नवीन लेखन...

दिल्लीतील मराठी पाऊलखुणा

सुमारे १४८३ चौ.कि.मी. वसलेल्या दिल्ली शहराची लोकसंख्या २०११ च्या जणगणनेनुसार १,६७,५३,२३५ इतकी असून हिंदी, पंजाबी, व उर्दू या येथील प्रमुख भाषा आहेत. दिल्लीने आतापर्यंत अनेक वंशांची राज्ये उदयाला आलेली पाहिली तसेच त्यांचा अंतही पाहिला. अनेक राजवटींच्या अनेक खुणा ऐतिहासिक वास्तुच्या स्वरूपात आजही पहावयास मिळताता. असे म्हटले जाते की, महाभारतात

ज्या इंद्रप्रस्थ शहराचा उल्लेख आहे ते शहर म्हणजे दिल्लीच, आजच्या आधुनिक, रेखीव दिल्लीची रचना इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञ एडविन ल्युटिन याने केली. त्यांनी उभारलेल्या या नव्या दिल्लीने डिसेंबर २०११ मध्ये शंभर वर्ष पूर्ण केले आहे. बाकीच्या भागात वसलेले आहे ते जुने दिल्ली शहर.

दक्षिणेकडून येणाऱ्या गाडीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा त्यापूर्वी टिळक ब्रिज व शिवाजी ब्रिज ही खास मराठी नावे गाडीतील मराठी माणसाचे स्वागत करतात व दिल्लीबाबत उपरेपणाची भावना प्रवेश केल्यापासून नाहीशी होते. नवी दिल्ली स्थानकातून बाहेर पडताच अजमेरी गेट बाजूला मिंटो ब्रिजनजिकचा छत्रपतीच्या पुतळा व पहाडगंज विभागात असलेला बाळकृष्ण मुंजे यांचा पुतळा पहिल्यानंतर आपण महाराष्ट्रातच तर नाही ना, असे वाटते.

दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.

पानीपतच्या युध्दानंतरही, १७८२ मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली आणि मराठेशाहीचे सुवर्णयुग दिल्लीत अवतरले. दिल्लीपर्यंत येऊन मोगलांशी टक्कर देऊन वर्चस्व प्रस्थापित करण्याची किमया फक्त मराठी माणसांनीच दाखविली. महादजी शिंदे यांच्या बरोबर रघुनाथ कुलकर्णी, त्यांचे बंधु गोपाळराव, कृष्णराव, मल्हारअप्पा खंडेराव, अंबुजी इंगळे, रामजी पाटील, रामजी जाधव, बाळाजी गुळगुळे अशा त्या काळातील अनेक कर्तबगार प्रमुखांची नावे इतिहासात आढळतात. इंग्रजांनी आधुनिक शस्त्रे, नवीन विचारधारा, नवीन युद्धनीती वापरून १८०३ साली मराठयांचा पराभव केला. इंग्रज व मराठी सैन्याची दिल्लीमध्ये ज्या परिसरात लढाई झाली, तो परिसर अजूनही बाडा हिन्दुराव या नावाने ओळखला जातो. चांदणी चौकातील अप्पाजी गंगाधर यांनी बांधलेले शिवालय आजही मराठे शाहीची साक्ष देते, मराठी सैन्याचा तळ पडला होता तो येथील तालकटोरा भाग हा मराठी इतिहासाची साक्ष आहे. कालकाजी मंदिराच्या परिसरात मदनगीर म्हणजेच महादजींची गढी होती. दिल्लीतील आद्य मराठी माणसांच्या या पाउलखुणा होत.

स्वातंत्र्यलढयात दिल्ली येथे मराठी बाणा दिसून येतो. घटनेचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो ते डॉ. बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांनी भारतीय संविधान सभेच्या घटनासमितीचा अध्यक्ष पद सांभाळून भारताला समता, स्वातंत्र्य, न्याय बंधुत्वादी संविधान अर्पण केले. त्यांनी आपल्या लेखणीने दिल्लीतच नव्हेतर जगात किर्ती मिळविले. विविधतेत नटलेल्या भारताला सविंधानअंतर्गत एकरूपी माळेत विणले. महाराष्ट्रातील प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची केंद्रातील कारर्कीद नेहमीच अविस्मरणीय आहे. महाराष्ट्रातून जेव्हा-जेव्हा केंद्राला नेतृत्व देण्याची वेळ आली त्या-त्या वेळी महाराष्ट्राने आपले नेतृत्व केंद्राला अर्थातच दिल्लीला दिले आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापनाही १९६० पासून दिल्लीत झाली. दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींच चित्र राज्यात सकारात्मकरित्या उमटविण्याची जबाबदारी मागील पन्नास वर्षापासून हे कार्यालय पार पाडीत आहे.

लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या थोर महापुरूषांचे पुतळे बघुन सर्वसामान्य मराठी माणसांना अभिमान होईल असेच हे चित्र आहे. आधुनिक महाराष्ट्राची ओळख फुले-शाहु-आंबेडकरांच्या चळवळीमुळे निमार्ण झाली आहे. या चळवळीचे या तीन महापुरुषांच्या प्रतिमा संसदेच्या परिसरात पाहतांना आनंद आणि अभिमान दोन्ही दाटून येतो याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक शिवाजी महाराज यांचा मराठी बाणा असणारा पुतळा ही येथे आहे.

मराठी माणूस दिल्लीमध्ये करोलबाग, पहाडगंज, नया बाजार अशा भागात एकत्रितपणे राहातो त्यांच्यासाठी स्व. काकासाहेब गाडगीळ यांच्यासारख्या अनेक द्रष्टया मराठी नेत्यांच्या पुढाकाराने नूतन मराठी विद्यालय, चौगुले शिशुविहाराच्या इमारती दिल्लीत मोक्याच्या जागी उभ्या राहिल्या, दिल्लीमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेल्या पहाडगंज भागातील बृहन्ममहाराष्ट्र भवनाची इमारत, त्यासमोरचे महाराष्ट्र रंगायन हे भव्य नाटयगृह रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. जनकपुरी भागातील दत्तमंदिर, रामकृष्ण पुरम भागातील विठ्ठल मंदिर लोधी रोडवरील वनिता समाज ही पण दिल्लीतील मराठी माणसांची एकत्र येण्याची सध्याची ठिकाणं आहेत. सर्वसाधारणपणे दिल्ली व आसपासच्या परिसर मिळून अंदाजे अडीच लाख मराठी माणसं आहेत.

येथील कोपर्निकस मार्गावरील राज्य शासनाचे महाराष्ट्र सदन व नजिकच्याच कस्तुरबा गांधी मार्गावरील बांधले जाणारे नविन महाराष्ट्र सदन आता नव्याने कात टाकत आहे. दिल्लीतील रस्त्‍यांना दिली गेलेली महाराष्ट्राच्या महापुरूषांची नावे तसेच या पुरुषांचे ठिकठिकाणी उभारलेले पुतळेही दिल्लीतील महाराष्ट्राची साक्ष देताना आढळतात.

महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..