दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.
प्रश्न- दिवाळी या सणाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा काय आहे?
या दिवशी नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असताना ज्याला शेतकर्यांचा राजा म्हणून गौरविले आहे त्या बळीराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सवदिन आपण मानतो. व्यापार, उद्योग यांचे नवे वर्ष त्या दिवसापूसन सुरु होते. आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यानंतर दुसर्या दिवशी व्यापारे वसते लक्ष्मी. हे वचन सार्थ करण्यासाठी लक्ष्मीपूजनानंतर लगेचच लक्ष्मीने व्यापारात यश द्यावे म्हणून आपण व्यापाराच्या नव्या वर्षाचे नवे पर्व सुरु करतो. बलिप्रतिपदेच्या नंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. दिवाळीच्या प्रारंभी धनत्रयोदशीला यमराजाच्य नावाने दिवे लावून आपण यमराजाचे एक प्रकारे स्मरण केले. आपण भाऊबीजेला यमव्दितीया असे म्हणतो. कारण यम आपल्या बहिणीकडे या दिवशी भोजनास गेला अशी श्रद्धा आहे. या दिवशी बहीण असलेल्या कोणाही भावाने आपल्या घरी भोजन न करता बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे, अशी परंपरा आहे. म्हणजे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आरोग्य, पराक्रम, धनसंपदेची उपासना, व्यापार, उद्योग आणि भाऊ-बहिणीच्या गोड पारिवारिक नात्याचा मधुर संगम असे पाच दिवस आपण दिवाळी साजरी करतो.
प्रश्न- दिवाळी हा सण ऐक्याचा सण आहे यामध्ये धार्मिक आचारणाला किती महत्त्व आहे का?
विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे. विक्रम संवताचे नवे वर्ष सुरु होताना सर्व आसमंत तेजाने उजळून टाकणारा, दाहीदिशांतून दरवळणार्या सुंगधाने मनामनात प्रसन्नतेची कारंजी फुलविणारा सण आहे. फराळांच्या गोड पदार्थांनी गोड झालेल्या तोंडाने परस्परांना गोड गोड शुभेच्छा देण्याघेण्याचा हा आणि यासारखा हाच सण आहे.
प्रश्न- दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे असले तरी पर्यावरणसंवर्धनासाठी हा सण कसा पूरक आहे?
दिवाळीत कौटुंबिक आणि सामाजिक आनंदाची देवाणघेवाण करुन आपण एकमेकांबद्दल मनात असेलेली किल्मिषे, दुजाभाव दूर करुन मने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, निदान तो केला जावा, अशी अपेक्षा असते आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी या दीपावलीच्या मंगल दिवसांत रोज अभ्यंगस्नान परंपरेने सांगितले आहे. दिवाळीपासून थंडी विशेष प्रमाणात वाढू लागते. म्हण्नू अंगाला तेल लावून केलेले स्नान आपली त्वचा थंडीमुळे शुष्क होऊ देत नाही. यासाठी दिवाळीत तेलाने अंगमर्दन करुन नंतर उटणे लावून गरम पाण्याने स्नान करण्याची परंपरा आहे. आपल्याकडे स्नानाला विशेष महत्त्व आहे. इतर अनेक धर्मात आणि धर्मग्रंथात ते ते कधी आठवडय़ातून एकदा स्नान, तर कधी नुसतेच कोपरापर्यंत हात आणि पाय धुणे, तर कधी थंडीमुळे स्नानाला फाटा देऊन नुसते अंग पुसून घेणे, असे विविध आचार रुढ झाले. मात्र आपल्याकडे आंघोळीसाठी पुरेसे पाणी सगळीकडे नसले तरी बर्याच जागी उपलब्ध होते. मुळात आपल्या पूर्वजांनी वस्ती केली ती नदीच्या व जलाशयाच्या काठावरच. माघस्नान, कार्तिकस्नान अशा विविध प्रकारच्या स्नानपरंपरा आपल्याकडे आहेत. ही स्नानपरंपरा नदीवर जाऊन आंघोळ करणे उत्तम, विहिरीतील पाणी आणून केली जाणारी आंघोळ त्यापेक्षा कमी दर्जाची, तर घरात साठविलेल्या पाण्याची आंघोळ ही आणखी कमी दर्जाची. अशा स्वरुपाची फले याबाबतीत सांगितलेली आहेत. त्यामागे हेतू काय ? प्रत्येकाने आंघोळ व्यवस्थित करावी. नदीवरची आंघोळ सर्वात चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा त्यामागे विचार असावा.एक गोष्ट निश्चित, दीपावली सणाच्या निमित्ताने स्वच्छतेचे, शुद्धतेचे महत्त्व अखिल समाजाच्या मनावर बिंबवणे, असा प्रयत्न आपल्या संस्कृतिने केला आणि तो शेकडो नव्हे, हजारो वर्षे टिकवून धरला. ही स्वच्छता केवळ हिंदूनीच करावी असे नव्हे. हिंदू धर्मातील एखादा चांगला आचार सर वांनीच अनुसरला तर त्यात काही बिघडत नाही. हिंदू धर्मातील आचार आपण इतरांना सांगितले तर तो मोठा गुन्हा होईल, अशी समजूत बाळगण्याचे कारण नाही. दीपावलीतील लक्ष्मीपूजन सर्व धर्माचे लोक आपापल्यापरीने साजरे करतात. मग स्वच्छतेच्या मोहिमा आखणार्यांनी दीपावलीच्या सणाच्या मागचे हे स्वच्छतेचे आणि साफसफाईचे तत्त्व ध्यानी घेऊन पावसाळ्यानंतर दिवाळीनिमित्त सर्वत्र शहरे, रस्ते, गल्ल्या साफसूफ केल्या तर ते चांगले होईल. यंदा जमले नाही तर पुढल्या वर्षी. आणि अर्थातच जुन्या समजुतीप्रमाणे संपन्नतेची देवी अशा ठिकाणी निश्चितच वास्तव्याला येईल, यात काय संशय ? आपल्या प्रकाशाने सारा अंधार मिटवून प्रकाशाकडे म्हणजे सुख-समृध्दीकडे नेणारा हा सण उजळणार्या दिव्याप्रमाणेच लेखानीचा प्रकाश अन्याय अज्ञानाचा अंधकार दूर करतो. त्याप्रमाणेच आपल्या सर्वांच्या जीवनातही दिवाळी फुलवेलं प्रकाश सौख्याचा ! शुभेच्छा !!!…
(महान्यूजच्या सौजन्याने )
Leave a Reply