झेन गुरु बोकोजू आपल्या शिष्यांना ध्यानधारणा शिकविण्यासाठी जी पद्धत वापरीत असत ती लोकांना थोडी विचित्र वाटे.
एकदा एक राजपुत्र त्यांच्याकडे ध्यानधारणा शिकण्यासाठी आला. बोकोजूंनी त्याला एका उंच झाडावर चढायला सांगितलं.
राजपुत्राचं सारं आयुष्य महालात गेलेलं. झाडावर वगैरे तो कधी चढला नव्हता. शिवाय गुरूने ज्या झाडावर चढायला सांगितले त्याची उंची पाहून तो घाबरला.
बोकोजूंना तो म्हणाला, ‘मला झाडावर चढता येत नाही. पडलो तर?’
बोकोजू त्याला म्हणाले, ‘झाडावर चढता येणार्यांना झाडावरून पडताना मी काही वेळा पाहिलंय, पण झाडावर न चढता येणार्यांना झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना पडलेलं मी अजून पाहिलं नाही. तू चढ बिनधास्त.’
चढावंच लागेल हे लक्षात आल्यावर राजपुत्र झाडावर चढू लागला.
शे-सव्वाशे फूट उंचीचं झाड होतं ते. गुरुजींनी त्याला पार शेंड्यापर्यंत चढायला सांगितलं होतं. अतिशय सावधपणे तो हळू हळू चढू लागला. त्याला वाटलं होतं की आपल्याला चढताना गुरू मार्गदर्शन करतील. असं कर, तसं करू नको असं सांगत राहातील. पण अधून-मधून जेव्हा त्याची नजर खाली जमिनीवर जाई तेव्हा गुरुचं आपल्याकडे लक्षच नाही हे त्याला जाणवे.
शेवटी एकदाचा तो शेंड्यापर्यंत पोहोचला. मग पुन्हा खाली उतरू लागला. गुरु अजूनही डोळे मिटूनच बसले होते.
राजपुत्र जमिनीपासून साधारण पंचवीसेक फुटांवर आला तेव्हा गुरुंनी त्याला सूचना केली, ‘जपून उतर रे!’
राजपुत्र खाली उतरला आणि गुरुजींना त्यानं आपली शंका विचारली.
बोकोजू त्याला म्हणाले, ‘तू जेव्हा बिनधास्त होताना दिसलास तेव्हाच मी तुला सावध केलं. जमीन आता जवळ आली असं जेव्हा तुला वाटलं तेव्हाच तुझा तोल जाण्याची शक्यता वाढली होती. झाडाच्या शेंड्याजवळ असताना तू स्वतःच अतिशय सावध होतास. त्यावेळी तुला माझी गरज नव्हती. जमीन जवळ येऊ लागली तेव्हा तुझी एकाग्रता थोडी ढळू लागली. त्यावेळीच तुझ्याकडून चूक होण्याची शक्यता होती. म्हणून मी तुला सावध केलं.’
राजपुत्राला आठवलं, बोकोजूंचं म्हणणं अगदी बरोबर होतं. झाडावर चढताना,शेंड्याजवळ पोहोचताना आणि उतरावयास सुरवात करताना तो अतिशय सावध होता. जमीन जवळ दिसू लागली आणि त्याचा जीव थोडा फुशारला. आता आपली जीत पक्की असं त्याच्या मनाला वाटलं. उतरल्यानंतर गुरुंना काय काय विचारायचं याबद्दलचे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते आणि झाडावरून उतरण्याच्या क्रियेकडे त्याचं क्षणकाल दुर्लक्ष होऊ लागलं होतं. त्याच वेळी गुरुजींचा आवाज त्याच्या कानांवर आला आणि इकडे-तिकडे भरकटणारं त्याचं मन पुन्हा कामावर केंद्रीत झालं होतं.
हे उमजलं अन गुरुजींबद्दल त्याच्या मनातले सारे प्रश्न विरघळून गेले.
— दीपक गायकवाड
Leave a Reply