थरथरती रक्षा
7 ऑगस्ट 2005 रोजी अतिशय अटीतटीच्या आणि थरारक कसोटी सामन्याचा शेवट झाला. २००५ ची रक्षा (अशेस) मालिका. एजबॅस्टनवरील दुसरी कसोटी. यजमान इंग्लंड 407 आणि 182. पाहुणी ऑस्ट्रेलिया 308 आणि आता 282 धावांचे विजयी लक्ष्य. मालिकेत पूर्वीच 1-0ने पिछाडीवर असल्याने इंग्लंडला पराभव मानवणार नव्हता. अॅन्ड्र्यू फ्लिन्टॉफच्या हुन्नरी खेळाच्या जोरावर चौथ्या दिवशी दोन गडी शिल्लक असताना आणखी 107 धावा काढण्याचे आव्हान कांगारूंना मिळाले. शेन वॉर्न आणि ब्रेट लीने ही आवश्यकता दुहेरी आकड्यांमध्ये आणली. ली आणि मायकेल कॅस्प्रोविक्झने ऐतिहासिक 59 धावांची भागीदारी शेवटच्या गड्यासाठी केली…आता कांगारूंना विजयासाठी इन-मीन-तीन धावा हव्या होत्या. आनंदी ब्रिटिश प्रेक्षकांच्या उत्साहावर विरजण पडलेच होते पण कहानी अभी बाकी थी … स्टीव हार्मिसनचा एक जोरकस उसळता चेंडू कॅस्प्रोविक्झच्या हातमोज्यांना लागला आणि थरथर कापणार्या जेरंट जोन्सने यष्ट्यांमागे झेल टिपला… 43 धावांवर ब्रेट ली नाबाद राहिला आणि मालिकेला नवे वळण देणारा 2 धावांच्या अंतराचा विजय इंग्लंडने मिळवला. अनेक पुनर्दृष्यांनंतर (रिप्लेज्) तो ऐतिहासिक चेंडू फलंदाज मायकल कॅस्प्रोविक्झच्या डाव्या हातमोज्याला लागल्याचे निष्पन्न तर झाले पण चेंडू जेव्हा त्याच्या हातमोज्यांना लागला तेव्हा त्याचा हात बॅटच्या संपर्कात नसल्याने तांत्रिकदृष्ट्या मायकल ‘नाबाद’ असल्याचेही निष्पन्न झाले! पंच बिली बाव्डन यांना बोल लावण्यात अर्थ नव्हताच. चारच दिवसांनंतर ओल्ड ट्रॅफर्डला मालिकेतील तिसरी कसोटी सुरू झाली तेव्हा ‘द ग्रेटेस्ट टेस्ट’ नावाची एक अंकीय दृश्य तबकडी (डिजिटल विडिओ डिस्क) विक्रीसाठी उपलब्ध झाली होती आणि तिच्या शीर्षकाबाबत कुणाचीही तक्रार नव्हती.
झिम्मी अली
7 ऑगस्ट 1959 रोजी अली हसीमशहा ओमारशहाचा जन्म झाला. झिम्बाब्वे संघाकडून खेळणार्या खेळियांपैकी हा पहिला श्वेतेतर (म्हणजे तथाकथित गोर्यांना वगळता
इतरांमधील) इसम होता. 1983मध्ये एदिसांच्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेने पदार्पण केले तेव्हा अलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सुरू झाली आणि ती संपली तेव्हा झिम्मींनी कसोटीदर्जा मिळविला होता. झिम्मींतर्फे तो 3 कसोट्या आणि 28 एदिसा खेळला. नंतर त्याने दूरचित्र समालोचक आणि राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply