नवीन लेखन...

दहशतवाद्यांशी समझोत्याची संभाव्य दिशा



अमेरिकेने पाकला दिलेल्या इशार्‍यानंतरही दहशतवाद्यांच्या हालचाली थांबल्या नाहीत. अफगाणिस्तानात आय.एस.आयचे अधिकारी भारतविरोधी हालचालीसाठी दहशतवादी गटांना मदत करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांशी न्याय्य अटीवर समझोत्याचे प्रयत्न सुरू ठेवायला हवेत आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत आणायला हवे. पण याबाबत कायम आशावाद न बाळगता पावले टाकणेही महत्त्वाचे

आहे.

२६ नोव्हेंबरच्या मुंबई बाँबस्फोटातील मुख्य आरोपी कसाबला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावली असली तरी त्यामुळे दहशतवाद्यांवर काही परिणाम होऊन त्यांच्या हालचाली कमी झालेल्या नाहीत. त्याबरोबरच आय. एस. आय. या पाकच्या हेर संघटनेकडून दहशतवाद्यांना होणारी मदतही कमी झाली नाही. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स चौकातील दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसला. त्याचे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी धागेदोरे असल्याचा पुरावा मिळाल्यावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला. या इशार्‍याचाही फारसा परिणाम झाला नसल्याचे अफगाणिस्तानातील आय. एस. आय. च्या हालचालीवरून दिसून आले आहे.

भारतविरोधी हालचाली

अफगाणिस्तानातील भारतविरोधी हालचाली कोठून चालतात याचा अफगाण सुरक्षा अधिकार्‍यांनी शोध घेतला. त्यावेळी पाकिस्तानातील वायव्य सीमा प्रांतात कोहार येथे मिलिटरी कॅन्टोमेन्टमध्ये आय.एस.आयचे एक केंद्र आहे. तेथून मेजरच्या दर्जाचे दोन अधिकारी दहशतवादी गटांच्या हालचाली सुनियंत्रित करण्याचे काम करतात, असे दिसून आले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी नुकतीच वॉशिग्टनला भेट देऊन दहशतवादविरोधी मोहिमेसंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपल्याबरोबर आयएसआयच्या भारतविरोधी हालचाली संबधीचे पुरावे नेले होते. यावर दोन्ही नेत्यांनी चर्चाही केल्याची बातमी आहे. पण आयएसआयच्या भारतविरोधी हालचाली थांबणार नसतील तर हिलरी यांच्या कडक इशार्यास काय अर्थ राहिला, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पाकिस्तानला भारतापासून नव्हे तर त्यांच्याच देशातील दहशतवादाच्या कर्करोगापासून धोका आहे, अशा आशयाचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच केले. थोडक्यात भारताकडून असलेल्या

धोक्याबद्दल चिंता न बाळगता पाकिस्तानने आपल्या देशातील दहशतवादी गटांविरुद्ध कडक उपाय योजले नाहीत तर हा दहशतवादीरुपी कर्करोग पाकिस्तानचाच बळी घेईल. हे पाक नेत्यांनी लक्षात घ्यावे, असे ओबामा यांना सांगायचे आहे. कोणताही विकार आटोक्यात असेल तरच त्यावर प्रभावी उपाय योजता येतात. म्हणून दहशतवादाविरुध्द वेळीच कडक पावले उचलायला हवी आहेत. पाकमधील दहशतवादी गटांच्या हालचाली थांबत नाहीत, याचे कारण काही लष्करी अधिकारी आणि आयएसआय संघटनेला दहशतवाद्यांनी आतून पोखरले असताना आपण त्यांच्याविरुध्द निर्णायक विजय मिळवू अशी पाकच्या सत्ताधार्‍यांना खात्री वाटत नाही. ‘मला सत्तेवरून हटवले तर देश दहशतवाद्यांच्या हाती जाईल’ अशी धमकी जनरल मुशर्रफ यांनी दिली होती. लोकशाहीचा बाह्य डोलारा टिकवणारे राजकीय नेते दहशतवाद्यांशी यशस्वी सामना करू शकणार नाहीत असे त्यांचे भाकित होते. तसा अनुभव गेल्या काही महिन्यातील दहशतवाद्यांच्या वाढत्या हालचालींवरून आला आहे.

पाकमधील सत्ताधार्‍यांची पुढची पावले आपली सत्ता टिकवण्याच्या दिशेने पडण्याची शक्यता दिसत आहे. दहशतवादी गटाच्या नेत्यांना सत्तेत प्रत्यक्ष वाटा द्यायचा नाही, पण काही बाबतीत त्यांच्या कलाने धोरण चालवायचे, त्यांच्या नेत्यांविरूद्ध कडक कारवाई करायची नाही. पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी गटांच्या हालचाली चालू द्यायच्या नाहीत, हे अमेरिकेस दिलेले आश्वासन पाळायचे. पण केवळ तांत्रिकदृष्ट्या. आयएसआयने आपल्या हालचाली आझाद काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या टोळीवाल्यांच्या प्रदेशात आणि बांगला देशात यापूर्वीच हलवल्या आहेत. टोळीवाल्यांच्या प्रदेशावर तांत्रिकदृष्ट्या पाकची सत्ता असली तरी प्रत्यक्षात तो प्रदेश नेहमीच अनियंत्रित राहिला आहे. ब्रिटिशांचे काळातसुद्धा तो अनियंत्रित होता. तेथे टोळी प्रमुखांचेच राज्य चाले आणि अजूनही चालते.

समझोत्याच्या प्रयत्नांना खीळ

दहशतवादी गटांच्या नेत्यांनाही समझोत्याच्या प्रयत्नांची दिशा, त्यांच्या मर्यादा समजल्या आहेत. आपण अस्थैर्य, अराजक आणि दहशत निर्माण करू शकतो, पण स्थिर राजवट निर्माण करू शकत नाही, हे त्यांना अफगाणिस्तानात दिसून आले आहे. लोकशाहीचा बाह्य डोलारा मान्य करायचा, पण धोरणावर आपली पकड ठेवायची अशा समझोत्यास ते तयार होतील. पण सौदी अरेबियाच्या धर्तीवर इस्लामी राजवटीस अमेरिकेचाही विरोध असणार नाही. पेहरावाच्या रूपाने इस्लामी संस्कृती टिकवायची पण प्रत्यक्षात आधुनिक पद्धतीची अमेरिकन आणि पाश्चात्य राहणी स्वीकारायची असा मार्ग निघू शकतो. तसेही आता कुराणप्रणीत मध्ययुगीन क्रूर शिक्षा कालबाह्य झाल्या असून त्या रद्द करणे दहशतवादी गटांच्या नेत्यांनाही मान्य करावे लागेल. या गटाच्या नेत्यांनी दहशतवाद सोडण्याच्या अटीबरोबर लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची तयारी दर्शवायला हवी. पण तसा केवळ बाह्य देखावा नको.

अमेरिका जाळण्याची धमकी

अमेरिका अफगाणिस्तानात दहशतवादाविरुद्ध मोठी मोहिम हाती घेत आहे. पाक-अफगाण सीमा भागातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अमेरिकेने हल्ले वाढवले तर त्याला उत्तर म्हणून दहशतवादी गटांचे नेते आपले हल्ले वाढवून अमेरिका जाळण्याची धमकी देत आहेत. इतर ठिकाणीही ते हल्ले वाढवत आहेत. मुंबई बाँबस्फोटाच्या धर्तीवर इंडोनेशियात स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी इराकमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले वाढले आहेत. इकडे आसाममधील आणि ईशान्य भारतातील नागा आणि बोडो टोळीवाल्यांशीही दहशतवादी गटांचे संबंध असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र वन खात्याचे अधिकारी विलास बर्डेकर आसाम आणि ईशान्य भारतातील राखीव वनभागात फुलपाखरांची छायाचित्रे काढण्यासाठी गेले असता बोडो टोळीवाल्यांच्या नेत्यांनी त्यांना पळवून नेले. या बोडो टोळीवाल्यांचे पाक दहशतवाद्यांशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत निश्चित पुरावा मिळाला नसला तरिही संशयाला जागा ठेवण्यासारखी परिस्थिती आहे. यावरुन दहशतवादाचे जाळे किती दूरवर पसरले आहे हे दिसते.भारतातील माओवादी आणि नक्षलवाद्यांचेही बाहेरच्या दहशतवादी गटाशी संबंध आहेत. माओवादी आणि नक्षलवादी त्यांच्याकडून पैसा आणि शस्त्रे मिळवतात. दहशतवादी अफूसारख्या मादक पदार्थाचा चोरटा व्यापार करतात आणि त्यातून पैसा तसेच शस्त्रेही मिळवतात.

भारतातील काही शहरे दहशतवाद्यांच्या यादीवर आहेत. मुंबईवरचा हल्ला समुद्रमार्गे झाला

हे लक्षात घेता किनारपट्टीच्या सुरक्षिततेबद्दलही अधिक जागरूकता राखायला हवी. दहशतवाद्यांविरुद्ध केवळ पोलिस कारवाई पुरेशी नाही. तरूणवर्ग बेकारीमुळे दहशतवाद्यांच्या गोटात जाण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा बेकारी आणि दारिद्र्य निवारण्याचा कार्यकालही निर्धाराने अंमलात आणून त्यासाठी आखलेल्या य
जना संबंधितांपर्यंत पोहोचतील याची दक्षता घ्यावयास हवी. नागरिकांनीही जागरूक राहून संशयित व्यक्तींना आसरा देण्याचा गहाळपणा करू नये. अशा पध्दतीने सर्व आघाड्यांवर सतत जागरूकता राखल्यासच दहशतवादास आळा घालणे शक्य होईल.(अद्वैत फिचर्स)

— वा. दा. रानडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..