![p-34533-prabhudev-sardar](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/03/p-34533-prabhudev-sardar.jpeg)
शुद्धता, शुचिर्भूतता आणि सात्विक वृत्ती ही पं. प्रभूदेव सरदार यांची स्वभाव वैशिष्ट्ये. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२५ रोजी झाला.त्यांच्या दैनंदिन जीवनात जसा या वैशिष्ट्यांचा प्रभाव दिसे, तसाच संगीतशास्त्र, स्वरविद्या, रागविद्या, बंदिशीमध्येही दिसत असे. स्वरांच्या शुद्धतेवर त्यांचा विशेष कटाक्ष असे. आपल्या बजुर्गांनी केलेल्या राग, बंदिशी यांच्या शुद्धतेला त्यांनी विशेष महत्त्व दिले, त्यांचे पावित्र्य जपले. त्याच बरोबर नवनिर्मिती करतानाही मूलतत्वाचा पाया भक्कम ठेवण्याचा गुरुजींचा ध्यास असे. नव्या, जुन्या सर्व शिष्यांना स्वरज्ञानाचे महत्त्व ते वारंवार सांगत. स्वरांचे खास स्थान असते, त्यांना प्रकृती असते, त्यातून तो भाव जिवंत होणे महत्त्वाचे असते. गुरुजी कायम सांगत की, रागांत जिवंतपणा आला पाहिजे. गुरुजींच गाणं हे उत्कट भावनांनी चिंब भिजलेलं असे. पं. प्रभूदेव सरदार हे बेळगांवच्या राणी कित्तूर चन्नमा यांचे सरदार गुरुसिद्धय्या सरदार यांचे थेट वंशज. सरदारांचे मूळ अडनाव चरंतीमठ. पण राणी कित्तूर चन्नमांचे सरदार असल्याने त्यांना ही पदवी मिळाली होती. पं. प्रभूदेव सरदारांचे वडील मडीवाळेश्वतर सरदार हे सोलापूरचा आले व सोलापूरातच ते स्थाईक झाले. सोलापूरकर होऊन गेले. मडीवाळेश्वार सरदार हे बॅरिस्टर होते. सोलापूरचे ख्यातनाम वकिल होते. अनेक वर्षे सरकारी वकील म्हणून काम करूनही त्यांनी गाणे आत्मसात केले. त्यांचा आवाज अत्यंत गोड होता, तो त्यांनी शेवट पर्यंत टिकवून ठेवला होता. वकिलीबरोबरच संगीताची मोठी सेवा त्यांनी केली. “विलोपले मधूमिलनात या’या नाट्य गीतामुळे ते अधिक प्रसिद्धीस आले. पं. प्रभूदेव सरदार यांना आग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहित व जयपूर घराण्याचे पं. निवृत्तीबुवा सरनाईक यासारख्या दिग्गजांकडून तालिम मिळाली. या दोन्ही गुरुंचे पं. प्रभूदेव सरदार हे गंडाबंध शिष्य होते. त्यांच्याकडून त्यांना असंख्य राग शिकायला मिळाले. जगन्नाथबुवांनी प्रचलित रागांबरोबरच राग स्वानंदी, जौन भैरव आदींसारखे अनेक अप्रचलित राग शिकवले. शिवाय ललत रागातील ‘जा जा रे जा रे बलमवा’, नट भैरव रागातील ‘गुंज रही किरत तुम्हरी’, जौन भैरव मधील ‘लाडली री मोरी’ आदी बंदीशी गुरुजींना विशेष प्रिय होत्या. जगन्नाथबुवांनंतर निवृत्तीबुवांकडून भरभरून रागविद्या मिळाली. त्यात प्रचलित रागांप्रमाणेच अप्रचलित, अनवट रागांचा जास्त अंतर्भाव होता. निवृत्तीबुवांनी अनेक सुंदर सुंदर चिजा, प्राचिन व पारंपरिक व जयपूर घराण्याच्या बंदिशी गुरुजींना शिकवल्या. गुरुवर्य पं. प्रभूदेव सरदार म्हणजे रागांचा आणि बंदिशींचा चालता बोलता कोशच होते. अनेक रागांचा व बंदिशींचा प्रचंड खजीना पं.प्रभूदेव सरदारांकडे होता. पं.प्रभूदेव सरदार म्हणजे मैफिलीचे बादशाहच होते. त्यांची मैफल हमखास रंगत असे. मैफिलीत जान आणणे त्यांना सहज साध्य झालेले होते. त्यांची तब्येत लागली नाही असे कधी झाले नाही. मैफिलीत राग शंकरा, बिहाग, दरबारी, मेघ, श्री, मुलतानी, बसंत, तिलककामेद, सरस्वती, पुरियाधनश्री, गौड सारंग, गौड मल्हार, बहार, गुजरी तोडी, बिलासखानी तोडी, भैरव, देसी, जौनपुरी, कौंसी, जैताश्री, सावनी, सुहा, खट तोडी असे राग गाऊन मैफल जिंकण्याची हतोटी त्यांना प्राप्त होती.
पं.प्रभूदेव सरदार यांचा पल्लेदार आवाज तीन सप्तकात लिलया फिरत होता. ते स्वर लावताना स्वच्छ व नैसर्गिकरित्या लावत, मोकळेपणाने लावत. ते कधी आवाजाच्या गोडी करता गळा आवळून लावत नसत किंवा जवारीकरिता आवाज रेकत नसत. त्यांचा स्वर कधी वर वर लागत नसे. आवाज सरळ नाभीतून निघे. मंद्र सप्तकात गंधार, रिषभ, मंद्र षड्ज स्पष्ट व सहज लागत. तार सप्तकात पंचम धैवत पर्यंत स्वर सहज जात असे. त्यांचे झुलते-डुलते बोल रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असत. त्यांच्या आलापीत, बोलात, बोल तानात आणि तानपलट्यातही गमकेचा बाज कायमच असे. त्यामुळे स्वरात कधी तुटकपणा एकेरीपणा येत नव्हता. संथ लयीत चिजेला सुरुवात करुन चिजेचा मुखडा सुंदररित्या बांधून समेवर सहजपणे येत. आक्रमक लयकारी, तालाच्या लग्गीबरोबर स्वरांच्या गमकेची क्रीडा आणि प्रवाही लयीचे मूळ सूत्रं ही जयपूर गायकीची आणि विशेषत: पं. प्रभूदेव सरदारांच्या गायकीची बलस्थाने होती. बंदिशीचा अर्थ, त्यातील भाव, रागांची प्रकृती यांचा लालित्यपुर्ण मिलाप हेच त्यांच्या मैफली रंगण्याचे मर्म होते. गाताना गुरुजी कधीही वेडावाकडा चेहरा, अंगविक्षेप, मुद्राभंग आदी भाव करुन गात नव्हते. त्यांची मुद्रा प्रसन्न व शांत असे. गाताना रसिकांशी ते थेट संवाद साधत.
गुरुजींना उस्ताद आमीर खॉं, पं. मल्लिकार्जुन मन्सूर व पं. कुमार गंधर्व यांच्या बद्दल प्रचंड श्रद्धा व आदर होता. पण त्यांची ही श्रद्धा डोळस होती. उस्ताद अमीर खॉं साहेबांची गायकी त्यांना खूप आवडायची. त्यांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्या गाण्यावर होता. खॉंसाहेबांची संथ आणि अती विलंबीत लयीतील आलापी अतिशय प्रभावी होती. मेरूखंड प्रकारातील सरगम, गमक युक्त ताना ही सर्व वैशिष्ट्ये पं. प्रभूदेव सरदार यांच्या गायकीत होती. अमीर खॉं सोलापूरला आले की, त्यांचा मुक्काम सरदार वाड्यावर असे. खॉंसाहेबांनी बांधलेल्या दरबारी कानडा रागातील ‘किन बैरन कान भरे’, मालकंस मधील ‘जीन के मन राम बिराजे’, ‘आज मोरे घर’, कोमल रिषभ आसावरी रागातील ‘जगत सपना’, ललत रागातील ‘कहा जागे रात’, बैरागी भैरव रागातील ‘मन सुमिरत निस दिन’ अशा अनेक बंदिशी कोणीही अट न घालता उस्ताद अमीर खॉं यांनी पं. प्रभूदेव सरदार यांना दिल्या. पं. प्रभूदेव सरदार ही बहुदा या रागात याच बंदिशी गात असत. जयपूर घराण्याचे पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची गायकीही पं. प्रभूदेव सरदार यांनी विशेष प्रिय होती. मल्लिकार्जुन मन्सूर यांची अफाट दमसास, आकारात्मक आलापी, दमदार गमकयुक्त धृपद अंगाच्या पल्लेदार ताना, आक्रमक व बलपेचांची लयकारी ही जयपूर घराण्याची वैशिष्ट्ये मल्लिकार्जून मन्सूर यांच्या गायकीत ठासून भरलेली असायची. मन्सूरांप्रमाणेच गुरुजींच्या गाण्यातही ही वैशिष्ट्ये पूरेपूर भरलेली होती. अल्लदिया खॉंसाहेबाचे अवघड राग, अनवट राग, जोड रागांचा खजीना पं. मल्लिकार्जुन मन्सूरांप्रमाणेच सरदारांकडेही होता.ते म्हणत, ‘अण्णांच्या (मल्लिकार्जुन मन्सूर) गाण्यात सळसळते चैतन्य भरलेले असे. गाताना रागात अण्णा अक्षरश: बुडून जात होते. दमदार धृपद अंगांच्या ताना, बोलताना, खास जयपूर अंगाची लयकारी ऐकताना मंत्रमुग्ध होतो, वेडावून जातो.’
पं.प्रभूदेव सरदार यांना उस्ताद अमीर खॉ, पं. मल्लिकार्जुन मन्सूर , पं. कुमार गंधर्व, डागर बंधू, उस्ताद सईदुद्दीन डागर, ह्या गायकांनी प्रभावित केले होते. हे गायक प्रभावित करण्याचे मुख्य कारण म्हणजे ख्याल गायनातील शुद्धता. खयाल गायकी बरोबरच शुद्ध शास्त्रिय संगीत प्रकारातील धृपद-धमार गायकी त्यांना आकर्षित करायची. उस्ताद हुसेनोद्दिन डागर, सईदउद्दीन डागर, जहिरउद्दीन डागर, वसिफउद्दीन डागर आदी डागर बंधू, गुंडेचा बंधू यांच्या मैफिली आणि ध्वनीमुद्रीका आवर्जून ते ऐकत. शिवाय निर्मळमनाने इतर गायकांच्या कार्यक्रमांचाही ते आनंद घेत. गजल गायक मेहदी हसन यांच्या गजला त्यांना प्रिय होत्या. त्यात भूपेश्वचरी रागातील ‘अब के हम बिछडे है’ यमन कल्याणमधील ‘रंजीशी सही’, जिंदगी मे तो सभी’, भंखार रागातील ‘खूली जो आँख’, मल्हार रागातील ‘एक बस तु ही’, किरवानी रागातील ‘शोला था जल बुझा हूं’, नटभैरव मधील ‘गो जरा सी बात पर’ या गजला तसेच ‘उमड घुमड घीर आयी रे’ ही ठूमरी, ‘तीर नैनो का’ हा दादरा, मांड रागातील ‘केसरीया बालम’ हे राजस्थानी मंाड ते आवडीने ऐकत. गजल गायिका बेगम अख्तर, मेहदी हसन, बरोबरच परविन सुल्तान, उस्ताद बडे गुलाम अली खॉं यांच्या ही गायन शैलीची ते तारिफ करत. जुन्या गायकांबरोबरच नव्या गायकांनाही तेही ते तिक्याच मनमोकळेपणाने प्रोत्साहन देत. त्यात उस्ताद रशिद खॉं, पं. अजय चक्रवर्ती, पं. मुकुल शिवपुत्र, पं. राजन साजन मिश्र, जगदीश प्रसाद, अश्वितनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर, श्रुती सडोलीकर, व्यंकटेशकुमार यांचा समावेश आहे. पं. प्रभूदेव सरदारांच्या शिष्या मध्ये सुजन साळकर, शाम गुंडावार, दीपक कलढोणे, रमेश कणबसकर, त्यांच्या कन्या मा.पार्वती माळेकोपमठ यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये त्या खूप लोकप्रिय आहेत. त्या आपल्या वडिलांची गायकी त्या तोलामोलाने गातात. मा.प्रभूदेव सरदार यांचे १३ मार्च २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रभूदेव सरदार
उगीच का कांता
https://www.youtube.com/shared?ci=Nokb0KSOAqY
विलोपले मधुमिलनात या
https://www.youtube.com/shared?ci=Ex1EUXJU1Dk
Leave a Reply