रत्नागिरीच्या एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेले श्रीयुत शाम चिकणे लिहितात
“माझ्या मुलीला बोन मॅरो ट्रांस्प्लांटसाठी पुण्याच्या एका इस्पितळात चार महिने ठेवण्याची आमच्यावर वेळ आली. बोन मॅरो साठी मीच ‘डोनर’ होतो. मोठाच कठीण काळ. सहनशीलतेची परीक्षा घेणारा. हॉस्पिटल मध्ये कष्ट करत असताना आणि आतून चिंतांनी ग्रासलेला असूनही चेहरा सतत हसरा ठेवायची कसरत करायची होती. फ़क्त आणि फ़क्त ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाने या परीक्षेतून मला निभावून नेलं. वाचताना खूप सोपं साधं वाटतं सगळं. पण आयुष्यात जेव्हा असा कठीण काळ येतो तेव्हा शक्ती, ऊर्जा देणारं हे तत्त्वज्ञान आहे.”
आयुष्य म्हणजे सरळ रेषा नव्हे. ECG वर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं असं डॉक्टर म्हणतात. ज्याच्या आयुष्यात चढ उतार आले नाहीत तो तसाही जगला म्हणताच येत नाही. या कठीण काळाला ‘लिमिट’ ही नसतं. सिनेमाच्या अडीच तासा सारखं याला टाईम लिमिट नाही. आणि शेवटी हिरो जिंकणारच याची खात्रीही नाही. किंबहुना जिंकणं आणि हरणं असं काही नसतंच. असतं फ़क्त लढणं. अर्जुनासारखं. कधी शत्रूशी. कधी आप्तांशी. कधी स्वतःशी सुद्धा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी.
मित्रांनो ! ज्ञानेश्वरी म्हणजे पोथी नव्हे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचे निरूपण. जीवनाची सर्व अंगे जीवंतपणे जगणारा गोपाल, दही दुध माखन चोरणारा कन्हैय्या, कंसासारख्या पाप्याला संपवणारा चिरतरूण श्रीकृष्ण ! त्याचे ते विचार! आणि सांगितली ती कोणाला? तर जग जिंकण्याची पात्रता अंगी बाळगणार्या तरूण अर्जूनाला. हे तर तरुणांचेच पुस्तक. हे म्हणजे एक मॅनेजमेंटचे पुस्तकच समजा. लाईफ़ची मॅनेजमेंट. जीवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान.
तेराव्या अध्यायातली ही ओवी बघा.
जर खोल जमिनीत, मुळांना पाणी असे सापडत
असती मग पाने फ़ुले बहरत, बाहेर अर्जुना॥
कोंभाचे टवटवीतपण, सांगे भूमीचे सुपीकपण
तैसे ज्ञान्याचे आचरणावरून, आकळे ज्ञान ॥
माऊली किती सुंदर शब्दांत हे सांगतात. तुमचे आयुष्य बाहेरून जर सुंदर दिसायचे तर त्यासाठी जमीन आणि पाणी म्हणजे ज्ञान. ते ज्ञान स्पष्ट असले पाहिजे. तरच बाहेर त्याचा आविष्कार होईल. ज्ञानेश्वरी केवळ वाचण्यासाठी नाही. शोषण्यासाठी आहे. रिचवण्यासाठी आहे. पचवण्यासाठी आहे.
ज्ञानेश्वरी वाचा. समजा. पचवा. मग आपल्या जीवनातल्या अवघड प्रश्नांना सामोरे जा बरे! बघा. बरेचसे प्रश्न चुटकीसरसे संपून जातील.
ई साहित्य प्रतिष्ठानचे ई ज्ञानेश्वरी अभियान सुरू झाल्यापासून अनेक तरूण मंडळी नेटवर ज्ञानेश्वरी वाचतात. दिवसाला तीन ते चार हजार नवीन वाचक अध्याय वाचतात. काही लोकांना या घटनेचे आश्चर्य वाटते. पण आम्हाला वाटते की ज्ञानेश्वरी ही तरुणांनीच वाचायला हवी. वेळ काळ न बघता. दिवसाला अगदी एक ओवी वाचली तरी चालेल. हे पुस्तक एका तरुणां ने लिहीले आहे ना? मग ते सिनियर सिटिझन्सनीच वाचावे असा आग्रह का?
आम्ही फ़ेसबुकवर रोज एक ओवी प्रसारित करतो. तिल खूप ‘लाईक्स’ मिळतात. त्यावर चर्चा होतात. खुप लोक मनमोकळ्या मेल्स पाठवतात.
अर्थात सव्वा लाख वाचकांतले सर्वच जण इतके उत्साही नाहीत. पण आम्ही ज्ञानेश्वरी सर्वांना देतो. प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी असावी. भले वाचा किंवा नका वाचू. जेव्हा तहान लागेल तेव्हा विहिरीपाशी या. विहीर तुमच्या जवळ आहे. ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान निवृत्तीचं नाहीच. संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही जीवनाशी फ़टकून वागण्याचा सल्ला नाही. कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उपदेश नाही. उलट जीवनाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी ज्ञानेश्वरीतले असंख्य दाखले देता येतील.
माऊली म्हणतात
इंद्रिया न कोंडी, भोगासी न सोडी
अभिमान न सोडी, स्वजातीचा ॥
कुलधर्म ते आचरून, विधीनिषेध ते पाळून
सर्व सुखॆ भोगून, मुक्ती आहे ॥
ज्ञानेश्वरी हे जीवन कसे जगावे याचा दाखला आहे. life management चं हे पुस्तक. ते वाचायला हवं. ते आचरणात आणायला हवं. त्याचा आनंद घ्यायला हवा.
ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.
आज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.
ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.
शुभं भवतु
From time line of Subhash Sharma
खूपच छान सर आहे लेख..मला पण ज्ञानेश्वरी वचायची आहे..आणि तिचा अभ्यास करुन जीवनात अमूलाग्रह बदल घडवायचा आहे..
।।ॐ भगवान ज्ञानेश्वर माऊली।।