बराक ओबामांची भारताची ट्रीप पक्की झाली आणि आमच्या कॉलनीत उत्साहाचे वातावरण पसरले.अर्थात ओबामांच्या ट्रीपचा आणि आमच्या नवजीवन कॉलनीचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही .ओबामा आमच्या कॉलनीला सोडाच पण आमच्या शहरालाही भेट देणार नव्हते.पण जगात कुठलीही घटना घडली की आमच्या कॉलनीत अत्यंत उत्साहाचे वातावरण पसरते.तसा अमेरिकेचा आमच्या कॉलनीशी तसा काही विशेष संबंध नाही ,फक्त आमच्या कॉलनीचे सेक्रेटरी कुलकर्णींचा मुलगा दोन महिने कंपनीतर्फे अमेरीकेला जाउन आला ,एवढाच संबंध . पण एवढ्याशा संबंधावरपण आमच्या कॉलनीतले लोक अमेरिकेविषयी अत्यंत अधिकारवाणीने बोलतात. फक्त बोलण्याचा शेवट ” अहो , कुलकर्ण्यांच्या मुलाने बघितलय ना हे सगळ . हो अगदी अस्सच, अगदी खर ” असा करतात. ते जाउ द्या . कुलकर्ण्यांनी रात्री कॉलनीची मिटिंग बोलावली , आणि आपण आपल्या कॉलनीतर्फे बराक ओबामांच्या स्वागताचा एक जंगी कार्यक्रम करावा असा प्रस्ताव मांडला . देशपांड्यांनी त्यांना लगेच दुजोरा दिला . कुलकर्ण्यांनी अगदी काहीही म्हटल तरी देशपांडे त्याला लगेच दुजोरा देतात .( यांची मुलगी लग्नाची आहे आणि त्यासाठी त्यांना कुलकर्ण्यांचा फॉरिन रिटर्न मुलगा डोळ्यासमोर आहे ) आता कॉलनीतील दोन प्रतिष्ठित मंडळींनी ठरवल्यावर मोडता घालायचे काही कुणाला कारण नव्हते . शेवटी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता गणपती मंदिरात कार्यक्रम करायचे ठरले आणि सभा संपली.
आमच्या कॉलनीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बरीचशी मंडळी कलाकार आहेत. अर्थात ती नुसतीच कलाकार नाहीत , तर पोटापाण्याची नोकरी सांभाळुन कलाकार आहेत. नुसत्या कलाकाराला त्या कलेशिवाय दुसरे काही येत नाही . पण आमच्या कॉलनीतल्या कलाकारांना आपल्या कलेशिवाय पोटपाणी सांभाळण्याची कलाही पार पाडावी लागते . त्यामुळे समोरचे पांडेकाका बॅंकेत कॅशियर कम कवी आहेत , आणि बाजुच्या ढोलेकाकु एलायसीत क्लर्क कम नर्तिका आहेत. पांडेकाकांचा तर “ नोटा मोजा पटापटा ” नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असुन त्यांच्याकडे गेलेल्या सर्वांना तो ते सही करुन देतात. ढोलेकाकुंच्या नाचाचा प्रोग्रामपण कॉलनीत नेहमीच होतो .
आता या कलाकार असण्याला माझा मात्र अपवाद आहे. मी बॅंकेत अकाउंटंट असल्याखेरीज काहीही नाही . त्यामुळे चेक पास करणे किंवा लेजरला डेबीट टाकण्याखेरीज मला दुसरे काहीही येत नाही . तसे लहानपणी माझ्या वडीलांनी मला तबला शिकविण्याचा बराच प्रयत्न केला . दररोज मला ते तबल्याच्या क्लासला घेउन जायचे . पण इतरांच्या तबल्यातुन तिरकीट , धा , कत्ता , त्रक , धिन असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे तसे माझ्या तबल्यातुन कधीच आले नाहीत . माझ्या तबल्यातुन फक्त ” ढुम्म “ असा एकच आवाज यायचा . शेवटी कंटाळुन माझा क्लास बंद झाला. या गोष्टीनंतर मला आयुष्यात दुसरी कला किंवा छंद कधीच जमला नाही . नाही म्हणायला टिव्ही बघण्याचा छंद मला पुढच्या आयुष्यात जडला पण या छंदाचे स्टेजवर प्रदर्शन करता येत नसल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता.आमच्या हिला मात्र उखाणे म्हणण्याचा छंद आहे . प्रत्येक कार्यक्रमात तिचा एकतरी ऊखाणा असतोच .
