नवीन लेखन...

डोंगर

एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता.
या डोंगरावर वेगवेगळ्या फळांच्या फळबागा होत्या.
सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या.
भाज्यांचे तरारलेले मळे होते.
मलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती.
बागेत थुईथुई उडणारं कारंजं होतं.
या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते.
डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं.
या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते.
तुडुंब भरलेल्या विहिरी होत्या.
एक छोटसं पण काठोकाट भरलेलं तळं होतं. तळ्यात सुळसुळणारे मासे होते.
आणि फक्त पावसाळ्यातच कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा होता.
सगळ्या गावाचं या डोंगरावर फार प्रेम होतं.
गावात आलेले पाहुणे मुद्दामहून हा डोंगर पाहायला जायचे.
पाहुणे जंगलात फिरायचे.
रानमेवा खायचे. विहिरीत पोहायचे.
फळबागेत फळं खाऊन झाडांखाली निवांत झोपायचे.
झऱ्यातलं गोड गार पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे.
डोंगर उतरताना सोबत फळं फुलं घेऊन यायचे.
मुलं बागेत खेळायची.
कारंज्यात भिजायची.
मजा करायची.

सगळे म्हणत हा, तर अजबच डोंगर आहे!

पण. . .
हा डोंगर मात्र मनातून नाराजच होता. बेचैन होता.

डोंगराला वाटे :
छोटी छोटी झाडं मोठी झाली की त्यांचं जंगल होतं. त्यांच्या फळबागा होतात.
लहान लहान झरे मोठे झाले, एकत्र आले की त्यांची नदी होते.
पाणी ऊंच उडू लागलं तर त्याचं कारंजं होतं.
पायवाट मोठी झाली की त्याचा मोठा रस्ता होतो.

पण . . .

आपण कधीच मोठं होत नाही!
आपली कधीच वाढ होत नाही.
आपण सगळ्यांना मदत करायची. सगळ्यांना ऊर्जा पुरवायची.
सगळ्या-सगळ्यांना आनंदी करायचं.
पण तरीही . . .
आपली होते झीज आणि फक्त झीजच!

मी अशाने हळू हळू खचूनच जाईन.
. . . माझी कुणालाच काळजी नाही.
हे असं का? . . .
डोंगर आपल्याच विचारात गढून गेला.

डोंगरावरच्या झाडांना..
डोंगरावरच्या झऱ्यांना..
डोंगरावरच्या रस्त्यांना
डोंगराच्या मनातलं कळलं.
डोंगरावरची झाडं हसली.
झाडं सळसळली.
झाडं म्हणाली,
“अरे डोंगरा, असं काय करतोस? तुझ्यामुळे तर आम्ही आहोत.
आम्ही आमच्या मुळांनी तुला असं घट्ट धरुन ठेवलंय की तुझी होणारच नाही झीज!
आणि हे डोंगरा…
आम्हाला आहे रे तुझी काळजी.
कडक उन्हाळ्यात जेव्हा ऊन तापू लागतं, तेव्हा आम्ही आमची सारी पानं तुझ्यावर अंथरतो आणि आम्ही मात्र . . .
निष्पर्ण होऊन उन्हात तापत राहातो . . अतिशय आनंदाने!
तुझ्या पोटातलं थोडसं पाणी पितो आम्ही, पण तशीच सावली ही देतो तुला.”
हे ऐकून डोंगराचं मन भरुन आलं.
डोंगरावरचा झरा जरा खळाळला.
दगडाजवळ बुडबुडला.
झरा डोंगराला म्हणाला,
“अरे डोंगरा, तुझ्याच अंगाखांद्यावरुन आम्ही वाहतो, बागडतो.
आम्हाला आहेच की तुझी काळजी.
र डोंगरा…
आम्ही म्हणजे, तू पाणी पिऊन तृप्त झाल्यावर टाकलेल्या चुळा.
भर उन्हाळ्यात तुला गारवा वाटावा, म्हणून तर त्यावेळी आम्ही तुझ्या पोटात असतो.
आणि पावसाळ्यात, तुझ्यावरचा सगळा कचरा,गाळ वाहून नेतो.
तुला चांगलं स्वच्छं करतो.
आणि पुढच्या उन्हाळ्यासाठी…
तुझ्यावरच्या विहिरी भरुन ठेवतो. तळं भरुन ठेवतो.”
हे ऐकून डोंगराचे डोळे पाणावले.
डोंगरावरचा रस्ता उधळला.
डोंगराला बिलगला.
रस्ता डोंगराला म्हणाला,
अरे डोंगरा, असं काय करतोस?
अरे आम्ही,तुझ्यावरच चालतो, तुझ्यातुनच वळतो, त्यातुनच वाट काढतो . .
आणि वाटसरुंना वाट दाखवितो.
मग ते फळं खाऊन, पाणी पिऊन समाधानी होतात.
फुलांचा वास घेऊन ताजेतवाने होतात. तव्हा . . .
ते सारे तुझंच कौतुक करतात ना?
तुलाच आशीर्वाद देतात ना?
आम्हीच काय…
पण हा सारा गाव सुध्दा तुझ्यावरच प्रेम करतो ना,रे डोंगरा?
हे ऐकून डोंगराला थोडासाच आनंद झाला!
भल्यामोठ्या डोंगराचा इवलासा आनंद
डोंगरावरच्या झाडांना..
डोंगरावरच्या झऱ्यांना..
डोंगरावरच्या रस्त्यांना समजला.
कसं कुणास ठाऊक..पण
गावातल्या मुलांना पण कळला!
मुले नाचत नाचत डोंगरावर गेली.
बागेत खेळली. मातीत लोळली.
विहिरीत पोहोली.

आणि मग…
फुलबागेतली फुलं घेऊन मुलांनी तो अख्खा डोंगर फुलांनी सजवला!

हे पाहायला सारा गाव जमा झाला.

तेव्हाच डोंगराला मनापासून..
अगदी मनातल्या मातीपासून त्याला खूप आनंद झाला!

सगळे म्हणाले,अजबच आहे हा फूल डोंगर!

— राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..