जेव्हा मला काही लिहावे वाटते
प्रत्येक शब्दाला नटावे वाटते
त्या ईश्वराने पाहिले जेव्हा मला
म्हणतो कसा, माणूस व्हावे वाटते
ती चौकशी, तो स्पर्श, ते कुरवाळणे
दररोज आजारी पडावे वाटते
शहरामध्ये आहे तुझ्या गर्दी तरी
अजुनी तुझ्या सोबत फिरावे वाटते
का झोप येईना मला अजुनी बरे
कोणीतरी जागे असावे वाटते
जगतात हे विकलांग अन् मतिमंदही
त्यांचे जिणे बघुनी जगावे वाटते
मी ज्योत वाढविली पुन्हा गझले तुझी
पुढच्या पिढीला हे कळावे वाटते
संपूर्ण ज्यांनी देश नाही पाहिला
त्यांनाच परदेशात जावे वाटते
जो तो तुझ्या प्रेमामध्ये पडतो प्रदीप
तू रूप कृष्णाचे असावे वाटते
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply