तुटलेला तारा हा विचारतो गगन कुठे?
ते माझे लखलखते चंदेरी सदन कुठे?
माझी कुणाबरोबरही करशी तू तुलना
हा मी रसिक कुठे? अन् तो लोचट मदन कुठे?
थकले त्यांचे डॉलर, थकली यांची नाणी
मला विकत घेणारे आहे का चलन कुठे?
जाऊ द्या मित्रांनो जाऊ द्या घरी मला
ती सदा पुसत असेल गेला हा ‘‘सजन कुठे?’’
जिकडे तिकडे मिळते श्रोत्यांची दाद मला
पण गरीब या कविला मिळते मानधन कुठे?
सांग तुझे कसे काय होईल काम इथे?
कागदावरी या तू ठेवलेस वजन कुठे?
जगलो मी तसेच हे लिहिले साधे सोपे
गझलेत या आला का काफिया गहन कुठे?
फुलपाखराचे मी डोळे हळूच पुसले
रडणे कोणाचेही असो झाले मज सहन कुठे?
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply