या देशातून त्या देशात… त्या देशातून पुन्हा आणखी कोणत्या देशात… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरासत्र काही संपायला तयार नाही.
एकीकडे देशापुढे महागाई आणि पाकच्या कुरापतींमुळे संरक्षणाचे संकट निर्माण झाले असताना, मोदींनी त्याकडे दुर्लक्ष करून दौèयांचे आयोजन करावे, हे नक्कीच ‘अच्छे दिनङ्क ची लक्षणे नाहीत. मोदी सत्तेवर आले तेव्हा किती अपेक्षा देशवासीयांच्या लागून होत्या. पण शंभर दिवसांत मोदींनी काय केले, तर महागाईत आणखी भर घातली, छान छान भाषणे ठोकली, शेजारच्या देशाला भारताकडून आर्थिक मदत खिरापत म्हणून वाटली… आणखी काही देशांचे दौरे केले आणि सध्या जपानच्या दौèयावर आहेत.
शंभर दिवसांत मोदींनी अपवाद वगळता कोणत्याही विकासाच्या योजना आणि महागाई कमी होईल, अशी पावले उचलली नाहीत. अच्छे दिन, गुजरातसारखा कथित विकास होईल, ही सामान्यांची स्वप्ने अजून डोळ्यांतच आहेत, ती प्रत्यक्षात कधी उतरतील, ही अपेक्षा त्यांना लागून आहे. आल्या आल्या गॅस आणि रेल्वेदरवाढीचा बोझा सामान्य नागरिकांवर टाकल्यानंतर मोदी वाईटातून काही चांगले करतील, अशी अपेक्षा होती. भाषणबाजीने सामान्यांची पोटं भरत नाहीत, हे मोदींना कुणी सांगावे, असा प्रश्न आता सर्वांनाच पडला असेल. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने गोळीबार होत आहे. रोज आपले सैनिक मरत आहेत. त्यावर मोदी ठोस पाऊल उचलतील आणि पाकचे वाकडे शेपूट सरळ करतील, असे वाटले होते. पण इथेही भाषणांपलिकडे मोदींनी काही केले नाही. यापुढे सीमेवर गोळीबार झाला तर खबरदार… अशी तीच ती, नेहमीची रटाळवाणी वाक्ये मोदींकडूनही कानावर आली.
सीमेच्या संरक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न गांभीर्याने न घेता मोदी लगेच जपानला रवाना झाले आहेत. सध्या शेतकèयांत प्रचंड नाराजी आहे. शरद पवार परवडले, असे आता राज्यातील शेतकरी बोलू लागले आहेत. त्यांना किमान शेतकèयांच्या समस्यांची जाणीव तरी होती, पण हायटेक मोदींच्या हायटेक मंत्र्यांना ना सामान्यांशी काही देणे घेणे, ना शेतकèयांशी. त्यामुळे समस्या आहेत तशाच आहेत. शंभर दिवसांनंतरही दिलासादायी असं वातावरण निर्माण करण्यात मोदी सरकारला यश आलंच नाही. जो काही दिलासा मिळाला आहे, तो फक्त उद्योजकांना. ज्यांच्याकडून घेतले (निवडणुकीसाठी निधी) त्यांनाच सध्या दिले जातेय, अशी चर्चा त्यामुळेच सुरू आहे. नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या विधानसभेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. लवकरच महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभेची निवडणूक होणार आहे. मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वाचे परिणाम या निवडणुकांतही दिसतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाले तर पुन्हा महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे सरकार येईल, एवढे मात्र नक्की.
— मनोज सांगळे
Leave a Reply