पुणे शहराची महती जगाच्या कानाकोपर्यांत विविध कारणांमुळे पसरलेली आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी, निवृत्तांच्या निवासांचे नंदनवन, पेशवेकालापासूनचे ऐतिहासिक महत्वाचे शहर, महाराष्ट्राचे व देशाचे भूषण ठरलेल्या शिक्षणसंस्थांचे मातृशहर, पर्यटकांचे आकर्षण, देशाच्या औद्योगिक नकाशावरील कारखानदारीत महत्वाचे योगदान असणारे शहर, इत्यादी इ.
प्राचार्य आगरकरांचे हे घर म्हणजे १८९० च्या सुमारास बांधलेली, लकडी पुलाच्या पलीकडच्या गवताच्या गंजीच्या माळरानावरील झोपडी होय. भर डेक्कन जिमखान्यावरील अत्यंत गर्दीच्या परिसरात असूनही अचंबा वाटावा असा फर्ग्युसनमधील हा शांत व अभ्यासाला पोषक परिसर पाहिला की, आपला दृष्टिकोनच बदलतो. दगडी बांधकामाचा हा कौलारू बंगला ब्रिटिश काळातील वास्तुशास्त्राची साक्ष देतो. अतिशय प्रशस्त आवार, परिसरातील हिरवी गर्द झाडी, दारातील आकाशापर्यंत भिडलेली बुचाची झाडे, डौलदार आम्रवृक्ष, रॅंग्लर परांजपे यांनी लावलेला फणस, याशिवाय चिंच, आवळा, पांगारा इ. वृक्ष तसेच घरात प्रवेश केल्यावर पुढची व मागची ओवरी, बैठकीची खोली, दोन्ही बाजूंना ऐसपैस खोल्या, मागे माजघर, धान्य साठवणीची खोली, अशी रचना म्हणजे खास खानदानी घर होय. घरातील आढ्यापर्यंतची भव्य उंची, सर्व खोल्यांचे ऐसपैस आकारमान, काचेच्या कौलामुळे येणारे प्रकाशाचे झरोके, जुन्या पद्धतीच्या जाड-जाड कड्या व कोयंडे, मातीच्या मजबूत भिंती, खिडक्यांची फूट-दीड फूट खोली, दारांवरील गोलाकार नक्षीच्या कमानी इ. गोष्टी जुन्या वास्तुशास्त्राचे पुरावे देतात. गोपाळराव आगरकरांच्या घाराच्या म्हणून काही ऐतिहासिक संदर्भाची जपणूकही अद्याप येथे केलेली आहे. स्वयंपाकघरातील दुभत्याचे कपाट, चुलीवरील धुराडे, दगडी उखळाची जागा, इ. गोष्टी वर्षानुवर्षे टिकवून ठेवलेल्या आहेत. “सुधारक” वर्तमान पत्राचे येथुनच केलेले लिखाण, टिळक-आगरकरांची झालेली शेवटची भेट, मृत्यूनंतर आपला भार इतरांवर पडू नये म्हणून आगरकारांनी जवळ ठेवलेली पैशाची पुरचुंडी इ. संदर्भ ऐकल्यावर प्रत्येकाला शहारून येईल.
येथील वास्तव्यात पहाटेपासून रात्रीपर्यंतचे एक वेगळेच निसर्गचक्र मी अनुभवलेले आहे. पहाटेच्या वातावरणातील पक्ष्यांचे कूजन, अधूनमधून शेजारच्या लेडिज हॉस्टेलमधून ऐकू येणारे नाट्यमधुर गायनाचे रियाझाचे स्वर, सतारीचे आलाप, इ. मुळे वातावरण उल्हसित होते. दुपारच्या उन्हात हिरव्यागर्द झाडांच्या छायेमुळे तर सायंकाळी व रात्रीच्या शांत गंभीर वातावरणामुळे अभ्यासला, चिंतनाला पोषक वातावरण आपोआपच लाभते. दारातील बुचाची झाडे ताठ मानेने जगायला व आयुष्यात प्रचंड उंची गाठायला सुचवतात, तर बांबूच्या वनातील वाजणारे कोवळे बांबू गुढीपाडव्याच्या स्वागताला आम्ही सज्ज आहोत, हे सुचवितात. पावसाळ्यातील गर्द हिरवी झाडी व बुचाच्या व गुलमोहराच्या फुलांचा पडणारा गालिचा तर, पानगळीच्या मोसमात भिरभिरत जमिनीवर पडून आपली कारकीर्द गतिमानतेत संपविणारी पाने बरेच काही शिकवून जातात. परिसरातल्या आंबा, फणस, चिंच आणि आवळ्यांची मेजवानी आमच्याकडे येणार्या कित्येक पाहुण्यांनी अनुभवलेली आहे. या सार्या रम्य वातावरणात माझी पी.एच.डी. पूर्ण न होती तरच आश्चर्य ! आता आम्ही कुटुंबीय ही वास्तू सोडून बी.एम.सी.सी.च्या परिसरात रहायला जाणार. ही वस्तुस्थिती काही वेळा अस्वस्थ करते, परंतु आमचे येथील वास्तव्य खूप आनंदाचे व प्रेरणादायी झाले, हे निश्चित. १९ व्या शतकात बांधलेल्या या वास्तूत २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकात राहण्याचा तर, यानंतर २० व्या शतकात बांधलेल्या वास्तूमध्ये २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून राहण्याचा योग आहे, याचे आम्हांला मनापासून समाधान वाटते.
— डॉ. संजय कंदलगावकर
Leave a Reply