अजून उजाडलं ही नव्हतं.
इतक्यात डुकरुची हुसहूस सुरू झाली.
इकडे तोंड खुपस, तिकडचा वास घे.
इकडे लाथा मार, तिकडे लोळण घे.
डुकरुच्या ह्या हुसहुशीमुळे त्याची बाकीची भावंडं पण चाळवली.
डुकरीण आई रागावली. “फर्रऽऽफूऽऽक” करत आईने डुकरूला हाक मारली.
आईचा आवाज ऐकताच, मान खाली घालून डुकरू जोरात धावतच आला.
आईने पटकन त्याला कुशीत घेतलं.
पण डुकरुने आईला अशी काही ढुशी मारली की…
आई आणि डुकरुने चिखलात एक लोळण फुगडी घातली.
डुकरुला प्रेमाने फटका मारत आई म्हणाली,“काय रे हे? पडले ना मी!”
कान उडवत डुकरू चिरचीरत म्हणाला,“आई माझं कालपासून पोट दुखतंय.”
आई म्हणाली,“काल चांगली ताजी-ताजी घाण न खाता, तू गेलास उकीरड्यावर. तिकडे शिळं अन्न खाल्लं असशील.ते तुला बाधलं असेल.
डुकऱ्या पुकऱ्या, मी तुला हज्जारदा सांगितलंय, माणसांकडून एक शिकावं, “ताजं-ताजं खावं, शिळं-शिळं फेकावं.’कळलं.”
डुकरू कळवळत म्हणाला, “अग आयेऽऽ, खाऊ खाऊन नव्हे, तर मार खाऊन माझं पोट दुखतंय! काल मी समोरच्या घरात गेलो होतो.तर त्या माणसाने मलाच काठी मारली ग आई.”
डुकरुच्या पोटावर सावकाश नाक घासत आई म्हणाली,“ह्या शिकल्या-सवरलेल्या माणसांना लहान-मोठं काही कळतंच नाही.
‘छोट्या बाळांना काठी मारू नये’हे पण आम्ही डुकरांनी शिकवायचं की काय ह्या भल्या माणसांना?”
डुकरुची भावंडं म्हणाली,“आई-आई त्या माणसाची मुलं, आपल्या उकीरड्यावर आली ना की आम्ही त्यांना चिखलात पाडणार. त्यांना धपाधप लाथा मारणार!”
डुकरीण आई चिडून म्हणाली,“नाही!नाही!! आपण नाही माणसां सारखं वागायचं. आपण डुक्कर आहोत! डुक्कर!! आपण लहान मुलांना कधीच मारत नाही.कुणालाही लाथा मारत नाही.कुणालही त्रास देत नाही!!
आपण कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही! ”
डुकरुचा लहान भाऊ शेपटी उडवत म्हणाला,“म्हणजे आपण डुकरं त्या दुष्ट माणसांपेक्षा चांगले आहोत ना? आपण….. आपण सगळ्यांचे मित्र आहोत ना!”
आई लहानू डुकरुला कुरवाळत म्हणाली,“हो रे माझ्या डुकऱ्या!
अरे माणसं फक्त घरात राहतात. आपण अख्ख्या गावात राहतो.
माणसं फक्त त्यांचच घर स्वच्छं ठेवतात. आपण तर अख्खा गाव स्वच्छं करतो.
माणसांना खाण्यापिण्याच्या हज्जार खोड्या असतात.हे हवं तर ते नको,हे खा आणि ते फेक! घराचे नुसते उकिरडे करून टाकतात.
आपल्याला कुठल्याच खोड्या नाहीत बघ! आपण मिळेल ते आनंदाने गोड मानून खातो. आपण गावभर फिरतो,उकीरडे फुंकतो.मजेत राहतो.”
‘हां,म्हणूनच,’चवीने खाणार तो डुक्कर होणार!’ असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही!” असं डुकरुच्या भावाने म्हणताच आई खूश झाली!
आईने त्याला प्रेमाने पोटाशी घेतलं आणि मायेने त्याचा कान चाटला.
इतक्यात…
डुकरुचे बाबा तोंडात कुठलसं गवत घेऊन तुडू-तुडू आले.
आईने फुस्स फूस करून त्याचा वास घेतला.मग ते चावून-चावून डुकरुला भरवलं.
तोंड वेडंवाकडं करत,ते गवत खाण्याचा डुकरू प्रयत्न करु लागला.
कसबसं तो ते गीळू लागला.पण त्याला ते काही गिळता येईना.
आईचं लक्ष नाहीसं पाहून डुकरु तोंडातला तो गवताचा चोथा थुकणारच होता.
पण
समोरच शेपटी हलवत बाबा उभे होते!
डोळे बारीक करुन ते त्याच्याकडेच पाहात होते.मग…..
डुकरुने भावाच्या पाठीवर हात ठेवून मान उंच करत,तो गवताचा चोथा कसाबसा गिळला.
थोड्याच वेळात, डुकरुचं पोट दुखणं थोडं कमी झालं. त्याला बरं वाटलं.
जवळच्याच मऊ मऊ बरबरीत,गार गार गुळगुळीत चिखलात डुकरू आडवा झाला.
त्याने हात पाय ताणून आळस दिला.
मस्त मजेत शेपटी तुड-तुड उडवत,शांत पडून राहिला.
इतक्यात त्याच्या बाजूला ‘धप्प’ असा आवाज झाला!
त्याने दचकून पाहिलं.
त्या समोरच्या माणसाच्या मुलाचा चेंडू डुकरूच्या बाजूलाच पडला होता.
तो मुलगा अंगणात उभा राहून डुकरूकडे प्रेमाने पाहात होता.
डुकरुने चेंडूला एकच जोरदार फटका मारला.
चेंडू ऊंऽऽऽऽऽऽच उडाला,आणि…………….
मुलाच्या अंगणातच जाऊन पडला.
मुलाने आनंदाने टाळ्या वाजवल्या! हात हलवून मित्राला शाबासकी दिली!
त्याने आपल्या मित्राकडे पुन्हा चेंडू टाकला…..
डुकरू आणि तो मुलगा आता रोजच हा खेळ खेळू लागले.
ते एकमेकांचे ‘खेळ मित्र’ झाले!!
– राजीव तांबे.
Leave a Reply