नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”
“ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।
वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥ ”
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते.
देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय
! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते. पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्म घेतल्याने देवीला शैलपुत्री हे नाव रूढ झाले.
वृषभ (बैल) वाहन असलेल्या देवी शैलपुत्रीच्या च्या उजव्या हातात त्रिशूल असून डाव्या हातात कमळ पुष्प आहे. पूर्वजन्मी प्रजापती दक्षाची पुत्री असलेल्या ‘सतीचा’ विवाह भगवान शंकरा सोबत झाला होता. एकदा दक्षाने मोठ्या यज्ञकार्यात सर्व देवांना बोलाविले परंतु भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही. आहुती देतांना भगवान शंकरांना सोडून सर्व देवांना आहुती दिली. देवी सतीला आपल्या पित्याच्या घरील यज्ञात जाण्याची उत्कट इच्छा झाली. भोलेनाथांनी सांगितले कि, दक्ष आपल्यावर रुष्ट आहे. त्यामुळे आपले तिथे जाणे योग्य नाही. देवी सतीला आपल्या आप्तेष्टांना भेटण्याची इच्छा असल्याने भगवान शंकरांनी जाण्याची परवानगी दिली.
दक्षाच्या घरी गेल्यावर पित्याने स्वागत करण्याऐवजी, देवी सती आणि भगवान शंकरांचा अपमान करण्यास सुरुवात केली. देवी सतीला मनस्ताप झाला, आपल्या आराध्याची अवहेलना बघून क्रोधाग्निने तप्त झालेल्या देवीने योगनिद्रेच्या माध्यमातून स्वतःला भस्म केले. ही दुखद बातमी कळताच भगवान शंकरांनी आपल्या गणांना पाठवून संपूर्ण यज्ञ नष्ट केला तसेच अन्य देवांना आहुती ओकायला भाग पाडले, दक्षाचा वध केला.
यानंतर पुढील जन्मात पर्वतराज हिमालयाच्या घरी “शैलपुत्री” नावाने जन्म घेतला. पार्वती तसेच हैमवती ही सुद्धा देवी शैलपुत्रीचीच नावे आहेत. उपनिषदांमधील देवी महात्म्यानुसार हैमवती रुपात शैलपुत्रीने, देवांच्या गर्वाचे भंजन / हरण केले. शैलपुत्री चा पुढे विवाह भगवान शंकरांसोबत झाला. पुर्वजन्माप्रमाणे यावेळीही देवी शैलपुत्री भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली.
या दिवशी आराधना करतांना योगी “मूलाधार चक्रावर” ध्यान केंद्रित करून उपासना करतात.
शैलपुत्री स्तोत्रपाठ
“ प्रथम दुर्गा त्वंहि भवसागर: तारणीम्।
धन ऐश्वर्य दायिनी शैलपुत्री प्रणमाभ्यम्॥
त्रिलोजननी त्वंहि परमानंद प्रदीयमान्।
सौभाग्यरोग्य दायनी शैलपुत्री प्रणमाभ्यहम्॥
चराचरेश्वरी त्वंहि महामोह: विनाशिन।
मुक्ति भुक्ति दायनीं शैलपुत्री प्रमनाम्यहम्॥ ”
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply