दक्षिण आशियामध्ये चीनला प्रभाव वाढवायचा आहे. त्यात त्यांना भारताचा अडथळा जाणवत आहे. दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्यासाठी त्यांची अमेरिकेशी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे. यात भारताचे बरेच नुकसान होत असून अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धात भारत होरपळून निघत आहे.
गेल्या काही काळात पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री अधिक घट्ट झाली आहे. विशेषत: अमेरिका आणि भारत यांचे संबंध सुधारल्यानंतर चीनने पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली. या ना त्या कारणाने भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न या दोन देशांकडून केले जातात. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून भारतातर्फे केवळ पत्रव्यवहार केला जातो. भारत कोणतीही कारवाई करत नाही म्हटल्यावर चीनला अधिक चेव चढतो. त्यातच आपल्याकडील कम्युनिस्टही चीनधार्जिणी भूमिका घेत असतात. 1962 मध्ये चीनने आपल्यावर एकदा आक्रमण केले होते. त्यानंतर आजवर आक्रमण केलेले नाही. म्हणून चीनला भारताचा शत्रू मानता येणार नाही. असा कम्युनिस्टांचा तर्क असतो. पाकिस्तान आपला शत्रू असण्याबद्दल मात्र सर्वांचे एकमत आहे, हेही नसे थोडके.
चीनने अरुणाचल प्रदेशवर दावा सांगताना काश्मीरसंदर्भातही वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. हे वर्तन प्रत्यक्ष आक्रमणाएवढेच गंभीर आहे. अतिक्रमण केले म्हणजेच देश शत्रूराष्ट्र ठरतो असे नाही. सध्याच्या काळातली अतिक्रमणे ही वेगळी आहेत. मुख्यत्वे आर्थिक आहेत आणि भूमी काबीज करण्यापेक्षा आर्थिक क्षेत्रातले एकमेकांचे वर्चस्व कमी करण्यासाठी कारवाया करणे आणि दबाव टाकणे हीच युद्धनीती ठरली आहे. या बाबतीत चीन भारतावर प्रचंड वेगाने आक्रमण करत आहे. भारताची मात्र या बाबतीत कायम सुरक्षात्मक उपाययोजना राहिली आहे. सध्या पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट भागामध्ये चीनने 17 प्रकल्प उभे केले आहेत. त्यामध्ये काही महामार्गांचे रुंदीकरण, काही
रस्त्यांची नवी बांधणी, नवीन खाणी सुरू करणे, खंदक बांधणे, पुलांचे बांधकाम, विमानाच्या धावपट्ट्या आदी युद्धाच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रकल्प आहेत. वास्तविक पाहता पाकव्याप्त काश्मीर हा भाग वादग्रस्त असला तरी या वादग्रस्त भागाशी चीनचा काही संबंध नाही. या भागाचा वाद भारत आणि पाकिस्तान या दोघात आहे. तिसर्या देशाने त्या ठिकाणी येऊन अशा प्रकारे युद्धसज्जता करणे हे पूर्णपणे आगाऊपणाचे लक्षण आहे. परंतु, चीन आज जगात लष्करीदृष्ट्या सर्वात वरचढ होण्याच्या
मन:स्थितीत आहे आणि त्याचाच भाग म्हणून या कारवाया चालल्या आहेत.
दुसर्या महायुद्धानंतरच्या काळात रशिया आणि अमेरिकेमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्यावेळी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी तसेच एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी या दोन देशांनी जगातील इतर राष्ट्रांच्या वादांमध्ये हस्तक्षेप करून स्वत:चा प्रभाव वाढवण्याचे धोरण ठेवले होते. तसाच हा चीनचा प्रकार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या वादात हा भाग अशा प्रकारे ताब्यात घेऊन थेट पश्चिम आशियापर्यंत जाण्याचा मार्ग चीन मोकळा करत आहे. चीनला समुद्रकिनार्याची म्हणावी तशी साथ नाही. त्यामुळे चीन अशा प्रकारच्या कारवायांमधून आपल्या पेट्रोलच्या वाहतुकीचे मार्ग मोकळे करत आहे. म्हणजे 1950 च्या दशकानंतर अमेरिकेला भरपूर पेट्रोल मिळावे यासाठी जगाचे राजकारण झाले. तेच आता चीनच्या पेट्रोलसाठी होणार असे दिसायला लागले आहे. मात्र, चीनच्या निमित्ताने सुरू झालेल्या या दबावतंत्राचा थेट परिणाम भारतावर होणार आहे.
जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने चीनला अमेरिकेशी स्पर्धा करायची आहे. तसेच भारताचे आर्थिक वर्चस्व वाढू नये असाही प्रयत्न करायचा आहे. या पुढच्या काळामध्ये चीनला अमेरिकेशी आर्थिक वर्चस्वाची लढाई करायची आहे. या लढाईमध्ये चीनच्या बरोबर कोणी नाही. पण, अमेरिका मात्र चीनशी मुकाबला करण्यासाठी भारताचे सहकार्य घेऊ शकणार आहे. चीनवर थेट दबाव आणायचा असेल तर तो भारताचा शेजारी आहे ही भौगोलिक वस्तुस्थिती अमेरिकेला विचारात घ्यावी लागते. चीनचे भारताच्या समुद्रकिनार्यावरही लक्ष असून बंगालच्या उपसागरात घुसखोरी करण्याचा या देशाचा सतत प्रयत्न राहिला आहे. अशा प्रकारे भारत आणि चीन यांच्यात वैर आहेच, पण अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धातही भारत होरपळून निघत आहे.
भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये आपण नेहमीच वर्चस्व गाजवले. पण, चीनशी युद्ध आपल्याला बरेच जड जाईल. कारण चीनची युद्धतयारी भारतापेक्षा किती तरी अधिक आहे. भारताचे लष्कर सुसज्ज आणि मोठे असले तरी चीनच्या तुलनेत ते कमीच आहे. असे असले तरी दोन्ही देशांना आज युद्ध परवडणार नाही. हे दोन्ही देश विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत आणि युद्ध झाल्यास विकासाच्या प्रक्रियेत मोठी बाधा येऊ शकते. अनेक भारतीय विश्लेषक असे म्हणत असले तरी त्यात तथ्य किती हे सांगता येत नाही. भारताला युद्ध नको हे खरे पण, ते चीनलाही नको आहे असे आपण गृहित धरत आहोत आणि आपल्या मनाचे समाधान करून घेत आहोत. चीनची गूढ राजनीती कोणालाच कळत नाही. भारताला तर मुळीच नाही.
भारताची नवी डोकेदुखी – |
(अद्वैत फीचर्स)
— महेश धर्माधिकारी
Leave a Reply