आम्ही सकाळी उठतांच ईश्वराचे स्मरण करतो. रात्रभर त्याने आमचे संरक्षण केले ह्याचे आभार मानतो. आम्ही आपली बोटे चाळवतो. ‘ कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम ‘ ही प्रार्थना म्हणतो.
एक समज आहे की ईश्वराने आपणास प्रत्येकाला शंभर वर्षाचे आयुष्यमान दिलेले असते. खाणे, पिणे, झोपणे, फिरणे, गप्पा करणे, व्यायाम, दुखणे-खुपणे, शिक्षण, शाळा कॉलेज, नोकरी, व्यवसाय, संसार, मुले, नातवंडे, इत्यादी हे सर्वसाधारण जीवनाचे चक्र.
त्यातील त्याच्याच इशारय़ाने हे सारे नव्वद वर्षांत पूर्ण करण्यासाठी असते. ह्या सर्व जीवनाच्या पायरय़ा आहेत आणि सर्वजण त्या आपआपल्या ताकदीने, क्षमतेने, समजूतीने करीत असतो. त्यामुळे ह्या चक्ररुपाने असतात. नैसर्गिक असतात.
जीवनाची दहा वर्षे मात्र त्याने आम्हास आमच्या पद्धतीने, समजुतीने, खर्च करण्यास मुभा म्हणून दिलेली आहेत. जणू ते आपले पाकीट मनी. व्यक्तीचे व्यक्तीमत्व, कर्तबगारी, मोठेपण, महानता आणि जीवनांत त्यानी केलेला त्याग, संकल्पसिद्धी, इतिहासांत उमटलेला एक ठसा. हे ज्याने त्याने आपल्या पद्धतीने ठरवायचे व मिळवायचे असते. ह्यात ईश्वरी हस्तक्षेप मुळीच नसतो. ह्याचसाठी त्याला मिळालेले हे विषेश दहा वर्षे तुमच्या प्रार्थना आणि तुमची बोटे ह्याचीच सतत आठवण देतात.
एकदा प्रसिद्ध थोर वैज्ञानिक अलबर्ट आइन् स्टाईन म्हणाला होता की माणसे आपल्या क्षमतेच्या फक्त दहा टक्केच जीवनात कर्तबगारी करतात. खरे बघीतले तर त्यांची क्षमता बरेच कांही करु शकणारी असते. परंतु ते अजाणतेने आपला वेळ दवडतात.
वैद्यकियशास्त्र देखील हेच सांगते की मनुष्य प्रत्येक कामामध्ये त्याला असलेल्या मेंदूच्या क्षमतेच्या फक्त दहा टक्केच मेदूचा वापर करीत असतो.
श्री समर्थ रामदासानी म्हटले आहे की मरावे परी किर्तीरुपे उरावे. आपण स्वतःहाचा विकास किती केला, किती कमाई केली, ह्यापेक्षा आम्ही जे कांही इतरांसाठी थोडेफार करुं तेच जगाच्या आठवणीच्या कप्यांत घर करते. आयुष्याचा नव्वद टक्के काळ हा केवळ स्वतःहासाठीच असतो. दहा टक्के मात्र इतरांसाठी व्यतीत करावा ही अपेक्षा.
हा दहा वर्ष हिशोब तुमच्या शेवटच्या क्षणाला समाधानाची, शांततेची झालर निर्माण करतो. तुमचे मनच सांगते की मी जीवनांत धन्य झालो. जीवनातील दहाचे महत्व, त्या काळाची आठवण सतत यावी हाच आपल्या बोटांकडे लक्ष देण्याचा हेतू.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply