थोडे अमृत अन् गुलाबजल थोडेसे मध,थोडे अत्तर
देवाने या तुला घडविले माझ्याखातर इतुके सुंदर
कामधेनुच्या गोड दुधाची साय काढुनी तुला लावली
म्हणून माझे गाणे जाते पंख लावुनी तव अधरांवर
सहा ऋतुंनी आपआपले दागदागिणे तुला अर्पिले
तेव्हापासुन चांदीचे हे पैंजण पडते काळेठिक्कर
भुवई कुठली? नजरेवरती मदनाने हा बाण खोचला
रती म्हणाली मादकतेला,रहा सुखाने हे तुमचे घर
तुझे पाहुनी काळे कुंतल तोंड लपविले अंधाराने
तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजावरती झुकते अंबर
तुला पाहुनी दूर पळाली माझी चिता, व्यथा, काळजी
तुला पाहुनी घरात आले सुखही अपुल्या मुलांबरोबर
सारे काही तुझे निराळे गोडगुलाबी हवेहवेसे
पण हदयावर हक्क सांगण्या गेलिस बाई तू माझ्यावर!
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply