शाळकरी वयात दिवसा शाळा व संध्याकाळी गायनशाळा हा नित्यक्रम अनेक वर्षे अगदी कसोशीने पाळल्या गेला. पं. विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पुण्यतिथीचे वेध लागले की कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्हा विद्यार्थ्यांची लगबग सुरु होत असे. वय काहीही असो, पण प्रत्येक विद्यार्थ्याने पंडितजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही ना काही सादर केलेच पाहिजे अशी आमच्या गुरुजींची आज्ञा होती व ती मोडण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. पुण्यतिथीचे कार्यक्रम कमीत कमी तीन दिवस चालत व त्या काळातील अनेक प्रतिथयश गायक त्यांची सेवा अर्पण करण्यासाठी आवर्जून हजेरी लावत. त्यांची सरबराई करण्याचं काम आम्हा विद्यार्थ्यांकडे असायचं.
गायनशाळेच्या प्रवेशद्वारावर तोरण लावण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी सुतळीची शोधाशोध सुरु केली, पण शाळेत ती कुठेही न सापडल्यामुळे गुरुजींच्या घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. गायनशाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुजींच्या घरी मी पोहोचलो तेव्हा मला जे दृश्य दिसलं ते इतक्या वर्षांनंतर आजही पूर्ण तपशिलासह माझ्या डोळ्यासमोर तरळतं आहे. पांढरा पायजामा, पांढरा पूर्ण बाह्यांचा शर्ट व पायात चामड्याच्या अगदी साध्या चपला असा वेश धारण केलेल्या दोन व्यक्ती एका बेंचवर खाली मान घालून बसल्या होत्या आणि गुरुजी त्या दोघांवर खूप चिडले होते. त्यांच्या चिडण्यामागचं कारण कळण्याचं माझं वय नव्हतं. ते दृश्य बघून गुरुजींना सुतळी मागण्याची माझी काही हिम्मत झाली नाही आणि मी आल्या पावली परतलो.
मित्रांनो, नागपुरातील सीताबर्डी मेन रोडवर असलेल्या त्या गायनशाळेचं नाव होतं श्रीराम संगीत विद्यालय. शिस्तीचे भोक्ते असलेले आमचे आदरणीय गुरुजी होते पं. शंकरराव सप्रे आणि ज्यांना गुरुजी अधिकारवाणीने रागावत होते त्या दोन व्यक्ती होत्या पं. भीमसेन जोशी व डॉ. वसंतराव देशपांडे !
— श्रीकांत पोहनकर
९८२२६ ९८१००
Leave a Reply