ती सर्वप्रथम माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला काही म्हणता काहीही कळत नव्हतं. खरं तर ती कसली माझ्या आयुष्यात येतेय, तिच्याच कृपेने मला या पृथ्वीवर जन्म घेता आला! तिच्याजवळ मला विलक्षण सुरक्षित वाटायचं. आज असंख्य महासंहारक अण्वस्त्रं जवळ बाळगूनही या पृथ्वीवरील अनेक देशांना असुरक्षिततेची भावना रात्रंदिवस ग्रासून टाकते. पण ती कोणत्याही अस्त्राच्या मदतीविना केवळ एका पदराचा उपयोग करून या जगातली सर्वात प्रभावी सुरक्षा मला कशी काय प्रदान करायची याचं मला आजही प्रचंड आश्चर्य वाटतं. मी जसा वयाने मोठा होऊ लागलो तसं माझ्या लक्षात येऊ लागलं की ती एकाच वेळी असंख्य कामं न थकता आणि अगदी वेळेत पार पाडते आणि तरीही ‘कंटाळा’ या शब्दाचं स्पेलिंगही तिला माहीत नाही! लहान असताना स्वत:ची आंघोळ स्वत:च्या हाताने धड करू न शकणारा मी, घरातली व घराबाहेरची सर्व कामं तिला विद्युत्वेगाने आणि सतत हसतमुख राहून करताना बघून आश्चर्यचकित व्हायचो आणि स्वत:लाच विचारायचो, हिला हे सगळं न थकता करायला कुठून ऊर्जा व प्रोत्साहन मिळत असेल? आपल्या बाबांवर ही सगळी कामं करायची जर कधी वेळ आली तर इतक्या इफिशिएंटली ते करू शकतील?
अनेक वर्षांनंतर विविध कंपन्यांमधे मॅनेजर असताना व इतर मॅनेजर्सच्या कामाचं बारकाईने निरीक्षण करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एका ठरावीक वेळात अनेक कामं सारख्याच तत्परतेने व कार्यक्षमतेने करणं माझ्यासकट एकालाही जमत नव्हतं. एकदा आमच्या कंपनीत ‘टाइम मॅनेजमेंट’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम करायचं ठरत होतं, तेव्हा त्यासाठी तिलाच आमंत्रण द्यावं असं मला तीव्रतेने वाटून गेलं! काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका मोठ्या संस्थेने एका परिसंवादाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला आमंत्रित केले. परिसंवादाचा विषय होता ‘स्त्री-पुरुष समता’. तरुण-तरुणी एकमेकांवर शब्दास्त्र सोडण्यासाठी अगदी तयारीत होते. बहुसंख्य तरुणांचं म्हणणं होतं की समता हे एक फॅड आहे व त्याची काहीही गरज नाही. निसर्गानेच स्त्री व पुरुषाला असं तयार केलं आहे की ते एका पातळीवर कधीच येऊ शकणार नाहीत. तरुणींनी अर्थातच त्यांच्या या म्हणण्याला कडाडून विरोध केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करण्यासाठी त्या अत्यंत आग्रही होत्या व त्यांचं म्हणणं अगदी तावातावाने मांडत होत्या.
तारस्वरात चाललेल्या त्या वादविवादातील मतमतांतरे ऐकताना अंतर्मुख झालो असतानाच माझ्या डोळ्यांसमोर ‘ती’ तरळली आणि असं वाटलं, आज या परिसंवादात ती सहभागी झाली असती तर काय म्हणाली असती? ती म्हणाली असती – ‘श्रोतेहो, स्त्री-पुरुष समता हा आजच्या परिसंवादाचा विषय अत्यंत चुकीचा आहे असं तुम्हा सर्वांना नाही वाटत? ज्या स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची सार्थ जाणीव असेल तिला पुरुषांशी बरोबरी करण्याची गरजच काय? खरं तर समतेच्या गप्पा मारणं म्हणजे स्वत:च्या स्त्रीत्वाचा घोर अपमान आहे. प्रत्येक क्षेत्र स्त्रियांनी स्वकर्तृत्वाने व्यापून टाकलं असलं तरी आजही पुरुषप्रधान संस्कृतीचे ढोल पिटण्याचा अडाणीपणा करणारे असंख्य पुरुष अस्तित्वात असताना त्यांची बरोबरी करण्यासाठी का धडपड करायची? यानंतर या जगातल्या प्रत्येक स्त्रीने ‘स्त्री-पुरुष समता’ हा विचार डोक्यातून कायमचा हद्दपार केला पाहिजे.’
पुरुषांशी बरोबरी करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रियांना खडे बोल सुनावणारी ‘ती’ प्रत्येक घरात वावरत असते, जिला सगळं जग ‘आई’ या नावाने ओळखतं!
— श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply