|| हरि ॐ ||
उत्तराखंडमधील परिस्थितीचा लेखाजोखा आपण रोज वृत्तपत्रातून वाचतच असतो आणि तेथील रहिवासी आणि पर्यटकांना अजून संकटांचा सामना कशा प्रकारे करावा लागतो हेही बघतो. केंद्र सरकारने याची जाणीव ठेवत १२ व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत संपूर्ण हिमालयीन क्षेत्रात १५ डॉप्लर रडार बसविण्याचा निर्णय घेतला आहे असे दैनिक ‘प्रत्यक्ष’ च्या दिनांक ८ जुलै, २०१३ च्या निशिगंधा खांबे यांनी लिहिलेल्या ‘हिमालयात १५ ठिकाणी ‘डॉप्लर रडार’ यंत्रणा या लेखातून समजले. लेख आवडला.
अशा दुर्गम भागात डॉप्लर रडारची उभारणी फारच महत्वपूर्ण मानण्यात येते. हवामानातील अचानक बदल, ढगफुटीमुळे अतिवृष्टी, बर्फवृष्टी, धुलिकणांचे वादळ किंवा इतर वादळे होणार असतील तर त्याचा अंदाज खूप आधीच येऊ शकतो. त्या शहर/गावं खेडयातील हवामान खाते आपत्ती व्यवस्थापनास याची पूर्व कल्पना देऊन त्या शहर/गावं खेडयात येणार्या प्रलयंकारी पाऊस, वादळ, आणि पुरापासून मनुष्य आणि वित्त हानी टाळू शकते किंवा आधीच उपाय योजना केल्याने कमीत कमी नुकसान होऊ शकतं. निसर्गापुढे माणसाचे काही चालत नाही. यासाठी प्रथम डॉपलर रडारचे कार्य कसे चालते हे थोडक्यात पाहू.
डॉप्लर रडार एका ट्रान्समीटरच्या साह्याने वायुमंडळात मायक्रोव्हेव असलेल्या उर्जेच्या साखळीचे उत्सर्जन करते, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या डायग्राममुळे समजते. वायुमंडळात असलेल्या सर्व वस्तू (दगड, बर्फाचे तुकडे, ढगातील थेंब,पक्षी, किडे, धुळीकण, झाडं इत्यादी) यांना आपटून परत येते. अशा प्रकारे परत येणार्या तरंगांचे विश्लेषण करून हवामानाचा अंदाज लावता येतो. भारतीय हवामान खात्याच्या मते, डॉप्लर रडार ढगफुटी होण्यासंदार्भातील पूर्वानुमान जाणून घेण्याचे उत्तम तंत्र समजले जाते. ढगफुटीचा अंदाज बर्याच वेळी आधी वर्तवणे जरा कठीणच आहे पण हे रडार जे रेडिओ लहरी पाठविते आणि दगड, बर्फाचे तुकडे, ढगातील थेंब,पक्षी, किडे, धुळीकण, झाडं इत्यादी वस्तूंना आपटून परत आल्यावर संगणक त्याचे विश्लेषण करून एक चित्र बनवते.
या प्रणालीने किंवा तंत्रज्ञाने ढगांची घनता, उंची, गती असे सर्व तपासले जाते. याची सर्वात मोठी खुबी ही आहे की हे रडार पाच ते सहा दिवस आधी हवामानाचा अंदाज लावण्यात सक्षम आहे. आत्तापर्यंत उपयोगात असलेली रडार्स केवळ ढगांची माहिती देत होते. या नव्या रडारमुळे ढगांची दिशा, पावसाची क्षमता, ढगांची गती आणि त्यांच्या विषयीची इतर सर्व बारीकसारीक गोष्टींची माहिती आता कळू लागेल. रडारची रेंज (क्षेत्र) अंदाजे ५०० कि.मी. आणि प्रभावी रेंज (क्षेत्र) २५० कि.मी. आहे. याची अंदाजे किंमत दोन मिलियन अमेरिकन डॉलर आहे.
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply