नवीन लेखन...

थोडा वेळ द्या हृदयासाठी..

आपल्या सगळ्यांच्याच धकाधकीच्या जीवनशैलीचा मोठा परिणाम होत आहे तो आपल्या हृदयावर. म्हणूनच आपल्या हृदयासाठी आपण एकदा थांबून शांतपणे विचार करायला हवा, तोही हृदयापासून..

हृदयविकाराचे प्रमाण भारतात झपाटय़ाने वाढत आहे. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२० मध्ये भारतात सर्वात अधिक हृदयविकाराचे रुग्ण असतील. भारतात कारोनरी आर्टरी या आजाराचे प्रमाण पूर्वी १९६० साली ४ टक्के होते आणि आता ते ११ टक्के इतके वाढले आहे. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तीमध्येच आढळत होता. त्याचे प्रमाण ३० ते ४० वर्षे वयाच्या तरुणांमध्ये आता झपाटय़ाने वाढत आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण १९५० साली जवळपास १ ते ३ टक्के होते, पण तेच आता १० ते ३१ टक्के इतके वाढलेले आहे. भारतात दरवर्षी लाखो हृदयविकारच्या आजाराने बळी पडतात. हे सर्व टाळण्यासाठी हा आजार का होतो, त्याची उपचारपद्धती काय आणि ते टाळण्याचे उपाय काय हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

हृदयविकार
हृदय हे स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. ते सतत आकुंचन-प्रसरण पावत असते. या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, त्या रक्तवाहिन्यांना ‘कोरोनरी’ धमनी म्हणतात आणि जर या कोरोनरी धमन्यामध्ये अवरोध निर्माण झाला तर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, त्यावेळी रुग्णाला ‘हृदयविकार’ आहे असेही म्हणतात. हृदयात रुग्णाला थोडे काम केल्यावर छातीच्या मध्यभागी दुखणे, छाती भरून येणे, डाव्या हातामध्ये दुखणे, दम लागणे, छातीमध्ये धडधड होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या छातीतील दुखण्याला ‘अंजायना’ (हृदयशूळ) म्हणतात.

मधुमेह असलेल्या रुग्णाला कदाचित छातीत वेदना होणार नाहीत, अशा रुग्णाला दम लागणे, थोडेच काम केल्यावर थकवा येणे, कमजोरी वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जेव्हा कोरोनरी धमनीतील अवरोध हा शंभर टक्के होतो. (१०० टक्के BLOCK) तेव्हा रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी छातीत तीव्र वेदना होणे. दरदरून घाम येणे.. भोवळ येणे.. दम लागणे.. असा त्रास होतो. कधी कधी हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे ताबडतोब मृत्यूसुद्धा होऊ शकतो. या सर्व आजारांना हृदयविकार असे म्हणतात. हृदयविकार टाळण्यासाठी खालील बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

* हृदयविकाराचे निदान करणे.
* धोक्याची घटके ओळखणे.
*धोक्याची घटके टाळण्याचा प्रयत्न करणे.
* औषधोपचार करणे.
* नवीन तंत्राचा उपयोग करून हृदयविकाराचा उपचार करणे.
* अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.

हृदयविकाराचे निदान : हे सर्व टाळण्यासाठी या आजाराचे लवकर व योग्य निदान होणे आवश्यक आहे. हृदयरोगतज्ज्ञ (काíडओलॉजिस्ट) रुग्णांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर हृदयाच्या काही विशिष्ट टेस्ट करायला सांगतील. त्यात ई.सी.जी, हृदयाची सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट किंवा थॅलियम यांचा समावेश होतो. या सर्व नॉन इन्वेसिव्ह टेस्ट असून यात हृदयविकाराचे निदान होण्याची शक्यता ८० ते ९० टक्के आहे, पण सर्वात महत्त्वाची व शंभर टक्के निदान करणारी गोल्ड स्टॅण्डर्ड टेस्ट आहे. ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी.’ हृदयरोगाचे निदान करण्याचे, त्याची तीव्रता, प्रमाण, विस्तार बघण्याची एकमेव तपासणी म्हणजे ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी. अत्यंत सुरक्षित, सोपी व १०० टक्के निदान देणारी तपासणी.!

