नवीन लेखन...

ताप आलाय

पूर्ण विश्रांती हाच साध्या तापावरचा परिणामकारक उपाय आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण ताप घालवायला औषधे वापरू लागलो. आपली प्रतिकारशक्ती कमी होत चालली आणि विषाणू मात्र अधिकाधिक प्रबल होत चालले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्सणचा वापरही वाढला आहे. ताप हा खरे तर तापदायक नाही. तो आपल्याला आजाराविषयी सावध करणारा आहे. त्यामुळेच औषधाने ताप दडपून टाकण्याऐवजी त्यामागची कारणे शोधायला हवीत.
पूर्वी पावसाळ्यात सर्दी-तापाच्या रुग्णांत वाढ व्हायची. सर्दी असली की अंगात थोडी कसकस असायची. काही वेळा तापही अंगात असायचा. पण त्याचे काही वाटायचे नाही. साध्या पॅरासिटामॉलने रुग्ण बरे व्हायचे. तुळशीची पाने टाकून गरम पाण्याचा वाफारा आणि सुंठीचा काढाही सर्दीच्या रुग्णांना पुरायचा. पण गेल्या काही वर्षांत आम्हाला तापही तापदायक वाटू लागलाय. प्रदूषण वाढले आहे. व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होते आहे. या पार्श्वयभूमीवर विषाणू मात्र दिवसेंदिवस साध्या औषधांना न जुमानण्याची क्षमता मिळवत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णांना साध्या औषधाने बरे वाटले नाही, तर अँटिबायोटिक्स् देण्याची वेळ येते. पूर्वी ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायला सांगत होतो. आता त्याचबरोबर छातीवर व पोटावरही पट्टी ठेवायला सुचवत आहोत.
वास्तविक ताप हा “आजार’ नाही, तर ते केवळ आजाराचे एक लक्षण आहे. बहुतेक आजारांमध्ये कमी-जास्त प्रमाणात ताप येतच असतो. तापामध्ये सगळ्याच शारीरिक व्यवहारांवर बंधन येत असल्यामुळे “काहीही करून प्रथम ताप कमी करा’ अशी मागणी केली जाते.
ताप येणे चांगले की वाईट? तापामुळे आपल्या एखाद्या अवयव संस्थेची कायमस्वरूपी हानी होऊ शकते का?
“ताप’ येतो म्हणजे काय?
आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 36.8 डिग्रीज सेल्सिअस एवढे असते. त्यात थोडा फरक पडत राहतो. हे तापमान आपल्या शरीरातील हजारो रासायनिक क्रिया कार्यक्षमतेने चालण्यासाठी आवश्याक असते. तापमान वाढले तर या क्रिया अधिक वेगाने होतात. तापमान कमी झाले तर त्या संथावतात. हे तापमान शरीरात उष्णता निर्माण होणे आणि शरीरातून उष्णता बाहेर पडणे या दोन गोष्टींवर अवलंबून राहते. उष्णता अधिक निर्माण झाली किंवा बाहेर टाकण्याची क्रिया संथावली की शरीर अधिकाधिक गरम होते. उलटे झाल्यास शरीर थंड होऊ लागते. तापमान 36.8 एवढे ठेवण्याकरिता आपल्या मेंदूतील हायपोथॅलॅमस हा भाग अहोरात्र कार्यरत असतो. आपल्या त्वचेत उष्णता आणि थंडी यांना जाणणारे स्वीकारक असतात. शिवाय हायपोथॅलॅमसला रक्तपुरवठा होत असतो. त्या रक्ताचे तापमानही हायपोथॅलॅमसच्या पेशींवर परिणाम करते. आपण थंड वातावरणात गेलो की त्वचेतील स्वीकारकाकडून ही माहिती हायपोथॅलॅमसकडे जाते. आता शरीर गरम करण्याची वेळ आहे, असा निर्णय मेंदूत घेतला जातो. मेंदूतून सर्व शरीरावरच्या त्वचेकडे संदेश पाठविले जातात. त्वचेतील रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते व रक्त अंतःस्थ अवयवांकडे वळवले जाते. त्वचेला रक्तपुरवठा कमी झाला की त्वचेतील पेशी गार होतात. हात, पाय, नाक व इतर उघडे भाग गार होतात. ही माहिती परत मेंदूकडे जाते व अधिक उष्णतेची गरज पडते. त्वचेवरील केस उभे केले जातात. त्यामुळे त्वचेभोवती हवा हलत नाही. तेथे हवा स्थिरावते. त्यामुळे हवेचे एक लपेटणे तयार होते. शरीरातून उष्णता बाहेर पडण्याला एक अडथळा निर्माण होतो. एवढ्याने न भागल्यास मेंदूकडून शरीराच्या विविध स्नायूंना इशारा मिळतो. स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होते. त्यालाच आपण हुडहुडी भरणे असे म्हणतो. जबड्याचे स्नायू कार्यान्वित झाले म्हणजे वरचे दात व खालचे दात एकमेकांवर आपटू लागतात. हाताप
ायांचे स्नायू आलटूनपालटून आकुंचन पावू लागले की अंग कापू लागते. पाठीचे स्नायू कापताना आपल्याला दिसत नाहीत, परंतु ते या प्रक्रियेत मोठा भाग घेतात. ताप येऊन गेल्यावर पाठ दुखत राहते. नाडीची गती वाढते. रक्ताचे अभिसरण अधिकाधिक होते. कवटीच्या आजूबाजूचे स्नायू आकुंचित झाल्याने व रक्तवाहिन्यांचे प्रसरण झाल्याने डोके दुखू लागते. ताप हा आपल्या प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग असतो. ज्या रासायनिक क्रिया जंतूंना नामोहरम करतात त्या अधिकाधिक वेगाने होऊ लागतात. साधारणपणे दर एक डिग्री सेल्सिअस इतके तापमान वाढल्यास 13 टक्के अधिक कार्यक्षमतेने या रासायनिक क्रिया होऊ लागतात, असा अंदाज आहे. प्रतिकाराचा भाग असल्याने ताप येणे हा युद्ध अथवा पलायन या प्रतिसादात भाग घेतो.
तापमान स्थिर कसे राहते?
शरीराची उष्णता त्वचेद्वारा बाहेर टाकण्याच्या दोन पद्धती अशा-
1) उष्णता वाहून नेणे (संवहन) ः आपल्या त्वचेचा उघडा भाग एखाद्या कमी तापमानाच्या वस्तूच्या संपर्कात असेल तर शरीराकडून त्या वस्तूंकडे उष्णतेचे वहन होते. उदाहरणार्थ, आपण खुर्चीवर बसलेले असू तर शरीरातील उष्णता खुर्चीकडे वाहून जाईल.
2) घाम येणे ः शरीरात उष्णता वाढल्यावर घाम येतो. त्याचे बाष्पीभवन होऊन त्वचेचे तापमान कमी होते. त्वचेचे तापमान कमी झाले की आतली उष्णता रक्ताद्वारा त्वचेपर्यंत आणली जाते. त्वचेतील रक्तवाहिन्यांतला रक्तप्रवाह वाढतो आणि अधिकाधिक रक्त त्वचेपर्यंत पोचून उष्णता बाहेर टाकली जाते. एवढ्या साऱ्या यंत्रणा कार्यरत असताना शरीराचे तापमान वाढून ताप का येतो?
ताप म्हणजे काय?
शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाणे म्हणजे ताप होय. साधारणपणे केव्हाही शरीरातील चयापचयाचा वेग वाढला की शरीरात उष्णता वाढते (उदा.- व्यायाम केल्यावर किंवा अति तणावपूर्ण मनःस्थिती, इत्यादी) पण रूढार्थाने ज्याला ताप म्हणतात तो हा नव्हे. कारण यात उष्णता शरीराबाहेर टाकली जात असते आणि तापमाननियंत्रक यंत्रणा योग्य पद्धतीने कार्य करत असते. सर्वसाधारणपणे येणारे ताप विषाणू किंवा जीवाणू यांच्यामुळे येतात. या जीवाणू-विषाणूंचे काही भाग शरीरात गेल्यावर त्यांना नष्ट करण्याची क्रिया सुरू होते. अनेक जीवाणू दूषित रासायनिक रेणू तयार करतात, त्यांना एण्डोटॉक्सिुन्स म्हणतात. या एण्डोटॉक्सिषन्सचा अतिसूक्ष्म डोसदेखील माणसाला ताप आणवू शकतो.
आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सायटोकाइन्स नावाचे सूक्ष्म प्रथिनांचे रेणू. आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीमध्ये हे रेणू महत्त्वाची भूमिका बजावतात. सायटोकाइन्सचे बरेच प्रकार असतात, परंतु शरीरात ताप आणविण्याच्या प्रक्रियेत हे रेणू खूप महत्त्वाची कार्ये करतात. टायपोथॅलॅमसमधील तापमानावर ताबा ठेवणाऱ्या यंत्रणेवर सायटोकाइन्सचा परिणाम होतो व शरीराचे तापमान वाढविले जाते. ताप हा प्रतिकाराचा महत्त्वाचा भाग असल्याने तो काहीही करून उतरविण्याच्या उपचारांचा अधिक विचारपूर्वक वापर करणे इष्ट असते. ताप बहुतेक वेळा विषाणूंमुळे येतो. तो निसर्गक्रमाने आपोआप उतरणारा असतो. दर तापामध्ये ताप उतरवण्यासाठी औषध घेणे आवश्योक नसते, इष्ट नसते. साध्या तापावर तीन दिवस पूर्ण विश्रांती हाच अधिक परिणामकारक उपाय आहे.
ताप उतरवण्यासाठी दिलेल्या औषधाने तापाचा नैसर्गिक चढउतार आखला जातो, त्याप्रमाणे तापाच्या कारणाचे निदान अस्पष्ट केले जाते. या उपचारांनी खूप घाम सुटतो. त्यामुळे शरीरातून पाणी व क्षार यांचा निचरा होतो. थकवा वाढतो. औषधांचा परिणाम उतरला की परत ताप भरतो. दर वेळी ताप भरताना स्नायूंचे आकुंचन होते. ऊर्जा वाया जाते.
स्नायू दुखतात. थकवा पुन्हा वाढतो. आजार जाणे महत्त्वाचे असते, परंतु ताप उतरण्याने आजार तसाच राहिलेला असतो. शिवाय या ताप उतरवण्याच्या औषधांना नको असणारे अनेक परिणाम असतात. बहुतेकांच्या जठराच्या अस्तराचा दाह होतो. आम्लपित्त (ऍसिडिटी) वाढते. काहींना यकृताच्या पेशींवर अपायकारक परिणाम होऊन कावीळ होते. अनेकांचा मूत्रपिंडावर परिणाम होऊन शरीरात सोडिअम क्षार साचू लागतो. परिणामी, रक्तदाब वाढतो. हृदयावर ताण येतो. अंगावर सूज येते. ऍस्पिरीनसारख्या औषधाने रक्तस्राव होण्याचा संभव निर्माण होतो. शिवाय ऍस्पिरीनमुळे लहान मुलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीवर उतरू शकते. नेम्युलसीड हे जगभर बंदी असलेले औषध फक्त भारतातच मिळते. भारतात बारा वर्षांखालील मुलांना हे औषध देण्यास बंदी आहे. मात्र खरे तर ते वापरूच नये.
तापामध्ये भरणारी थंडी (चिल)
तापमाननियंत्रक यंत्रणेचा “स्थिरबिंदू’ अचानक वर जातो; पण शरीराचे तापमान मात्र हळूहळू वाढते. दरम्यानच्या काळात रक्ताचे तापमान “स्थिरबिंदू’पेक्षा कमी असते. “स्थिरबिंदू’चे तापमान जास्त आणि रक्ताचे कमी, अशा स्थितीमुळे चेतातंतूंना थंडीचा आभास होतो. त्यामुळे रुग्णाला खूप थंडी वाजते. अशी थंडी कोणत्याही तापात वाजू शकते. थंडी वाजून येणारा ताप हा युरीन इन्फेक्शंनचाही असू शकतो.
हुडहुडी (रायगर्स)
कधी कधी- विशेषतः तापामध्ये “स्थिरबिंदू’ वाढल्यामुळे ताप येतो. स्थिरबिंदूवर असतानाच घाम येऊन ताप कमी होतो. अचानक तापमान कमी होऊ लागते. मग तापमान एका विशिष्ट मर्यादेखाली जाऊ नये याकरिता स्नायूंवरील तणाव अचानक वाढतो आणि स्नायूमध्ये उष्णता निर्माण होते. शरीरात उष्णता काही प्रमाणात राहावी यासाठी ही क्रिया शरीराकडून वारंवार केली जाते. त्यालाच आपण हुडहुडी म्हणतो.
ताप चांगला की वाईट?
यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ताप हा रोग नाही, तर रोगाचे एक लक्षण आहे. ते आपल्याला सांगते, की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. जोपर्यंत ही गडबड, म्हणजे तापाचे कारण सापडत नाही, त्यावर उपचार होत नाहीत, तोपर्यंत फक्त ताप उतरवण्यासाठीच्या औषधांसारखे (उदा.- “क्रोसिन’) उपाय म्हणजे फक्त वरवरची मलमपट्टी आहे. (जरी तापामुळे आपल्या शारीरिक दिनक्रमांवर मर्यादा येत असली तरी ताप दडपून टाकण्यासाठी डॉक्टतरांवर दडपण आणणे उपयोगाचे नाही. कारण ताप कमी झाला म्हणजेच रोग कमी झाला, असे नव्हे) किंबहुना कित्येकदा तापाच्या पॅटर्नवरून रोगाचे निदान होण्यास मदत होते. उदाहरणार्थ (1) “संध्याकाळी येणारा ताप’ – “लो-ग्रेड फीव्हर’ गटात मोडणारा हा ताप क्षयाच्या रुग्णांमध्ये आढळतो. (2) सेकंडरी, टर्शरी, क्वार्टन फीव्हर – म्हणजे दर दुसऱ्या, तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी विशिष्ट वेळी येणारा ताप. मलेरियाचा ताप या प्रकारचा असतो. (3) सततचा जादा ताप – न्यूमोनियामुळे येणारा ताप असतो. (4) स्टेप लॅडर पॅटर्न – शिडीच्या पायऱ्यांप्रमाणे हा ताप काही काळ स्थिर राहतो. मग वर चढतो. तेथे काही काळ स्थिर राहतो; मग आणखी वर चढतो. टायफॉईडमध्ये येणारा ताप अशा स्वरूपाचा असतो. ब्लड कल्चर टेस्टमध्ये पहिल्या चार दिवसांत विषमज्वर कळू शकतो. याचा अर्थ असा नव्हे, की ताप आला तर येऊ द्यावा किंवा त्यावर उपाय करू नये. तर तो कशामुळे आला यावर लक्ष केंद्रित करावे. ताप आला की ताबडतोब एखादी गोळी घेऊन कामाला लागणारे, दुखणे अंगावर काढणारे अनेक जण असतात. कित्येकदा ती त्यांची अपरिहार्यता असते. कदाचित अशा दोन-चार गोळ्यांनी ताप थांबेलही; पण तो का आला होता ते कळणार नाही. कुठेतरी काहीतरी गडबड आहे, असंतुलन आहे, असे ताप आपल्याला सांगत असतो. तेव्हा त्याचे सांगणे ऐकून घेणे हेच महत्त्वाचे. ताप अंगावर न काढता सरळ डॉक्टारांची भेट घेणे सर्वोत्तम.
ताप आल्यास काय करावे?
निव्वळ तापाच्या प्रकारावरून म्हणजे केव्हा येतो, किती चढतो या बाबींवरून तापाचे कारण साधारणपणे ओळखता येते. पण हल्ली अनेक डॉक्टचरांशी बोलताना असे जाणवते, की पूर्वी वैद्यकशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणेच आढळणारा ताप रोगनिदानास साह्यभूत ठरत असे, तसे हल्ली दिसत नाही. हल्ली ताप बऱ्याचदा “टिपिकल’ स्वरूपाचा नसतो. (पुस्तकांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असतोच असे नाही) अशा वेळी तापाबरोबरच असणारी अन्य लक्षणे महत्त्वाची ठरतात. कोणत्या अवयवसंस्थेमध्ये जंतुसंसर्ग झाला आहे ते या अन्य लक्षणांवरून ओळखले की मग रोगनिदान सोपे होते. उदा.- खोकला असेल तर श्वंसनसंस्थेमध्ये संसर्ग, अंग मोडून येत असेल तर विषाणुसंसर्ग किंवा फ्लू इत्यादी.
ताप आल्यामुळे आपल्या शारीरिक व्यवहारांवर मर्यादा येते, एक प्रकारचा अस्वस्थपणा वाटत असतो. म्हणून ताप ताबडतोब कमी व्हावा अशी प्रत्येक पेशंटची इच्छा असते. पण एखादी गोळी वारंवार घेऊन ताप दडपून टाकण्यापेक्षाही काही अधिक योग्य गोष्टी आपण करू शकाल, त्या अशा …
1) तापाची नोंद ठेवावी – थर्मामीटर किमान एक मिनिट तोंडामध्ये ठेवून तापमानाची नोंद करावी. दिवसातून तीन-चार वेळा पुनःपुन्हा तापमान तपासून त्याची योग्य नोंद केल्यास डॉक्टारांना निदान करण्यास तिचा उपयोग होईल.
2) ताप असताना शक्य तो अधिक कपडे किंवा अधिक चादरी अंगावर घालू नयेत. कपड्यांचे दोन किंवा तीन थर जर असतील तर त्यामध्ये हवेचे थर राहतील. हवा ही उष्णतेची दुर्वाहक आहे. त्यामुळे त्वचेवाटे उष्णता बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत गतिरोध निर्माण होऊ शकतो. खूप थंडी वाजत असेल तर एकच जाड वस्त्र आणि जाड चादर अंगावर घ्यावी.
3) तापमान नैसर्गिक रीतीने कमी करण्यासाठी डोक्याववर, पोटावर, छातीवर साध्या पाण्यात भिजवलेली पट्टी ठेवावी. ही पट्टी तेवढ्या भागातली उष्णता शोषून घेते. तेवढ्या भागाचे तापमान कमी झाले की मग शरीरातील अन्य भागातील उष्णता रक्ताद्वारा त्या भागात पोचते, ती पुन्हा पट्टी शोषून घेते. हे करताना पट्टी सतत बदलत ठेवावी. म्हणजे पुन्हा पुन्हा पाण्यात भिजवून ठेवत राहावी किंवा ओल्या फडक्याेने संपूर्ण अंग सतत पुसून काढावे.
4) तापामध्ये घाम येईल असे पाहावे. घामाचे बाष्पीभवन झाल्यास तापमान कमी होत असते.
5) शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावे. अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत राहावे.
6) ज्या अवयव संस्थेशी संबंधित लक्षणे असतील, त्या लक्षणांवर उपचार करावेत. उदा.- खोकला असल्यास गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. याने कफ मोकळा होऊन लवकर पडून जाईल. ताप लवकर कमी होईल. जुलाब असल्यास पाण्यामध्ये मीठ, साखर व लिंबू पिळून ते सतत थोडे थोडे पीत राहावे.
7) ताप जंतुसंसर्गामुळे येत असतो आणि त्यावरील औषधे व प्रतिजैविकांचा कोर्स केल्यानंतरच्या कालावधीत जीवनसत्त्वांच्या (व्हिटॅमिन्स) गोळ्यांचा कोर्सही जरूर करावा. तापामुळे झालेली झीज आणि प्रतिजैविकांनी निर्माण केलेली घट भरून काढण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..