नवीन लेखन...

नवाझ शरीफ यांच्या विजयानंतर भारत-पाक संबंधांत नवे पर्व हा भाबडा आशावाद

मतपेटीद्वारे झालेले पाकिस्तानातील पहिले सत्तांतर
फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे पाकिस्तानी मतदारांनी नवाझ शरीफ यांना निवडून दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाक संबंधांचे नवे पर्व सुरू होईल असा भाबडा आशावाद बाळगण्यात अर्थ नाही. पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या. एका लोकनियुक्त सरकारकडून दुसर्‍या लोकनियुक्त सरकारकडे मतपेटीद्वारे झालेले हे या देशातील पहिले सत्तांतर आहे. याआधी सत्तेवर असलेल्या पाकिस्तान पीपल्स पक्षास पाच वर्षांचा सत्ताकार्यकाल पूर्ण करता आला. तालिबान आदी संघटनांच्या धमक्यांना भीक न घालता पाकिस्तानी मतदारांनी रांगा लावून मतदान केले. तेव्हा पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय हे काही धडा घेतील अशी आशा आहे. क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पक्षाची लोकप्रियता शहरांपुरतीच होती. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये त्यांच्या पक्षाला चांगली कामगिरी करता आली. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पक्षाचे असीफ अली झरदारी यांची गेली पाच वर्षांची राजवट पाहता त्यांना जनताने हाकलून दिले. झरदारी यांचे चिरंजीव बिलावल यांची ही पहिलीच निवडणूक. त्यांच्या पक्षाची धूळधाण झाली. माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या पक्षाकडे मतदारांनी ढुंकूनदेखील पाहिले नाही. नवाझ शरीफ यांच्या पक्षाला पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेची संधी मिळत असली तरी त्यांचा प्रवास बिकट आणि निसरडय़ा वाटेवरूनच होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सरकारसमोरील आव्हानेही मोठी असतील.

सहकार्याच्या पोकळ घोषणा
पाच वर्षांपूर्वी २००८ मध्ये ज्या वेळी पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीला अशाच प्रकारचे बहुमत मिळाले; त्या वेळी आसिफ अली झरदारी यांनीही भारताविषयी मैत्री आणि शांततेचे धोरण घोषित केले होते. घोषणेनंतर काही महिन्यांतच मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. झरदारी यांनी त्या वेळी केलेल्या घोषणांपैकी एकाही घोषणेवर अंमल झाला नाही. झरदारी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात काश्मीरचा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने, सीमापार दहशतवाद थांबवण्यासाठी कोणतेही ठोस उपाय पाकिस्तानकडून झाले नाहीत. यातून एकच अर्थ स्पष्ट होतो की, भारताविषयी पाकिस्तानातील राजकीय नेतृत्वाकडून मैत्री आणि सहकार्याच्या कितीही घोषणा झाल्या तरी, त्या निव्वळ पोकळ असतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे भारताविषयी पाकिस्तानचे धोरण निर्धारित करण्यात तेथील राजकीय नेतृत्वाला कोणतेही अधिकार नाहीत. भारतासंबंधी पाकिस्तानचे धोरण ठरवण्याचा अधिकार पाकिस्तानी लष्कराला व कुख्यात आयएसआयला आहे. पाकिस्तानातील शासनाला त्यात लुडबुड करू दिली जात नाही. म्हणूनच शरीफ आता मैत्री आणि सहकार्याच्या कितीही घोषणा करत असले तरी जोपर्यंत पाकिस्तानी लष्कराची त्याला अधिमान्यता मिळत नाही तोपर्यंत अशा घोषणा पोकळच ठरतील.

भारत-पाक संबंधांत नवे पर्व हा भाबडा आशावाद
शरीफ हे आता तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाक संबंधांत आता नवे पर्व सुरू होईल वगैरे भाबडा आशावाद व्यक्त करण्याची स्पर्धा आपल्याकडे लगेच सुरू झाली आहे. हा आशावाद चुकीचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आधीच्या दोन्ही खेपेस नवाझ शरीफ यांनी फार काही केले नाही. तेव्हा शरीफ यांना आताच कसे जमेल, हा प्रश्न आहे. शरीफ यांनी पाकिस्तानची भूमी भारतविरोधी कारवायांसाठी आपण वापरू देणार नाही, वगैरे भाष्य केले. त्यांच्या विधानांत काही तथ्य असते तर पाकिस्तानातील पंजाब हे राज्य तालिबान्यांचे सुरक्षित क्रीडांगण बनले नसते. नवाझ शरीफ यांचे बंधू पंजाबप्रांताचे मुख्यमंत्री होते. त्या काळात दहशतवाद्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी काही मोठी पावले उचललली नाही. शरीफ यांच्या निवडीने फ़ारसा फ़रक पडेल असे वाटत नाही. शरीफ हे ‘चांगल्या’ तालिबान्यांशी सरकारने चर्चा करायला हवी या मताचे आहेत. परंतु पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून ‘चांगले’ असणारे तालिबानी भारतासाठीही चांगले नाही.

ऑपरेशन टोपॅझ थांबले पाहीजे
१९६५ व १९७१ च्या अपमानकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल झिया आणि पाकिस्तानची कुख्यात आयएसआय यांनी संयुक्तपणे भारतात अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना आखली. या योजनेला पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतावरून के प्लॅन (ऑपरेशन काराकोरम किंवा टोपॅझ) असे संबोधले गेले. भारतात द्वेषाची बीजे रोवून जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य भाग होता. यातूनच स्वतंत्र खलिस्तानची मागणीही शीख माथेफिरू तरुणांच्या माध्यमातून पुढे रेटण्यात आली. काश्मीरचे विभाजन करण्याचाही डाव रचला गेला. पहिले शत्रू असलेल्या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध सीमेवर दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये व्हायची. आपले पाकिस्तान आणि चीनशी १९४७, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ साली सीमेवर युद्ध झाले. अशा युद्धांमध्ये फक्त सीमेवरच्या सामान्य नागरिकांवर युद्धाचा परिणाम व्हायचा. आता पाकिस्तान आणि चीनने नव्या प्रकारचे युद्ध सुरू केले आहे. या युद्धात भारतात घुसखोर पाठवून देशाच्या वेगवेगळ्या भागात आतंकवादी कारवाया करण्यात येत आहे. युद्ध आता सामान्य भारतीय जनतेच्या विरुद्ध लढले जात आहे. आयएसआयच्या कारवायां मध्ये १९९४ ते २०१३ सालामध्ये सामान्य नागरिक, सुरक्षा कर्मचारी तसेच दहशतवादी सर्व मिळून तब्बल ६२३९० हून अधिक जणांना दहशतवादी कारवायात प्राण गमवावे लागले. तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांची संख्या चारपट अधिक आहे. यावरूनच आयएसआयच्या दहशतवादी कारवायांची भयानकता स्पष्ट होते.

पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक मुख्य केंद्र

निवडणुका जिंकल्यानंतर शरीफ यांनी आपल्या पहिल्याच भाषणात भारतासोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे. निमंत्रण मिळो अथवा न मिळो, मी भारताला भेट देणार असे शरीफ यांनी जाहीर केले. आपल्या पंतप्रधानांनीही लगेच शरीफ यांचे अभिनंदन करून त्यांना भारताला भेटीचे आमंत्रण दिले आहे. शरीफ हे जंटलमन असले तरी पाकिस्तानी जनतेसाठी आहेत. भारतासाठी नाही. पाकिस्तान हे तसे टीचभर राष्ट्र; पण अतिरेक्यांचे कारखाने सुरू करून पाकने जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक मुख्य केंद्रच बनले आहे. चीनकडून अण्वस्त्राचे तंत्रज्ञान ‘सप्रेम भेट’ म्हणून मिळाल्यानंतर पाकिस्तानकडे आजच्या घडीला शंभर एक अणुबॉम्ब आहेत. पाकिस्तानची अण्वस्त्रे तालिबान्यांच्या हाती पडली तर काय गहजब होईल, या चिंतेने जगाला ग्रासले आहे.परंतु इतके जर तर असले तरीही नवाझ शरीफ यांना शुभेच्छा द्यायला हव्यात, किमान संवाद तरी होऊ शकेल असे कोणी सत्तेत असणे गरजेचे होते. ती गरज शरीफ यांच्या निवडीने पूर्ण होईल. आणि त्यांचे भारताशी चांगले संबंध निर्माण करण्याचे आपण स्वागत केले पाहिजे पाकिस्तानातून भारतातत घडवण्यात येणार्‍या दहशतवादी कारवायांचा नायनाट करू आणि मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्यात ‘आयएसआय’चा हात असेल तर दोषी अधिकार्‍यांवर खटले भरू, अशी आश्‍वासने देऊन शरीफ यांनी निवडणुका जिंकल्या. यापैकी किती आश्‍वासने ते पाळतात ते आता पाहायचे! आज अनेक दहशतवादी छुपे सेल भारतात कार्यरत आहेत. याशिवाय २०००-२५०० ते दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. पाकिस्तानमध्ये ४०-४५ अतिरेक्यांचे ट्रेनिग शिबीरे कार्यरत आहेत.

अतिरेक्यांचे हे कारखाने बंद झाले पाहीजेत. वक्तव्ये करण्याची परंपराच पाकिस्तानात आहे. सीमेपलीकडील दहशतवाद थांबवण्याबाबत किंवा पाकिस्तानी लष्कराला लोकनियुक्त सरकारच्या काबूत ठेवण्याबाबत पाकिस्तानी सरकारे अपयशीच ठरतात, हेच वारंवार उघड झाले आहे. शरीफ भारतविरोधी दहशतवादविरोधी कारवाया थांबवु शकतील का?

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..