
देविका राणी चौधरी हे मा.देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला.रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मा.हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या ‘लाइट ऑफ एशिया’ या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन ‘करमा’ नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर ‘स्टार लंडन’च्या समीक्षकाने लिहिले होते की, “देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही”. नंतर हिमांशु रॉय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले. लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशु रॉय मुंबईत आले. लंडनहून चित्रपटाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या हिमांशु रॉय, राजनारायण दुबे आणि देविका राणी यांनी १९३४ मध्ये “बॉंबे टॉकिज’ या संस्थेची स्थापना केली. बॉंबे टॉकिजच्या मुंबईतल्या स्टुडिओत चित्रपट निर्मितीसह ध्वनिमुद्रण, संकलन, कपडेपट, यासह सर्व सुविधा होत्या. या संस्थेच्या तिन्ही संस्थापकांनी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, याचे भान कायम ठेवून सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. त्या काळात चित्रपटात चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातल्या मुलींनी चित्रपटात काम करणे हे सामाजिक अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. गरीब घरातल्या गरजू मुली अभिनेत्रीचे काम करीत. पण त्यांच्याबद्दलही समाजात चर्चा होत असे. मुलांना तर चित्रपट पहायला परवानगीच नव्हती. अशा काळात बॉंबे टॉकिजने चित्रपटसृष्टीला वैभव मिळवून दिले. चित्रपटाबद्दलची जनतेची नजरही बदलून टाकली. प्रेक्षक वर्ग चित्रपटांकडे वळवला. देविका राणी या संस्थेच्या चित्रपटात भूमिका करीत. नंतर त्यांनी हिमांशु रॉय यांच्याशी विवाह केला. “बॉंबे टॉकिज’ ही संस्था फक्त चित्रपट निर्मितीचा स्टुडिओ नव्हता. या संस्थेने हिंदी आणि अन्य भाषातल्या चित्रपटसृष्टीला शेकडो कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री दिल्या. दिलीपकुमार, देवआनंद, केदार शर्मा, सत्यजित रे यांच्यासह अनेक दिग्गजांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश याच संस्थेत झाला. या संस्थेत सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हे मासिक वेतनावर काम करीत असत. हिमांशु रॉय आणि राजनारायण दुबे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या कर्तबगारीने आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीने प्रतिष्ठा मिळवून दिली. अछूत कन्या, बंधन, किस्मत, हम सब एक हैं, जिद्दी यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती याच संस्थेत झाली. अशोक कुमार यांची भूमिका असलेला “किस्मत’ हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. मुंबईतल्या एकाच चित्रपटगृहात सलग ३५० दिवस तो चालला होता. त्या संस्थेत शशधर मुकर्जींचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली, फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. सन १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी व अभिनेता हिमांशू राय यांनी चार मिनिटांचे चुंबनाचे दृष्य दिले होते. (खऱ्या खुऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी होते). हे हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले चुंबन दृश्य असावे. मा.देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशु रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अछूत कन्या’ नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राम्हण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशु रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्या तंत्रभारत सोडून जावे लागले. त्यामुळे हिमांशु रॉय यांना आपले अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. त्यांतच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली. संस्थेचे भागीदार शशधर मुखर्जी यांनी, हिमांशु रॉय यांचे समाज प्रबोधन विषयांवरील चित्रपट करण्याचे धोरण बदलून गल्लाभरू चित्रपट करण्याचे ठरवले. हे देविका राणींना आवडले नाही, त्यांनी चित्रपट संस्थेतून आपली भागीदारी काढून घेतली. त्यांनी पुढे रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिच यांच्याशी विवाह केला आणि ते दोघे बंगलोरमध्ये स्थायिक झाले. १९७० साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मा.देविका राणी यांचे ८ मार्च १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply