नवीन लेखन...

नवरात्र

आश्विदन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचे नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विेन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री पौर्णिमेपर्यंत असते. आश्वििनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते. नवरात्रीदरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं म्हणतात; परंतु आश्विपन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र. म्हणून त्याचे दिवस नक्की किती येतात हा प्रश्न नसतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं आपण बोलतो.

श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपं आहेत. आदिशक्तीची उपासना मुख्य आहे. परंतु ज्या-ज्या रूपात, ज्या-ज्या ठिकाणी, ती प्रगट झाली त्या-त्या रूपात त्या-त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते. चंद्रिका, भगवती, दुर्गा, शर्वी, त्रिपुरा, भुवनेश्व-री, श्यातमा, ललिता, चंडी, चामुंडा, शांतादुर्गा इ. नावांनी या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये दुर्गा आणि कालिमाता विशेष प्रसिद्ध आहे. तिथे दुर्गाउत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो.

या दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात. १) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघटा, ४) कुष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायनी, ७) कालरात्री, ८) महागौरी, ९) सिद्धीदात्री. या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवदुर्गेची अनेक कुटुंबांत पूजा केली जाते.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वत:चे असे महत्त्व असते. पहिला दिवस घटस्थापना, पंचमीला ललितापंचमी म्हणतात. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. या देवीचे स्तोत्र श्रीमंत आदि शंकराचार्यांनी रचले आहे. अष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी, विशेषत: देवीक्षेत्रात चंडीहोम करतात. काही कुटुंबांमध्ये अष्टमीला घरीदेखील होम करतात, तसेच देवीसमोर घागरी फुंकणे हादेखील एक पूजाविधी घरी किंवा देवी मंदिरात सामूहिकरीत्या केला जातो. या पूजेला तांदळाच्या पिठीची उकड घेऊन देवीचा मुखवटा तयार करतात. तिची साग्रसंगीत पूजा करतात. नवमीपर्यंत विविध कार्यक्रम नवरात्रात केले जातात. नवमीला खंडेनवमी असेही म्हणतात. या दिवशी अवजारांची, शस्त्रांची पूजा करतात.

सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय. नवरात्राच्या वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये वेदिका स्थापना आणि वरूण स्थापना हे महत्त्वाचे भाग आहेत. वेदिका याचा अर्थ शेत असा होतो. या वेदिकेवरच वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते, म्हणूनच घटस्थापनेपूर्वी वेदिका म्हणजे शेत तयार करावे लागते. याच्यासाठी शेतातील किंवा बागेतील माती आणतात. ती पत्रावळीवर किंवा वेताच्या टोपलीत पसरवितात. “वेदिकाय नम:’ या मंत्राने शेताची पूजा करतात. त्यानंतर त्या शेतात सात प्रकारची धान्ये हळदीच्या पाण्याने भिजवून सप्तधान्यभ्यो नम: असे म्हणत पेरतात. नंतर पर्जन्याय नम: हा मंत्र म्हणत पाणी शिंपडतात. (शक्यय असल्यास वैदिक पौराणिक मंत्र म्हणावे.) हे सर्व पुरोहित पूजेच्या वेळी सांगतात. परंतु आजकाल बरेचदा गुरुजी मिळू शकत नाहीत अशावेळी आपण हे करू शकतो. ही वेदी तयार झाल्यावर वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते. हा घट मातीचा, तांब्याचा, चांदीचा वापरता येतो. पूर्वी सुवर्णाचादेखील घट वापरला जात असे, परंतु सर्वांना सोपा आणि सहजरीत्या मिळावा यासाठी मातीच्या घटाला मान्यता आहे. घटाला कलशदेखील म्हणतात, त्यामुळेच की काय नवरात्र आहे; याला घट बसलेत असे म्हणण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. नऊ, पाच अशा विषम संख्येत घट घेऊन उतरंडीप्रमाणे त्याची रचना करून म्हणजे एकावर एक घट ठेवून, त्यावर स्वस्तिक काढतात. देवीच्या मूर्तीपुढे ठेवून त्याचे पूजन करतात. काही ठिकाणी कलशात ताम्हण ठेवून त्यात देवीचे टाक ठेवून, त्याची पूजा करतात. चांदीच्या पत्र्यावरील देवीच्या प्रतिमेला टाक म्हणतात. देवीच्या प्रतिमेवर किंवा घटावर येईल अशाप्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस फुलांच्या जोड माळा वाहतात. यासाठी झेंडूची किंवा तिळाची फुले वापरतात. ही माळ जोडमाळ नवव्या दिवशीपर्यंत तशीच ठेवली जाते.

माळ तयार करताना रेशीम लोकर वापरली जाते. रिळाचा किंवा सुताचा दोरा वापरायचा असल्यास दोऱ्याला थोडी तेलहळद लावतात. घटावर देवीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी घटावर नारळ ठेवून प्रतिष्ठापना करतात. देवीजवळ अखंड दिवा लावतात. हा नवरात्र पुजेतील महत्त्वाचा भाग आहे. ही तेलवात नऊ दिवस-रात्र तेवत राहावी यासाठी विशेष प्रकारे बनवली जाते. ती जोडवात एक वीत लांब असते. ती कुंकवाने रंगवतात. समईदेखील जाड धातूची वापरतात. दिव्यावर काजळी जमू नये याची काळजी घेतली जाते.

नवरात्रीच्या दिव्याचे तेलदेखील वेगळ्या भांड्यात दिव्याजवळ ठेवले जाते. या अखंड दिव्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्या दिव्याचीदेखील पूजा केली जाते.
देवीच्या पूजेसाठी पुरोहित बोलाविण्याची पद्धत आहे. त्यामागील कारण हेच की देवीस्थापना शास्त्रोक्त, तंत्रोक्त पद्धतीने व्हावी; परंतु पुरोहित न मिळल्यास देवीची षोडशोपचारे पूजा करावी. विड्याची देठासकट पाने घेऊन हळद-कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे करावे. देवीचे पाय आपल्याकडे येतील अशी मांडणी करावी. नवरात्राच्या दिवसात देवीचे टाक किंवा मूर्ती जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडून रोज षोडशोपचारे पूजा करावी.

नवरात्रात काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो, तर काही ठिकाणी धान्य भाजून स्वयंपाक केला जातो. त्याला धान्य फराळ असं म्हणतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती केली जाते. नवमीच्या दिवशी देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवितात. आपापल्या परंपरेप्रमाणे नवमीस किंवा दशमीस नवरात्र समाप्ती करण्याची पद्धत आहे. समाप्तीच्या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. माळ बांधतात. “मात: क्षमस्व’ किंवा अंबा क्षमस्व म्हणून देवीवरून ईशान्य दिशेस एक फूल वाहतात. पेरलेल्या वेदिका व घट यांचे अक्षता वाहून विसर्जन करतात. उगवलेल्या धान्याचे अंकुर प्रसाद म्हणून घरात ठेवण्याची पद्धत आहे.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : डॉ. र. रा. घाटे, पुणे / देवी भागवत स्कंध.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..