एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्हाईकांकडे घेऊन जात असे.
कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या गावाकडे जायला निघाला. रस्त्याने जाता-येता भेटणारे लोक गाढवावरील मूर्तीकडे पाहून हात जोडत होते.
गाढवाला वाटले सर्व लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत. त्यामुळे गाढव सुखावले व आणखी ऐटीत चालू लागले. अनेकदा मान हलवून लोकांच्या नमस्काराचा स्वीकार करू लागले. त्या गावी पोहोचल्यानंतर कुंभाराने ती मूर्ती ज्याची होती त्याला दिली व त्याच्याकडून पैसे घेऊन तो पुन्हा आपल्या गावी निघाला.
रस्ता तोच होता. त्या रस्त्यावर पूर्वीचेच लोक होते, मात्र त्यापैकी कोणीही आता गाढवाची साधी दखलही घेत नव्हते. कारण गाढवाच्या पाठीवर आता मूर्ती नव्हती. लोकांनी आपल्याला नमस्कार करावा म्हणून गाढव हळूहळू चालू लागले, तसेच अधूनमधून ओरडू लागले. मात्र त्याचा लोकांवर कसलाच परिणाम होत नव्हता.
गाढवाची मंद चाल कुंभाराच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या जवळची काठी गाढवाच्या पाठीवर सपदिशी मारली आणि तो हसून म्हणाला, “लोकांना देखल्या देवाला दंडवत घालण्याची सवय असते हे तुला ‘गाढवाला’ कसे कळणार ?”
काठीचा मार पडताच गाढव निमूटपणे रस्त्यावरून वेगाने चालू लागले.
Leave a Reply