कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की “सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय” विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली “वर्ल्डकप सचिनपुरताच नाही” असं कपिलदेवचं मत आहे. पुढे कपिलदेव म्हणतो की, सचिन महान खेळाडू असून त्याने भारतीय क्रिकेटची अनमोल सेवा केली आहे, पण स्पर्धेत सचिन एकटाच खेळत नाही, संघापेक्षा तो नक्कीच मोठा नाही. कपिलदेवच्या ह्या स्पष्टवक्तेपणाला सर्वानीच ‘दाद’ आणि सादही द्यायला हवी.
यातील धोनीचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आणि भावनेच्या आहारी जाऊन केलेले आहे असे वाटते. सध्या काय झालय की, सचिनवर स्तुतिसुमने उधळण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. यात कोणीही आपण मागे राहू नये याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
सचिन महान आहे याबाबत कुणाचेही दुमत नाही, पण आता जे काही करायचं ते फक्त त्याच्यासाठीच ही भूमिका इतर खेळाडूंच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करु शकते. कपिलदेवच्या भाषेत सांगायचं तर तो इतर खेळाडूंचा अपमान होईल.
क्रिकेटप्रेमींचा अपमान केला आहे. वर्ल्डकप ही काही एकट्या धोनीची जहागिरी नाही की, त्याने ती सचिनला बहाल करावी. या वर्ल्डकपवर हक्क आहे तो फक्त आणि फक्त लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचाच. जे तुम्हाला डोक्यावरही घेतात आणि निराश झाल्यावर तुमचे पुतळेही जळतात. जितका तुमचा स्वतःवर अधिकार नाही तितका ह्या लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा तुमच्यावर अधिकार आहे. हेच तुमचे मायबाप आहेत हे धोनीनेच काय पण कुणीही विसरून चालणार नाही.
— रमण कारंजकर
Leave a Reply