नवीन लेखन...

तेजोमय संगीतसूर्य

 
संगीतसाधनेचा अखंड ध्यास घेतलेले दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून पंडित भीमसेन जोशी यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. संगीत क्षेत्राची इमानइतबारे साधना करताना अनेक मानसन्मान प्राप्त होऊनही पंडितजींच्या स्वभावातील साधेपणा कायम राहिला. किराणा घराण्याला आणि संगीताला वाहिलेली निष्ठा हे त्यांच्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य. रसिकांच्या हृदयसिहासनावर अधिराज्य गाजवणार्‍या या संगीतसूर्याला वाहिलेली श्रद्धांजली.पंडित भीमसेन जोशी म्हणजे शास्त्रीय संगीतातील गौरीशंकर. संगीतसाधनेचा अखंड ध्यास घेतलेला हा माणूस म्हणजे एक अवलियाच. त्यांनी गुरूंच्या शोधात भारत भ्रमण केले. तरिही मनाजोगे गुरू भेटेनात. तेव्हा विनायकबुवांनी सांगितले, ‘ही भटकंती सोड आणि गुंदगुडला जा. तेथे सवाई गंधर्वांकडे गाणे शिक.’ ही आज्ञा शिरसावंद्य मानून भीमसेनजी गुंदगुडला आले. त्यांची भटकंती डोळस होती. या दरम्यान आलेले अनुभव भीमसेनजींना बरेच काही शिकवून गेले. त्यातून त्यांची साधनेची इच्छा प्रबळ बनली. नंतर गुरूच्या सानिध्याने त्यांच्या साधनेला धुमारे फुटले. त्यांच्या संगीताराधनेला परमेश्वराचा आशिष लाभला आहे. त्यामुळे त्यांच्या गाण्याला अध्यात्माचा वास असतो. मनस्वी कलाकार असलेले भीमसेनजी तितकेच उत्तम माणूस आहेत. त्यांनी जीवनात सार्‍याच गोष्टीत रस घेतला. त्यामुळे जीवनाचा खर्‍या अर्थाने आनंद घेण्याचे सुख त्यांना लाभले.भीमसेनजींनी कन्नड रंगभूमीवरही कामे केली आहेत. तिथेच त्यांची वत्सलाबाईंशी ओळख झाली. त्यातून पुढे भीमसेनजींनी वत्सलाबाईंशी विवाह केला. गाण्यातील वैविध्य ही भीमसेनजींची आणखी एक खासियत आहे. भक्तीगीत असो वा भावगीत, शास्त्रीय संगीताच्या छटा पंडित भीमसेनजींच्या गाण्यात नेहमीच पहायला मिळाल्या. ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘तिर्थ व
ठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अशा काही गीतांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. पंडितजींनी आपल्या गायकीने कवी-गीतकारांच्या शब्दाचे सोने केले.कलाकार म्हणून इतरांकडे पाहण्याची पंडितजींची दृष्टी अतिशय वेगळी होती. सर्वसाधारणपणे गाण्याचा व्याप वाढला किंवा मानसन्मान मिळू लागले की कलाकार स्वत:मध्ये मग्न होऊन जातो. त्याला इतरांशी फारसे देणे-घेणे राहत नाही.

या पार्श्वभूमीवर पंडितजी मात्र लहानातल्या लहान कलाकारालाही नावानिशी ओळखतात. त्याला वेळोवेळी प्रोत्साहन देतात, पाठीवर शाबासकीची थाप टाकतात. पंडितजींनी गुरूंच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सव सुरू केला. या ते स्वत: तर गायनाची सेवा रूजू करू लागलेच पण अन्य कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे देशाच्या विविध भागातील कलाकारांना गायनाची संधी मिळाली. एवढेच नव्हे तर केवळ पंडितजींच्या शब्दाखातर कलाकार गंधर्व महोत्सवात गायनसेवा रूजू करण्यासाठी हजेरी लावू लागले. या उत्सवाच्या रूपाने लावलेल्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. शिवाय या महोत्सवामुळे अनेक कानसेन घडले आहेत. त्याचबरोबरच असंख्य कलाकार घडवण्यात पंडितजींचा मोठा वाटा राहिला आहे. संगीतक्षेत्रातील हे महान कार्य म्हणायला हवे. संगीतातील वेगवेगळी घराणी महोत्सवाच्या व्यासपीठावर आणण्यातही पंडितजींचा सिंहाचा वाटा आहे. या घराण्यातील दिग्गज गायकांची गाणी रसिकांना ऐकवून नवी दृष्टी देण्याचे कामही पंडितजींनी केले. संगीताचा एवढा व्यापक प्रसार क्वचितच कोणी केला असेल. एवढे करूनही पंडितजींनी त्याचा कोणताही अभिनिवेष बाळगला नाही.संगीतक्षेत्रातील अविरत सेवेमुळे पंडितजींना आजवर अनेक मानसन्मान प्राप्त झाले. भारतरत्नसारखा सर्वोच्च सन्मान लाभणे हे तर अहोभाग्यच. ते पंडितजींच्या वाट्याला आले. पण, अशा कोणत्याही मानसन्मा
ने विचलित होणार्‍यांपैकी किंवा किंतू निर्माण होणार्‍यांपैकी पंडितजी नव्हते. त्यामुळे विविध पुरस्कारानंतरही त्यांच्या स्वभावातील साधेपणा कायम राहिला. शिवाय पंडितजींना कायम रसिकांची उत्कट साथ लाभली आहे. रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य करणारा कलाकार म्हणूनही पंडितजींचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांचे चाहते भारतभरच नव्हे तर जगभर पसरले. एवढ्या उच्चपदी पोहोचूनही त्यांच्या स्वभावातील विनम्रता आणि प्रसंगी मिश्किलपणाही कायम राहिला. या संदर्भात एक प्रसंग अजूनही स्मरणात आहे. एकदा मी कुत्र्याला घेऊन प्रभात रोडने फिरायला निघाले होते. त्यावेळी त्याच रस्त्याने पंडितजी गाडीतून निघाले होते. मला पाहताच त्यांनी गाडी थांबवली. त्यावेळी कुत्रे भुंकू लागले. त्यावर ते लगेच म्हणाले, ‘अरे एका कलाकाराच्या कुत्र्याने दुसर्‍या कलाकारावर भुंकायचे नसते!’ तसेच पहायला गेले तर हा किरकोळ विनोदच. पण या प्रसंगाद्वारे त्यांनी मला कलाकार म्हणून आपल्या पंक्तीत बसवले याचे विशेष कौतुक वाटले.असाच आणखी एक प्रसंग आजच्या घडीला आवर्जून सांगण्याजोगा आहे. एकदा कार्यक्रम संपवून परत येताना पंडितजींनी स्वत: गाडी चालवली. एवढेच नव्हे तर नाना मुळे या सहकार्‍याला घरी सोडले. नंतर घरच्यांना म्हणाले, ‘हा घ्या तुमचा नाना.’ एकीकडे संगीताची मैफल सजवायची आणि दुसरीकडे गाडी चालवत घरी यायचे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पण एखादा निश्चय केला की पूर्ण करायचाच हा पंडितजींचा स्वभाव आहे. एकदा असेच ड्राईव्ह करताना त्यांच्या गाडीपुढे वाघ आला. पण अशा बिकट प्रसंगी जराही विचलित न होता ते शांत बसून राहिले. जणू काही ‘मी ही या क्षेत्रातला वाघच आहे’ असे त्यांना सुचवायचे होत! त्यांच्या स्वभावाची अशी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.गायकीच्या क्षेत्रातील एखाद्या घराण्याशी कायम वाह ि
लेली निष्ठा हे पंडितजींचे आणखी एक वैशिष्ट्य. साधेपणा आणि करुणा हे किराणा घराण्याचे गुण त्यांच्या ठायी ओतप्रोत भरले होते. एवढेच नव्हे तर, ते गायकीच्या अभिव्यक्तीतून पाझरताना दिसले. त्यांच्या गायनात भक्ती आणि करुणा या दोन्हींचा सुंदर मिलाफ दिसून यायचा. एकदा ते गायला बसले की अवघे रसिक मंत्रमुग्ध होऊन जात, काळवेळाचे भान विसरत. इतकी एकतानता साधणे गायकासाठी वाटते तेवढी सोपी बाब नाही. त्यासाठी खडतर परिश्रम आणि रियाजातील सातत्य या दोन्हींची आवश्यकता असते. याबरोबरच हवी असते कलेप्रती प्रामाणिकपणा. त्यांच्या गायकीमुळे एकूणच भक्तीगीतांना एक वेगळी झळाळी प्राप्त झाली. त्यामुळे भक्तीगीते तन्मयतेने ऐकणारा रसिकवर्ग मोठ्या संख्येने आढळून येतो. त्यांना संगीत नाटकाची अतोनात आवड होती. ‘स्वरसम्राज्ञी’ हे त्यांचे आवडते नाटक. आमच्या विविध नाटकांना ते आवर्जून हजेरी लावत. त्यावेळी साक्षात परमेश्वर समोर येऊन बसल्याचे

समाधान प्राप्त व्हायचे. असा हा संगीत क्षितीजावरील सूर्य अखंड तळपत राहो हीच सदिच्छा!पंडित भीमसेन जोशी यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार* 1972 : पद्मश्री.* 1976 : संगीत नाटक अकादमी पुरस्कार.* 1985 : पद्मभूषण, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.* 1986 : पहिली प्लॅटिनम डिस्क.* 1999 : पद्मविभूषण.* 2000 : आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार.* 2001 : कन्नड विद्यापीठाचा नादोजा पुरस्कार.* 2002 : महाराष्ट्र भूषण.* 2003 : केरळ सरकारचा स्वाती संगीत पुरस्काराम्.* 2005 : कर्नाटकरत्न.* 2008 : भारतरत्न, स्वामी हरिदास पुरस्कार.* 2009 : दिल्ली शासनाचा जीवनगौरव पुरस्कार.* 2010 : बंगळुरू येथील रामसेवा मंडळीतर्फे दिला जाणारा एस. व्ही. नारायणस्वामी राव राष्ट्रीय पुरस्कार.(अद्वैत फीचर्स)

— किर्ती शिलेदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..