तज्ज्ञ हृदयविशारदाकडून ही तपासणी १० ते १५ मिनिटांत होते. रुग्णाच्या मांडीच्या आर्टरीमधून एक छोटीशी पोकळ नळी १.५ मि. मी. व्यासाची, हृदयाच्या कोरोनरी धमनीपर्यंत नेण्यात येते. मॉनिटरवर याचे एक्स-रे स्कॅनिंगद्वारे चित्रण चालू असते. आणि दुसऱ्या मॉनिटरवर रुग्णाचे रक्तदाब, हार्ट रेट (स्पंदन), ई. सी. जी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे सर्व काही दिसत असते. तीन तासांच्या विश्रांतीनंतर रुग्णाला सुट्टी करण्यात येऊ शकते. ही प्रक्रिया एकंदरीत अत्यंत सुरक्षित असून शंभर टक्के निदान करणारी आहे.

धोक्याचे घटक
हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर त्याचे धोक्याचे घटक ओळखणे जरुरी आहे.
वय : वाढत्या वयानुसार हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढते. वयाच्या ५५ ते ६० वर्षांनंतर हे प्रमाण अधिक असते. पण आता मध्यम वयामध्येसुद्धा हे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार रक्त वाहिन्यांमध्ये कठिणीकरणाची प्रक्रिया होत असते, म्हणून हे प्रमाण वाढत्या वयानुसार वाढते.
लिंगभेद : पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण कमी असते. स्त्रियांमधील ईस्ट्रोजन नावाचा आंतरिक स्राव हा हृदयविकार टाळण्यास मदत करतो. पण जेव्हा स्त्रीची मासिक पाळी थांबते, तेव्हा या स्रावाचे प्रमाण कमी होते आणि अशा स्त्रियांत हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांप्रमाणेच असू शकते.
आनुवंशिकता : हृदयविकाराचा आजार बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक आहे. आईवडिलांना हा आजार असेल तर मुलांना तो होण्याची शक्यता दाट असते.
धूम्रपान : हा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. तंबाखूमध्ये चार हजार धनरूप किंवा वायूरूपात असणारी रसायने असतात. कार्बन, कार्बन मोनॉक्साईड आणि निकोटीन हे पदार्थ हृदयाला हानीकारक असतात. त्यांनी रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्यास सुरुवात होते आणि रक्तवाहिन्यांतील अवरोध वाढू लागतो. हृदयाची ऑक्सिजनची आवश्यकता वाढते. निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांच्या अवरोधामध्ये तडे जाऊन तेथे रक्ताच्या गुठळ्या जमा होण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अॅटॅक येऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे दम लागतो. जगात जवळपास १० लाख लोक धूम्रपानामुळे दरवर्षी मरतात.
मद्यपान : मद्यपानामुळे स्नायूंचे आजार होतात. हृदयाच्या पेशींच्या सेल्युलर पातळीवर दुष्परिणाम होऊन हृदयपेशींची कार्यक्षमता कमी होते. मद्यामुळे हृदयाची लय आणि गती बिघडू शकते.

हृदयविकार टाळण्यासाठी
* आहारात योग्य तो बदल करणे.
* व्यायाम करणे.
* योगा- मेडिटेशन करणे.
* औषधोपचार करणे.
*अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.

आहार
संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.
रोजच्या आहारातून मिळणाऱ्या उष्मांकांपैकी १० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. अगदी स्निग्धांशविरहित मध्ये थोडंसं कोलेस्टेरॉल असतं. संपृक्त स्निग्धांश जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले कांदा, लसूण, गाजर, वांगी, सोयाबिन, स्किम्ड मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.

कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावे. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, पालक, मेथी, लेटय़ूस अशा भाज्या, मोडाची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.
चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा.

मांसाहार टाळावा. मटन-चिकन टाळावे, अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ : मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे. मिताहारी असावे.

चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.
आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण पुष्कळ असावे.

मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.
खाल्ल्यानंतर ताबडतोब झोपू नये. थोडी शतपावली घ्यावी.

उपवास टाळावे. सकाळी व्यवस्थित न्याहारी करावी, पण दुपारचे आणि रात्रीचे जेवण मात्र हलकेच घ्यावे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवावे. त्या वेळा नियमितपणे पाळणे.

