पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा चिरंजीव अविनाश बागवेला आज पोलिसांनी अटक केली आहे. पुणे महापालिका मतदानाच्या दिवशी, सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० मधून अविनाश बागवे हे काँग्रेसचे उमेदवार होते. या प्रभागात, एसआरए इमारतींमध्ये राहणा-या मतदारांच्या सोयीसाठी तीन मतदानकेंद्रे उभारण्यात आली होती. या इमारतीशेजारीच बागवे यांचं कार्यालय असल्यानं त्यांनी मतदान सुरू झाल्यापासून तिथेच तळ ठोकला आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील रमेश बागवेही या मोहिमेत सहभागी झाले होते. हा प्रकार पाहून संतापलेल्या अन्य उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, या पिता-पुत्रांना १०० मीटर परिसराबाहेर काढण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा अविनाश बागवे यांच्या अरेरावीमुळे या प्रकरणाला हिंसक वळण लागलं होतं. निवडणूक अधिका-यांनी वारंवार विनंती करूनही बागवे त्यांना जुमानत नसल्याचं पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. यात बागवे यांना धक्काबुक्की झाली. त्याचंही त्यांनी भांडवल केलं. पण, झाला प्रकार निवडणूक आयोगाच्या कॅमे-यात बंदिस्त झाला असल्यानं पोलिसांकडे भक्कम पुरावा होता. त्याच जोरावर त्यांनी अविनाश बागवे आणि अन्य दहा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज बागवेला अटक करण्यात आली. दुपारी त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
— मराठीसृष्टी
Leave a Reply