31 ऑगस्ट 1944 रोजी ब्रिटिश गुयानातील क्वीन्सटाऊनमध्ये क्लाईव ह्युबर्ट लॉईडचा जन्म झाला. ‘बिग C’ हे त्याचे टोपणनाव. लॉईडची सार्थ आठवण क्रिकेटच्या मैदानात वेस्ट इंडीजची दादागिरी सुरू करणारा कर्णधार म्हणूनच राहील. विजयाचे अजब रसायन बेरकीपणाने सिद्ध करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही.
इतर फलंदाजांपेक्षा काहीशी जड बॅट तो वापरत असे. 110 कसोट्यांमधून 19 शतकांसह 46.67च्या पारंपरिक सरासरीने त्याने 7,515 धावा जमविल्या. या 110 पैकी 74 कसोट्यांमध्ये तो कर्णधार होता. या चौर्याहत्तरपैकी 36 कसोट्या विंडीजने जिंकल्या आणि केवळ 12 गमावल्या. याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत ओळीने 27 कसोट्यांमध्ये पराभव न स्वीकारण्याचा विक्रम विंडीज संघाने केला होता. 1984मध्ये लॉइडच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडला ‘कृष्णस्नान’ घातले. एखाद्या संघाने मालिकेतील सर्व सामने जिंकल्यास त्याने प्रतिस्पर्ध्याला ‘धवलस्नान’ घातले (व्हाईटवॉश) असे म्हणण्याची प्रथा आहे. गुडघेदुखीने बेजार होण्यापूर्वी तो कव्हरमधील एक चपळ क्षेत्ररक्षकही होता.
31 ऑगस्ट 1968 हा दिवस विसरण्यासाठी काहीही करण्याची जगातील एका माणसाची तयारी असेल. त्याचं नाव माल्कम नॅश. ग्लॅमॉर्गनकडून खेळताना काऊन्टी सामन्यात या दिवशी तो आपली नेहमीची मध्यमगती गोलंदाजी सोडून फिरकी गोलंदाजी करीत होता. नॉटिमगहमशायरच्या गॅरी सोबर्सने त्याच्या एका षटकातील समग्र कंदुके सीमारेषेवरोनिया दिगंतात धाडिली. पंचम कंदुक रॉजर डेविस नामक क्रीडकाच्या करांमध्ये विसावला खरा पण तोलभंगाने कंदुकासह तो मर्यादारेखा स्पर्शिता झाला. सांप्रत अचाट लीलेची दृकश्राव्यफीत इये संकेतस्थानी असे : [youtube aWA7wYKcPGo]
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply