अंगात नम्रता, विनयशीलता असली, की आपले कोणतेही काम सुकर होतेच. शिवाय आपलेही महत्त्व वाढते. नम्रतेची किंमत किती आणि कशी असते या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते…
एक राजा एकदा त्याच्या प्रधानासह राजधानीचा फेरफटका मारायला निघाला. हा राजा खरोखरच अतिशय नम्र व प्रजाहितदक्ष होता. प्रजेची काळजी घेण्यात तो कोठेही स्वतःला कमीपणा मानत नसे. प्रधान आणि इतर मंत्रिजनांबरोबर जात असताना राजाला रस्त्यात एक साधू भेटला. साधू आपल्याच तंद्रीत जात होता. तरीही राजाने त्याचे लक्ष वेधून घेतले व त्याला नम्रपणे खाली वाकून नमस्कार केला. आणखी पुढे गेल्यावर राजाला काही ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांनाही राजाने अतिशय नम्रतेने नमस्कार केला.
प्रधान हे सारे पाहत होता. त्याला अर्थातच राजाची ही गोष्ट आवडली नाही. तो राजाला म्हणाला, ‘हे राजन, तुम्ही या राज्याचे सम्राट आहात. तुम्हाला इतके नम्रपणे वागणे शोभत नाही. त्यातून नागरिक वेगळा अर्थ काढू शकतात.’
राजाने त्यावर लगेच भाष्य केले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी दरबारात त्याने प्रधानाला बोलावून घेतले व त्याचाजवळ एका सिंहाचे. एक वाघाचे व एका माणसाचे तयार केलेले मस्तक (डोके) दिले व सांगितले, की ही तिन्ही मस्तके बाजारात जाऊन मिळेल त्या किमतीत विकून यावीत.
राजाची आज्ञा प्रमाण मानून प्रधान आपल्या काही नोकरांना घेऊन ती तिन्ही डोकी विकायला गेला. सिंहाचे आणि वाघाचे मस्तक लगेच विकले गेले: मात्र माणसाचे मस्तक कोणीच विकत घेईना.
शेवटी सायंकाळपर्यंत वाट पाहून प्रधान माणसाच्या मस्तकासह दरबारात परतला व राजाला म्हणाला, ‘सिंहाचे व वाघाचे मस्तक लगेच विकल्या गेले. मात्र माणसाचे मस्तक विकत घेण्यासाठी कोणाचीही तयारी नाही. ‘
त्यावर राजा म्हणाला, ‘प्रधानजी, माणसाच्या डोक्याची किंमत किती आहे हे एव्हाना तुम्हाला कळलेच असेल. मग कसलीही किंमत नसलेले हे माझे डोकं मी काही जणांपुढे वाकविले तर त्यात कमीपणा कसला?’
राजाचे उत्तर ऐकून प्रधानाला आपली चूक कळली व त्याने राजाची क्षमा मागितली. नम्रतेची किंमत त्याला आता कळली होती.
Leave a Reply