व्यायाम
भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवावी यासारखा व्यायाम जितक्या वेळा सहन होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी व्यायामाचा वेळ आणि प्रकार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावा. शरीरांतर्गत ऊर्जा दीर्घकाळासाठी, पण प्रमाणशीरपणे आणि योग्य गतीने वापरली जाते त्याला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. असे व्यायाम हृदयविकार टाळण्यास मदत करतात. योगासने करावीत.

योगा-मेडिटेशन
मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळवून देणारा उत्तम मार्ग म्हणजे योगा-मेडिटेशन. यात प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो. अशांत मन शांत करण्याचा हा योग्य मार्ग आहे. या सर्व गोष्टींमुळे जीवनात उत्साह वाढू लागतो. जीवनातील नकारात्मक दृष्टिकोन बदलतो. ही भावना फार महत्त्वाची असते. यामुळे जीवनातील ताणतणाव, स्ट्रेस कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी
कोरोनरी अॅन्जिओग्राफी या तपासणीमध्ये जर कोरोनरी आर्टरीला अवरोध असल्याचे निदर्शनास आले, या अवरोधाची ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक वेळी बायपास सर्जरीच करावी लागते, असे नाही. गेल्या १५ वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती विकसित झाली असून तिचे नाव ‘कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी’. अवरोध हा मुख्यत: चरबीनी बनलेला असल्यामुळे ह्य बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. ज्या ठिकाणी आर्टरीमध्ये अवरोध आहे त्या ठिकाणी आधी बलून अॅन्जिओप्लास्टी केली जाते; त्यानंतर अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे आणि रक्तवाहिनीच्या आकाराप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो. ह्य प्रक्रियेला अॅन्जिओप्लास्टी विथ स्टेंट असे म्हणतात.

अॅन्जिओप्लास्टीचे फायदे
अॅन्जिओप्लास्टी ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे. (अर्धा तास) ह्यत कुठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते, ना भूल देण्याची आवश्यकता असते. रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो, त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात, ते टाळता येतात. मुख्यत: वयस्कर लोकांमध्ये ही फारच उपयोगाची गोष्ट आहे. ज्यांना हृदयविकारावर सोबत बाकी आजारसुद्धा आहेत, उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो अशा रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी वरदान ठरू शकते. बायपास सर्जरीमध्ये लावण्यात आलेल्या ग्राफ्टमध्ये जर अवरोध निर्माण झाला तरी त्याचीसुद्धा अॅन्जिओप्लास्टी करता येते. त्याला ‘ग्राफ्ट अॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.

रुग्ण फारच सिरिअस असेल, शॉकमध्ये असेल किंवा हार्ट अटॅकमुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल अशा वेळी ज्या आर्टरीमुळे हार्ट अटॅक आला आहे, त्या आर्टरीची अॅन्जिओप्लस्टी केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो. ज्यांना एक किंवा दोनच आर्टरीमध्ये मर्यादित अवरोध आहे त्याना अॅन्जिओप्लास्टी फार उपयोगी असते. तरुण रुग्णांवर सहसा अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.

बायपास सर्जरी
जर कोरोनरी आर्टरीमध्ये अवरोधाचे प्रमाण जस्त असल्यास किंवा मुख्य कोरोनरी आर्टरीला जर अवरोध असल्यास किंवा विभाजन होणाऱ्या दोन आर्टरीच्या उगमावर जर अवरोध असल्यास बायपास सर्जरी करणे योग्य आहे.

हृदयरोग टाळण्यासाठी
दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. ह्य व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात. सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.

आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन आणि कमरेचा घेर कमी करावा. ह्यासाठी आहारात योग्य तो बदल करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यान- धारणा, योगा ह्य गोष्टीचा उपयोग करावा. योग्य वेळी आणि शांत झोप शरीराला आवश्यक असते म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी. धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा. जेवणात मिठाचे आणि मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा. संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत वागवू नका. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळा. आपला रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, नेमाने वैद्यकीय तपासणी करा अणि डॉक्टरचा सल्ला घ्या.. तो पाळा. आहार, विहार, आचार, विचारात योग्य तो बदल करून आपलं आरोग्य आणि शरीर निरोगी ठेवा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. लोकसत्ता / डॉ. गजानन रत्नपारखी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..