1 सप्टेंबर 1908 रोजी आता पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील लाहोरात अमीर इलाहींचा जन्म झाला. एकाच खेळाडूने दोन वेगवेगळ्या संघांकडून कसोट्या खेळणे ही अत्यंत दुर्मिळ (आणि आता जवळपास अस्तंगत झालेली) कामगिरी ज्या काही थोड्यांच्या नावावर आहे त्यापैकी इलाही एक आहेत. भारतात असताना बडोद्याकडून ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. 1947-48च्या हंगामात ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. सिडनी कसोटीत ते खेळलेही (12 ते 18 डिसेंबर 1947). या कसोटीत त्यांनी 4 धावा काढल्या. गोलंदाज म्हणून ते संघात होते पण त्यांनी गोलंदाजी करण्याची वेळच आली नाही. दत्तू फडकर यांच्यासाठीही ती पदार्पणाची कसोटी होती. तथाकथित अखंड भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतर काही काळानंतर इलाही पाकिस्तानात गेले. पाकिस्तानकडून कसोटीची टोपी घालणारांच्या यादीत इलाहींचा क्रमांक पहिला लागतो. 1952-53च्या हंगामात भारता‘सोबत’ दिल्लीत कसोटी सामना खेळून पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटने जन्म घेतला. पाकिस्तानकडून आणखी चार कसोट्यांमध्ये अमीर इलाही खेळले.
1 सप्टेंबर 1976 रोजी एका अॅशेसविजेत्या ब्रिटिश कर्णधाराचा जन्म झाला. क्लेअर कॉनर तिचे नाव. महिलांच्या अहमहमिकांमध्ये 1963पासून ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका न गमावण्याचा पराक्रम केलेला होता. 2005मध्ये क्लेअरच्या नेतृत्वाखालील संघाने कांगारू महिलांना अॅशेस मालिकेत नमविले. डाव्या हाताने क्लेअर मंदगती गोलंदाजीही करीत असे. नॉर्दम्प्टनमध्ये भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात तिने त्रिक्रमही केला (9 जुलै 1999). चॅनल 4वर ती सध्या समालोचकाचे काम करते आहे. इंग्लिश महिला क्रिकेटची जबाबदारीही तिने काही काळ सांभाळलेली आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply