संत गाडगेबाबा खानदेशात फिरत होते अंगावर फाटके-तुटके कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर मडके, एका कानात कवडी व हातात एक खापराची येळणी असा अवतार होता त्यांचा. सकाळीच ते एका गावात गेले. गावातील मुख्य मैदान त्यांनी झाडून स्वच्छ केले. तेवढ्यात गाडगेबाबा गावात आल्याची वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर झाली. गावातील माणसे तिथे जमू लागली.
गाडगेबाबांनी सर्व माणसांना बसवले आणि लगेच कीर्तनाला सुरुवात केली.
गोपाला ऽऽऽ गोपाला ऽऽऽ देवकीनंदन गोपाला !
“बाबाहो, दारू पिऊ नका. कर्ज काढू नका. बळी देऊ नका. बकरे, कोंबडे मारून नवस फेडू नका. तुमी अडाणी रायले, पोरायले अडाणी ठेवू नका. त्यांना पाटी पेन्सिल द्या. शाळेत घाला. उपाशी राहा; पण पोराले शिकवा!”
कीर्तन संपले. आता दुपार झाली होती. कसलासा सण असावा. घरोघर तळणाचा वास दरवळत होता. बाबांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. एका
घरासमोर ते भिक्षा घेण्यासाठी उभे राहिले. समोर पाहातात तो त्या घरमालकीणीने पंचपक्वानांनी भरलेले ताट ओट्याजवळ उभ्या असलेल्या
गाईसमोर धरले होते. ती गाईने ते अन्न खावे म्हणून प्रयत्न करीत होती; पण गाय मात्र सारखे तोंड इकडे-तिकडे वळवीत होती आणि गायीने ते सुग्रास अन्न खावे म्हणून बाई हट्टाला पेटली होती.
गाडगेबाबा आणखी जवळ गेले आणि त्या बाईला म्हणाले, “बाई, तुम्ही देत असलेले अन्न जनावराचे नाही, ते माणसाचे अन्न आहे. माणसाचे अन्न तुम्ही जनावरांना का देता! तुमच्या गावात पुष्कळ माणसे उपाशी असतील त्यापैकी कोणाला तरी ते अन्न द्या. समाधानी होईल बिचारा!”
गाडगेबाबांचे ते बोलणे ऐकून ती बाई खजिल झाली. ते ताट घेऊन ती पटकन घरात गेली अन् बाबांना भिक्षा घेऊन आली. ती भिक्षा स्वीकारून गाडगेबाबा दुसरीकडे वळले.
तात्पर्य काय.. तर ज्याचे अन्न त्यालाच द्यावे.
Leave a Reply