आधुनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकरांच्या जीवनातील अनेक अज्ञात ह्रदयस्पर्शी प्रसंग आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अपकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकणार्या विविध आठवणींचा ‘‘मंतरलेल्या आठवणी‘‘ हा खजिना मराठी रसिकांसाठी खुला होत आहे. श्रीधर माडगूळकरांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकातील एक आठवण खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
वर्षातले आठ महिने पाण्याशिवायच वाहणार्या माणनदी-काठावरील अनेक बिनचेहर्याच्या खेड्यांधल्या दोनअडीचशे उंबर्याच्या एका छोटेखानी गावाचे नाव आहे ‘माडगूळे’ ! याच बिनचेहर्याच्या माडगूळे गावाने मराठी सारस्वताला दोन महान सुपुत्र दिले. आधुनिक वाल्मीकी म्हणून ओळखले जाणारे ग.दि. माडगूळकर ही थोरली पाती आणि ग्रामीण कथा-कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर ही धाकटी पाती! कुलकर्णीपण सोडून थोरल्या पातीने गावावरून ‘माडगूळकर’ हे स्वतःचे आडनाव लावले. धाकटी पातीही त्याच मार्गाने गेली. मग दोघांनी मिळून गावालाच नाव मिळवून दिले.
या दोघांनी ‘माडगूळ’ सोडून बाहेर पडण्याला तत्कालीन कारणही तसंच घडलं. योगायोगाने ती हकिगत तात्यांच्या (व्यंकटेश माडगूळकर) तोंडूनच मला ऐकायला मिळाली होती. साधारण २० वर्षांपूर्वी तात्यांबरोबर मी माडगूळला गेलो होतो. संध्याकाळी फिरून आल्यावर घरासमोरच्या जोत्यावर आम्ही दोघे गप्पा मारत बसलो. आकाशात लाख लाख चांदण्या चमकत होत्या. हवेत थोडा गारवा जाणवत होता. तात्या कुठे तरी आकाशाकडे पाहात होते. मध्येच माझ्याकडे वळून म्हणाले, ‘‘तुझा बडूकाका तेव्हा १०-१२ वर्षाचा असेल. आपल्या भागात नेहमीप्राणे दुष्काळ पडला होता. आपल्या तीनही रानात गवताचं एक पातंसुद्धा उगवलेलं नव्हतं. संध्याकाळी सूर्य मावळण्याची वेळ होती. आमच्या वडिलांनी – दादांनी – बडूला शेजारच्या धोंडीबापूंच्या रानातून आपल्या घोडीसाठी थोडं गवत आणायला सांगितलं. बडू पळत-पळत गावाशेजारील धोंडीबापूंच्या रानात गेला. त्या काळात दुसर्याच्या रानातलं थोडं गवत वगैरे घेण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नसे. बडूने ओल्या गवताचा भारा केला आणि तो घराकडे निघाला. एवढ्यात
धोंडीबापूंचा म्हातारा त्याला आडवा आला. त्याच्या हातातला गवताचा भारा खाली खेचत म्हणाला, ‘‘घोड्यासाठी गवत पिकवता येत नाही त्यानं घोडी पाळू नये, कुलकर्णी ! ठेवा तो भारा खाली !’’ झालेल्या अपमानाने रडवेला होऊन बडू घरी परत आला. दादांनी विचारल्यावर त्याने रडत-रडत सर्व हकिगत त्यांना सांगितली. नेके अण्णा त्या वेळेस तिथे आले. त्यांनी हे सर्व संभाषण ऐकले होते. ते काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने मी व मोठा भालचंद्र घरी परत आलो. तेव्हा अण्णा गप्प गप्पच होते. एकाएकी त्यांनी आम्हा दोघांना बाहेर बोलावले. आमच्या गावाजवळील शेताकडे झपाझप पावले टाकीत ते गेले. त्यांच्या पाठीमागे आम्ही दोघे जवळ-जवळ पळतच गेलो. पावातले नऊ एकराचे शिवार गवताच्या पात्य शि
ाय भुंडं दिसत होतं. अण्णा आम्हा दोघांकडे वळून म्हणाले, ‘‘येत्या पाच वर्षात आपली तीनही शेतं आपण हिरवीगार करून दाखवायची तोपर्यंत या गावाचं तोंडसुद्धा मी पाहणार नाही. आणि ते पुन्हा झपाझप पावले टाकीत गावाकडे वळले.
दुसर्या दिवशी पहाटेच अण्णा गाव सोडून कोल्हापूरला रवाना झाले. पाचसहा महिन्यात मीही तिकडे गेलो. भालचंद्राने कोवळ्या वयातच नोकरी धरली.’’
तात्या मध्येच बोलायचे थांबले. आता आकाशात चंद्र खूप वर आला होता. एवढे टिपूर चांदणे मी माझ्या उभ्या जन्मात कधी पाहिले नव्हते. मी तात्यांकडे पाहिले. त्यांचे डोळे भरून आले होते. दूरवर दिसणार्या शेताकडे पाहात ते म्हणाले, ‘‘आणि शिरु, तुला सांगतो, खरोखरच आम्ही पाच वर्षांच्या आत आपली शेतं हिरवीगार करून टाकली.’’ मी खूप वेळ तिथेच जोत्यावर सुन्नपणे बसून राहिलो. तात्या उठून घरात कधी गेले तेसुद्धा मला कळले नाही. ‘‘तात्या, तुम्ही दोघांनी आपल्या गावातले मळेच काय पण मराठी सारस्वताचा सारा परिसरच हिरवागार करून टाकलात !’’ मी स्वतःशीच विचार करत राहिलो.
केवळ इंग्रजी चौथीपर्यंत शिकलेल्या या दोघा बंधूंनी आपल्या लेखणीच्या बळावर दोन वेळा मराठी साहित्य शारदेची पालखीमाडगूळकरांच्या दारात आणली. १९७३च्या यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य सेंलनाचे अध्यक्षपद अण्णांनी भूषविले. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी १९८३च्या आंबेजोगाईच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तात्या विराजमान झाले. एकाच आईच्या कुसेतून जन्माला आलेल्या दोन बंधूंची अखिल भारतीय साहित्य सेंलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हे कुठल्याही भारतीय भाषेच्या इतिहासातील एकमेव उदाहरण असावे.
१४ डिसेंबर १९७७ रोजी अण्णा गेले. तर २८ ऑगस्ट २००३ रोजी तात्याही पंचतत्त्वात विलीन झाले. पण जाताना गवताचे पातेसुद्धा नउगवणार्या ओसाड माळरानांनी वेढलेल्या माणदेशाच्या या दोन महान सुपुत्रांनी मराठी प्रांगणात चंदनी केशराचे मळे फुलवले. धाकटी पाती…थोरली पाती मराठी साहित्यातील ‘अक्षरलेणी’ ठरली.
— श्रीधर माडगूळकर
Leave a Reply