आज ”फादर्स डे”. हे असे डे वगैरे साजरे करण्याचं फॅड तसं नवीनच. खरंतर आई-वडीलांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी एकादा दिवसच कशाला हवा? वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेम असतंच… ते व्यक्तही होत असतं.
नवा जमाना! दुसरं काय? पण तेही असो.
या “फादर्स डे” निमित्तानं
कोणत्यातरी पेपरमध्ये “दमलेल्या बाबाच्या गाण्या”बद्दल वाचलं. या गाण्यातला बाबा त्याच्या कामात गुंतल्यामुळं मुलांकडे लक्ष देउ शकत नाही… तो घरी येतो तेव्हा मुलं झोपलेली असतात वगैरे वगैरे. फार सुंदर गाणं आहे यात शंकाच नाही….काही वेळा तर डोळ्यात पाणी येतं.
हा बाबा बिचारा स्वत:ची सुखदु:ख विसरुन, प्रसंगी स्वत:च्या आवडी-निवडींना मुरड घालून मुलांसाठी सगळं करतो. पण या बाबाचीही एक वेगळीच व्यथा आहे. कोणी समजून घेईल का?
त्याला त्याच्या मुलांशी बोलायलाच मिळत नाही. तो बिझी आहे म्हणून नाही…. तर मुलं बिझी आहेत म्हणून. आजकाल सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण तर सोडाच, रात्रीचंही जेवण एकत्र घेणं हे डाऊनमार्केट झाल्यासारखं झालंय. मुलांना आई-बाबांबरोबर जेवायला बसायला आवडत नाहीय का? फिरायला किंवा पिकनिकलासुद्धा आईबाबांबरोबर जायला उत्सुक नसते आजची पिढी.
मोबाईल, फेसबुक, ऑर्कुट, चॅट, सर्फिंग यातच गढलेल्या या मुलांना आपल्या बाबाकडे बघायलाही वेळ नसतो. बाबाचे आणि आईचेही प्रश्न तर त्यांना कटकटीसारखेच वाटतात.
पूर्वी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हायचा, वकीलाचा वकील. दुकानदाराचा मुलगा दुकानदारीच करायचा. आता मात्र इथेही परिस्थिती बदललेय. बाबाने मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायातही आजची नवीन पिढी त्याला साथ द्यायला तयार नसते. बाबाच्या उद्योगात न जाता बाहेरच्या जगात कुठेतरी नोकरी करण्याचा कलही वाढलाय. पिढीजात धंदा सांभाळणे हा खरंतर गुजराती माणसांचा स्थायीभाव. मराठी माणूस धंद्यात आत्ता-आत्ता पडायला लागलाय. बाबा मराठी असो की गुजराती, त्या बाबाला
मुलांची साथ मिळत नाही.
मान्य आहे की नव्या पिढीचं विश्व वेगळं आहे. मान्य आहे की बाबाचे विचार जुनाट असतील. मान्य आहे की नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे. पण म्हणून आपण हे सगळे पाश्चिमात्य “डे” साजरे करता करता पाश्चिमात्य संस्कृतीत गुरफटून जाउन आपली संस्कृती विसरुन जाणार आहोत का? एकत्र कुटुंब हे आता फक्त टिव्हीवरच्या मालिकांतच दिसणार आहे का?
दमलेल्या बाबाची आणि दमलेल्या आईचीही माफक अपेक्षा इतकीच असेल की आपल्या पिल्लांनी आपल्यासाठी दिवसातून निदान एकादा तास तरी काढावा. एकत्र बसावं, गप्पा माराव्या…. चूक आहे का ही अपेक्षा?
दमलेल्या बाबाची ही व्यथा कोण मांडणार आणि कोण त्याला समजून घेणार?
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply