दिवसेंदिवस छोटय़ा छोटय़ा त्वचाविकारांनी पछाडलेले रुग्ण मोठय़ा संख्येने; त्वचा रोग तज्ज्ञांकडे जातात. डॉक्ट रवैद्यांकडेही येतात. काळे, वेदनारहित व तिळांसारखे जे त्वचेवर डाग उठतात त्यांस ‘तिलकालक’ म्हणतात. तेच जाड व उंच असल्यास त्यांस ‘मस’ म्हणतात. मसापेक्षांहि उंच, पांढरे वा काळे असतात त्यास ‘चामखीळ’ म्हणतात. जन्मत: काळा/पांढरा व त्वचेबरोबर जो वाटोळा डाग असतो त्यास ‘लांछन’ म्हणतात.
या सगळ्या क्षुल्लक त्वचाविकारात खाण्यापिण्याच्या बंधनांची मदत खूपच मोलाची व खर्चाच्या दृष्टीने अल्पमोलाची ठरते. मीठ, आंबट, खारट पदार्थ, लोणची, पापड, शिळे अन्न, फास्टफूड, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, मिसळभाज्या, दही, रसम सांबार, इडलीडोसा, ढोकळा, सॉस, व्हिनेगार, शेव, भजी, चिवडा आदी टाळावेत. जेवण साधे फिके, शक्यतो उकडलेल्या भाज्या, ज्वारी, मूग असे असावे. असे पथ्यापथ्य पाळल्यामुळे हे क्षुद्ररोग वाढत नाहीत. लवकर आटोक्यात येतात. तीळ या विकाराची कोणी कात्री देऊ शकत नाही. तीळ आपोआप येतात, आपोआप जातात. औषधोपचाराशिवायही जातात पण ज्यांचे तीळ खूप मोठे असतात त्यांनी त्या जागेचा वर्ण सुधारण्याकरिता एलादितेल थेंबथेंब दिवसातून ४-५ वेळा लावावे. तीळांची संख्या वाढत असल्यास प्रवाळ, कामदुधा, उपळसरी सकाळ संध्याकाळ; त्रिफळाचुर्ण रात्री अशी औषधे घ्यावी. मस खूप लहान असल्यास दुर्लक्ष करावे. सर्जरस किंवा राळेचे मलम घासून लावल्याने मस बहुधा ८-१५ दिवसात बरा होतो. मस आकाराने मोठा असल्यास घोडय़ाचा केस करकचून बांधावा. मस निश्चयाने गळून पडतो. चामखीळ विकाराकरिता सर्जरस मलम लावणे हा हुकमी उपाय! चामखीळीचा आकार मोठा असल्यास आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ अशी औषधे घ्यावी. लांछन विकारात क्षीरिवृक्षांच्या साली, कोंब दूधात वाटून लेप करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-वैद्य प. य. वैद्य खडीवाले
Leave a Reply