शनिवार उजाडला , संध्याकाळ झाली , आणि गणपति मंदिरात मंडळी जमायला चालु झाली . कलाकार मंडळींची गडबड दुपारपासुनच चालु होती. आम्ही मात्र प्रेक्षक असल्याने जेवण वगैरे करुन आरामात समोरच्या खुर्चीवर जाउन बसलो. एलायसीतले सराफ माझ्याच ‘अ’कलाकार लायनीतले. तेही माझ्याशेजारी येऊन बसले. आम्ही सिक्स्थ पे कमिशन वगैरे गप्पा मारीत बसलो. आमच्या बोलण्याचे विषय काहीही प्रसंग असला आणि जागा कुठलीही असली तरी सारखेच असतात . उद्या समोर लता मंगेशकर गायला बसली काय किंवा माधुरी दिक्षित नाचायला बसली काय आम्ही आपले “ पे रिव्हिजन , सॅलरी हाइक बॉसची लफडी ” या विषयामधेच असतो . काही वेळाने समोर स्टेज म्हणुन एक सतरंजी अंथरण्यात आली.पुर्वी असे काही कार्यक्रम असताना आम्ही लाकडी स्टेज अरेंज करायचो. पण काही वर्षांपुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असताना त्यांच्या स्वागतार्थ केलेल्या कार्यक्रमात ढोलेकाकुंनी कथ्थक डान्स केला , त्यावेळी तो स्टेज कोसळला. तेव्हापासुन फरशीवरच सतरंजी अंथरुन त्याला स्टेज म्हणुन आम्ही कार्यक्रम करतो. अर्ध्या तासात तयारी पुर्ण झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरवातीला कुलकर्णी काकु अमेरिकेची आपल्याला थोडक्यात ओळख करुन देतील असे सांगण्यात आले आणि नउवारी साडी , मोठे कुंकु ,केसांचा अंबाडा या वेषातल्या काकु बोलायला उभ्या राहिल्या.काकु भुगोलशिक्षिका म्हणुन रिटायर झाल्या असल्या तरी त्यांचे भुगोलाचे ज्ञान पुस्तकीच होते. त्या स्वतः औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर कधी गेल्याच नाहीत. अपवाद एकदाच . मुलाला एअरपोर्टवर सोडायला. काकुंनी अमेरिकेची ओळख करुन द्यायला सुरुवात केली.
” अमेरिका हा अत्यंत खंडप्राय देश असुन त्याचे श्रेत्रफळ सुमारे दहा हजार चारशे चौरस किमी आहे. उत्तरेकडे पॅसिफिक समुद्र असुन दक्षिणेकडे अटलांटीक समुद्र आहे .पुर्वेकडे मेक्सिको आणि पश्चिमेकडे कॅनडा आहे.एकुण पन्नास प्रदेशांनी बनलेला हा देश जगातला अत्यंत बलाढ्य देश आहे . “
काकुंची अमेरिकेची पुस्तकी ओळख सुमारे अर्धा तास चालली .त्यानंतर पांडेकाका ओबामांच्या स्वागतार्थ आपल्या कविता गातील असे समजले. पांडेकाका चालु झाले.
ओबामांच्या घराचे
नाव व्हाइट हाउस
ओबांमांपुढे नतमस्तक
चायना फ्रान्स व रुस
ओबामांच्या विमानाचे
नाव एअरफोर्स वन
ओबामांचे मात्र
भारतावर जडले मन
अशा कवितांचा रतीब चालु झाला . सर्व प्रकारची यमके जुळवुन झाली.” मिशेल ,स्पेशेल “, ” बराक नाक ” अशा पंचवीस तीस कवितानंतर कवितावाचन संपले. काकांनी नंतर भाषण केले . त्यात आपल्या “ नोटा मोजा पटापटा” या काव्यसंग्रहाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. आता आपण सध्या एक थ्रिलर सस्पेन्स कादंबरी “ बंद दरवाजा ” लिहित असल्याचे सांगितले . हा ” बंद दरवाजा ” बॅंकेच्या एका लॉकरचा असुन आपल्या पुर्वीच्या मालकाच्या खुन्याचा हे लॉकर कसा प्रतिशोध घेते ह्यावर ही कादंबरी आधारित होती . ह्यावर सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
त्यानंतर ढोलेकाकुंचा नवीन हिंदी गाण्यावर डान्स झाला , शेजारच्या गौरीचे ( वय चार ) गाणे झाले , एकंदर खुप कला सादर झाल्या . बराक ओबामांच्या येण्याचा आणि ह्या हिंदी गाण्यांचा कसा संबंध ? हा प्रश्न पडला असता , हे ओबामांना भारतीय संस्क्रुतीचे दर्शन आहे असे उत्तर मिळाले .
कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या हिचा उखाणा घेण्याचा प्रोग्राम होता. आता या प्रकाराला मी फार भितो. आमच्या हिला कसला पाचपोचच नाही . मागे बिल क्लिंटन आले तेव्हा ” क्लिटनच्या घरी मोनिकाचा मुक्काम , – रावाचे डोके दुखले की मी लावते बाम ” असा उखाणा घेतला .आता या उखाण्यात कशाचा कशाला काही संबंध आहे का ? पण नाही . स्टेज दिसले की उखाणा झालाच पाहिजे . आतासुध्दा ” मिशेलला म्हणतात सगळे फर्स्ट लेडी , —- रावांशी बांधली मी लग्नाची बेडी .” हा उखाणा घेतला . आता आमच्या लग्नाचा आणि मिशेलला फर्स्ट लेडी म्हणण्याचा काही संबंध आहे का ? पण असंबध्द बोलण्यात बायकांचा हात कोणी धरु शकत नाही . त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट म्हणजे आमच्या कॉलनीत माझ्या ऑफिसमधले कोणी रहात नाही . नाहीतर माझे ऑफिसमधे जाणे लोकांनी मुश्कील करुन टाकले असते.
कार्यक्रम संपल्यावरचे जेवण ही एकच जरा त्यातल्यात्यात बरी गोष्ट होती. बाकी जाऊ द्या , चांगल्या जेवणामुळे आणि त्यातल्या त्यात जिलेबीमुळे कार्यक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला.
— निखिल नारायण मुदगलकर
Leave a Reply