरागाला मिळे. त्याला छडीचे फटके मारले जात. हे दोन्ही हात पाय ांधून होत असे. एक छडीचा फटका बसला, तर कातडे फाटले जावे, ही जेलच्या शिपायांना समज होती. नसता त्यालाच शिक्षेला वा चौकशीला सामोरे जावे लागे. शिक्षा अत्यंत गंभीरतेने घेतली जात असे. गुन्हेगार हा गुन्हेगारच समजला जाई. त्याच्याकडून सतत कामे करुन घेतली जात. मग ती बाग कामे, शेती, सफाई, रंग-रंगोटी, विणकाम, फर्निचर, कपडे शिलाई, चटया विणणे, सतरंज्या इत्यादी अनेक अनेक हातमाग युक्त होत्या. प्रत्येक कैद्याला व त्यावर नियंत्रण करण्याऱ्याला एक Target दिले जाते व ते पूर्ण करण्याची त्याच्यावर जबाबदारी निश्चित केलेली असे. कैद्यांना कुणासही भेटू दिले जात नसे. फक्त ठराविक काळानंतर एखाद दुसरा भेट घेई. न पत्र न चिठ्ठी संपर्क. संपूर्ण कट केलेला असे.

कैद्याचे तो एकदा ‘गुन्हेगार’ ठरला, की त्याचा शिक्षेचा काळ हा निश्चित होता व तो पूर्ण करीपर्यंत त्याच्या शारिरीक व मानसिक हालाला पर्याय नव्हता. जे मिळेल तेच खावयास मिळे. दुखऱ्या खुपऱ्याकडे ही फारसे लक्ष दिले जात नव्हते. का हे सारे होते? राक्षसी वाटते ना? भयंकर वाटते ना? माणुसकीला सोडून वाटते ना? अन्यायकारक वाटते ना? होय मान्य सारे काही रानटी वाटते. ज्याला सारासार विचार आहे, त्याला हे पटणार नाही. राग येईल.

पण आपण सारेच व्यवहारहीन, भावनाहीन होत चाललो आहे. फुकटचे तत्त्वज्ञान व माणुसकी, प्रेम, दया या भावनांचे पुळके बाळगणारे झालो आहोत. चार माणुसकीचे तत्त्वज्ञानवाचले की आपली मती कुंठीत होते. माणसांनी जनावरांप्रमाणे वागू नये. त्यात माणुसकी, प्रेम, दया या भावना सतत जागृत असाव्या, अत्यंत चांगले व उच्च दर्जाचे हे तत्त्वज्ञान आहे. परंतू असल्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना जग, व्यवहार आपापसातील संबंध हे सारे समजणे अत्यंत गरजेचे असते. चांगले वागण्यास कोणीही विरोध करणार नाही. परंतू जर ते चांगले वागणे या सदरात असेल तर. पण तेच जर राटी, जंगली या सदरात जात असेल तर मात्र त्याच्याशी त्याच पद्धतीने वागणे, त्या वाईटाचा प्रतिकार करणे याला समज, शहाणपण म्हणतात. आईने वा वडील व्यक्तीने शिक्षा केली, थोबाडीत मारले तर त्याचा विचार निश्चित व्हावा. त्यावर विचारणा, सुधारणा व्हावी. परंतु जर कुणी अज्ञात व्यक्तीने तुमच्या थोबाडांत मारली तर त्याच्या बाबतीतही प्रेमाचे गोडवे, दया या आदर्श भावना व्यक्त करणे केवळ बुळेपणाचे लक्षण समजले जाईल. त्यालाच मूर्ख समजतील.

‘पाचामुखी परेश्वर’ हे महान तत्त्वज्ञान आहे. परंतु जर पाच जणाने कुणा अबलेवर अत्याचार केला, बलात्कार केला, तर त्याला तुम्ही काय म्हणता. जीवनात जशास तसे याच पद्धतीने जगण्याचा रिवाज आहे आणि तसेच जगले तरच तुम्ही जगू शकतात. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यानी देखील म्हटले आहे. ” नाठाल्याचे माथी हानू काठी ” . ईश्वरांनी देखील दुष्टांचा नाश करण्यासाठीच जन्म घेतलेला हे सत्य आहे. वाईट प्रवृत्ती सुधारण्याचा प्रयत्न व्हावा. परंतु जर सुधारणा होतच नसतील तर त्याचा संपूर्ण बिमोड करणे हे व्हावे.

आज काल चांगुलपणा, संस्कार, आदर्शवाद याच्या भावना उदाहरणासाठी देखील मिळत नाहीत. यात देवालयाचा परिसर, धार्मिक स्थळे, मंदीर, मशीदे, गुरुद्वारे, शाळा, कॉलेज हे भाग पण अलिप्त राहीले नाहीत. अनेक वाईट गोष्टी अशा परिसरांत होत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.

माझा आपला छोटासा अनुभव. परंतु खुपसे काही सांगणारा वाटतो. मी सेंट्रल जेलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ व्यतीत केला. जे मी जाणले, दिसले, अनुभवले त्याचे चिंतन करण्याची गरज आहे. पूर्वीचा काळ एकदम बदलला आहे.

अर्थात बदल ही काळाची गरज असते. याच्याशी सहमती आहे. परंतू बदल कुणासाठी व का व कोणता याचा देखील विचार होणे आवश्यक आहे.

जेलमधली कागदावर यादी केलेली शिस्त ही फक्त त्या कागदावरच असल्याचे कळते. मुख्य म्हणजे जेलमध्ये आलेले सारे कैदी हे देखील तुमच्या आमच्या प्रमाणेच माणसे आहेत. त्यांना माणुसकी, माणवतावादी दृष्टीकोण याचा संपूर्ण अधिकार आहे. ते जनावेर नाहीत व आपण इतर रानटी नाहीत ही धारणा अत्यंत दृढ व पक्की सर्वांच्या मनात भरलेली आहे. हे सारे त्यांची मानसिकता सुधारावी म्हणून. त्यांनी केलेली चूक ही कदाचित प्रासंगिक असेल त्यांना सुधारण्याचा फक्त प्रयत्न व्हावा. अत्यंत योग्य व मानवतावादी दृष्टीकोण आहे. यात दुमत नाही.

परंतू हीच मंडळी ज्यांनी सर्व नियम, वागण्याच्या तऱ्हा, माणुसकी पायदळी तुडवलेली असते. इतर कुणाचे भयानक नुकसान केलेले असते. काहींनी हत्या, बलात्कार, चोरी, मारामारी या सर्व क्लेशदायक गोष्टी केल्या असतात. आपल्या भावना, लोभ, स्वार्थीपणा, इर्शा, राग इत्यांदीना खतपाणी देत समाजाची प्रकृती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून त्यांना बंदी केलेली असते. त्यांचे सर्व म्हणणे, त्यांचे सर्व विचार, भावना या समजावून घेतल्या असतात. त्यांना त्यांची बाजू व्यक्त करण्यास संपूर्ण मुभा दिलेली असते. सारे होऊनच काही काळासाठी त्यांना सजा व बंदी केलेले असते.

एखाद्या सामान्य माणसापेक्षा या कैद्यांचे जीवन अत्यंत आनंदाचे, समाधानाचे व सुखसोईंनीयुक्त असे वाटते. फक्त चार भिंतीच्या आत राहणे येवढेच बंधन. परंतु जे बाहेर कुणाला सहज मिळत नाही ते त्यांना मिळते. नव्हे ते त्यांना मिळण्याचा जवळ जवळ अलिखीत अधिकार प्राप्त झालेला असतो. चांगले जेवण, चांगले पाणी, चहा, कॉफी व दूध देखील भरपूर प्रमाणात मिळते. जर खाण्यापिण्यात कर्माचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला व चूक झाली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. त्यांना जाब विचारला जातो. चांगली कारवाई होते. कॉलीटी योग्य, योग्य धान्य, फळे, भाजी हे पुरवले जाते. त्याची नियमित वैद्यकीय तपासणी होत असते. त्यात कमतरता पडू दिली जात नाही. जे सामान्यांना बाहेर श्रम करुन देखील संपूर्ण कुटुंबाला जे मिळत नसते ते या कैद्यांना मिळते. याच कारणाने अनेक कैदी सतत बाहेर कोणता तरी गुन्हा करुन तिथे येण्याचा प्रयत्न करतात हे अभ्यासले आहे. बाहेर न नोकरी न धंद्याच्या सोई, न तो करण्याची मोकळीक. पोटभर कमविण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. अनेक प्रशासकीय शिस्तीचा बडगा त्यांच्या भोवती असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे तो फक्त ‘शिस्तीचा, नियमाचा बडगा’ एवढेच हत्यार असते. त्याचा केव्हाच खऱ्या मार्गाने उपयोग केला जात नाही. फक्त धाक आणि तो कशासाठी तर त्या धाकातून होणाऱ्या भ्रष्टाचारासाठी. सर्व केवळ लूटालूट असते.

मग ‘हम सब चोर है’ या तत्त्वांनी ही माणसे बिनधास्त गुन्हे करतात व जेलमध्ये येतात. कशाला भ्यायचे, कुणाला भ्यायचे? हे मूळ प्रश्न त्यांच्याकडे नसतात व का असावे. कारण जर सर्वच चोर असतील म्हणजे काही शाहू, सभ्य तर काही शिरजोर गुंड. कोणतीच नितीमत्तेची रेखा कोठेच आढळत नाही. खानदानी, संस्कारीत, परंपराचे श्रेष्ठत्व हे सारे शब्द इतिहास जमा होवू लागले आहे. मग सारेच बदमाश हरामखोर या सदरांत येवून जातात. जो पकडला गेला तो चोर. जो पडला तोच मुर्ख ठरतो. इतर सारे मान सन्मान प्राप्त, हे बिरुद घेऊन आपल्या मनाला, आत्माला चक्क फसवित जगत असतात.

‘कैदी देखील मानव आहेत’ हे तत्त्वज्ञान A.C रुममध्ये सुरक्षित बसणारे महान व्यक्ती गुणगान करताना दिसतात. त्या दृष्टीने कैद्यांच्या मनाचा मागोवा घेत, जेलचे वातावरण फिरते. त्यांना चांगल्या खाण्या-पिण्या बरोबर परवानगीने त्यांच्या तल्लफींच्या सवयींची काळजी घेतली जाते. नाते संबंधी, मित्र मंडळी यांना नियमीत भेट दिली जाते. सहीली देखील काढल्या जातात. झोपण्यासाठी चांगले पांघरुण दिले जाते. स्नान, स्वच्छतासाठी भरपूर पाणी असते. सर्व प्रकारचे पेपर्स, लायब्ररी, खेळासाठी सर्व साहित्य, रेडीओ, टिव्ही इत्यादी व्यवस्थित असते. कोणत्याही मध्यम वर्गामधल्या व्यक्तीला आपल्या जीवनचक्रात जे मिळते, प्राप्त होते ते सारे सारे त्याला त्यांच्या गरजांना पूर्ण केले जाते. डॉक्टर आहेत, औषध आहे, काय नाही सर्व काही मोफत असते. शिवाय कोणतीच शिक्षा नाही. अंगाला स्पर्शही केला जात नाही. नियमीत सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, नाटक, भाषणे, करमणूक व ज्ञान प्रदान गोष्टी होतात. थोडासा विचार करा जे त्यांना बाहेर कष्ट करुन. मर मर मरुन मिळत नाही ते सर्व फुकट त्यांना मिळते. मग जेल कशासाठी – फक्त चार भिंतीच्या आत ठेवण्यासाठी. बस शब्दांचाच हा खेळ आहे. अटक, बंदीस्त, जेलची हवा इत्यादी, ज्यांना थोडीशी शरम असेल, इज्जत असेल तीच माणसे या शब्दांना घाबरतात. त्यांना महत्त्व देतात. परंतु आजपर्यंत तरी कुणी महाभाग दिसला नाही. जो या बंदीस्तपणाच्या संकल्पनेला दचकून आहे. अनेक पुढारी, नेते, तथाकथीत संतमंडळी, महाराज इत्यांदीनी पण जेलची हवा चाखली व ते तेथेही अत्यंत समाधानी असल्याचे चित्र अनेकांनी बघीतले आहे.

सामान्य नागरीकांच्या पैशावर पोसत असलेली ही बांडगुळे आहेत. जेल म्हणजे काय या संकल्पनेचा विचार करण्याची खरी गरज आहे. गुन्हा, गुन्हेगार व शिक्षा या बंदिस्त त्रिकोणाचा समाजाच्या आरोग्यासंबंधी गंभीरतेने विचार व्हावा. मानव, मानसिकता, दया, प्रेम या भावनिक शब्दांचा खेळ, तीच माणसे करतात. ज्यांना या असल्या गुन्हेगारांचा दुरान्वये संबंध येत नाही. ज्यांचे जळते त्यांनाच कळते म्हणतात.

कोणत्याही शिक्षेत रानटीपणा भयानकता, तिरस्कार वाटेल तशी योजना नसावी. परंतू शिक्षा ही एक धाक, जरब, भीती या भावना स्थापन करणाऱ्या मिश्रीत असाव्यात.

बलात्कार करणाऱ्यालासुद्धा भावना असतात. तो देखील माणूस आहे. चुका करु शकतो. त्यांना पण दया दाखवा. असे बेछूट तत्त्वज्ञान सांगणारे आता बदलत आहे. बलात्कार पीडीत व्यक्तीला न्याय मिळावा असे त्यांना पण वाटू लागलेले आहे. शिक्षा व गरज पडल्यास फाशीची शिक्षा द्या असे लोक म्हणू लागले या कारणाने.

शिक्षा, अटक, जेल याचा खऱ्या अर्थाने पुर्नविचार व्हावा. ती एक गरज आहे. समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..