नवीन लेखन...

नातं- स्त्रीचं स्त्रीशी





म्हणे दोन माणसं एकमेकांच्या संपर्कात अगदी काही क्षण जरी आली तरी ती माणसे काही विशिष्ट प्रकारची स्पंदने एकमेकांकडे प्रक्षेपित करीत असतात! त्यातली काही स्पंदने एकमेकांकडे पोहोचतात, तर काही वेळा ती पोहोचत नाहीत. जर ही स्पंदने दोघांच्याही मनाच्या गाभार्यापर्यंत पोहोचली, तर काहीतरी ‘क्लिक‘ होतं

अन् ‘युरेका, युरेका!‘ असे तरंग दोघांच्याही मनात उठून ‘मैत्री‘ नामक विणेची तार अल्लद छेडली जाते. मला वाटतं, प्रत्येकजण हा क्षण आयुष्यभर विसरत नसेल. अर्थात तेवढ्या गहिराईपर्यंत ते नातं पोहोचलं तरच!

असं खास मैत्रीचं नातं जुळणं हे बर्याचदा फार मोजक्या व्यक्तींच्या संदर्भात अनुभवायला मिळतं. कारण प्रत्येकाशीच आपली ‘वेव्हलेंग्थ‘ जुळेलच असं नाही. मुळात आपली कुणाशीही ‘वेव्हलेंग्थ‘ जुळायला त्या व्यक्तीचे व आपले काही गुणविशेष जुळावे लागतात. आपली कुणाशीही मैत्री होण्यामागे व्यावहारिक, मानसिक अशी इतर कोणतीही अनेक कारणं असली तरी खर्या अर्थाने मैत्रीचे सूर तेव्हाच जुळतात, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एक अनामिक बंध निर्माण होतो. दोन व्यक्तींमध्ये व्यक्तिमत्त्वाचे असे जरी अनेक समान दुवे आढळले, आवडी-नावडी समान आढळल्या तरी त्यांची मैत्री होईलच, असं नाही. कारण तिथे पुन्हा ‘त्या‘ स्पंदनांची तार जुळणं महत्त्वाचं असतं. अन्यथा सगळीकडे टीपिकल छापाचे मैत्रीचे नमुने पाहायला मिळाले असते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला असंख्य माणसं भेटतात, अगदी लहानपणापासून पाहायचं ठरवलं तर शाळेतल्या छोट्याशा विश्वात आपला एखादा खास मित्र किवा एखादी खास मैत्रिण असते. लहानपणी मैत्री करताना आपण फार विचारपूर्वक मित्र निवडतो, असे नव्हे. कदाचित काहीजण निवडतही असतील, पण एकमेकांत काहीतरी आवडणारं वाटलं की गट्टी जमते. कुणाकडे छान पुस्तकं आहेत. कुणी हुशार आहे, कुणाकडे चांगली बॅट-बॉल आहे, कुणाकडे चांगली सायकल आहे, म्हणून पण लहानपणी मैत्री होऊ शकते.

हळूहळू जगाचं भान येऊ लागल्यावर आपण भवतालच्या माणसांविषयी विचार करू लागतो. कॉलेजात गेल्यावर थोडं मोठं झाल्याचा आनंद मनात असतो अन् त्याबरोबरच एक वेगळीच असुरक्षिततादेखील मनात मध्ये मध्ये डोकं वर काढीत असते. ‘आयडेन्टीटी क्राइसेसच्या पर्वातला एक भाग म्हणून आपण सारेचजण अशी असुरक्षितता थोड्या फार फरकाने अनुभवत असतो. कॉलेजला प्रवेश घेतल्यावर पहिल्या दोन-चार दिवसांत जे आपल्याशी बोलतात किंवा आपण ज्यांच्याशी बोलल्यावर, हसल्यावर प्रतिसाद देतात, आपली एकटेपणाची पोकळी थोडी भरून काढतात, ती मुलं-मुली आपल्याला मित्र-मैत्रिणी वाटू लागतात. पण थोड्याच दिवसांत आपण आपल्याला अभिप्रेत असलेल्या मित्र-मैत्रिणींचा आपल्याही नकळत शोध घेऊ लागतो किंवा कदाचित आपल्यातला ‘व्हायब्रेशन्स‘ आपल्याला संवादी अशा ‘व्हायब्रेशन‘ला टकरावून एक मोठ्ठं वर्तुळ निर्माण करीत असतील अन् मग तिसर्‍या बेंचवरची वृषाली आपल्याला व आपण तिला किवा पहिल्या बेंचवरची शुभा आपल्याला व आपण तिला कधी आवडू लागतो, ते आपल्या लक्षातही येत नाही. आपण जेव्हा एकमेकांना पाहतो तेव्हा आपल्या नजरांमधली एक अनोखी चमक फक्त आपल्यालाच समजू-उमजू लागते.

शाळेच्या छोट्या विश्वातून कॉलेजरूपी मोठ्या कॅम्प्समध्ये प्रवेश केल्यावर कुठला तरी कोपरा किवा कट्टा आपला असावा, जिथे आपण आपल्या ग्रुपबरोबर कधी एकदाची धम्माल सुरू करतो असे खरे तर प्रत्येकाला वाटत असते. मनातल्या असुरक्षिततेला, बंदिस्त भावनांना कधी एकदाची वाट मिळेल असे प्रत्येकाला झालेले असते. हळूहळू पहिल्या बेंचवरची शुभा, तिसर्‍या बेंचवरची वृषाली व कोयार्‍यातली निलू अन् प्रिता व शेवटच्या बेंचवरचे आपण असा एक ‘खासा ग्रुप‘ तयार होतो. कधी कधी संपूर्ण वर्गातल्या वेगवेगळ्या ग्रुपमधल्या एकेकाबरोबर किवा संपूर्ण कॉलेजमधल्या वेगवेगळ्या ग्रुपमधल्या एकेकाबरोबर आपला ‘खास डायलॉग‘ही असतो. अर्थात काही वेळा आपल्या ग्रुपभोवती किवा आपल्या जोडीभोवती भलीमोठ्ठी पोलादी भिंत उभी करणारी काही तुरळक मंडळीपण असतात. खरे तर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर बहुतेकजण स्वतःला स्वतःपासून थोडे मोकळे करण्याच्याच प्रयत्नात असतात. कारण त्या विशिष्ट वयातली ती एक महत्त्वाची मानसिक गरजच असते.

असे आपले विश्व विस्तारीत असताना एवढ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यात काहीजण आपल्यासाठी ‘अतिविशिष्ट‘, ‘खास‘ असेही असतात- ज्यांच्याजवळ आपण व ते आपल्याजवळ मनातले सगळे काहीही आडपडदा न ठेवता भडाभडा व्यक्त करू शकतो. अशा खास मैत्रीत एक आगळे सहजीवन आपण अनुभवत असतो. अर्थात नेहमीच मैत्रीचे बंध जुळताना विचार, आवडी किवा तत्सम गोष्टीच जुळल्या पाहिजेत असे काही नाही, तर काही वेळा शब्दात न सांगता येणारे पण डोळ्यांतून हळूच घरंगळणारे काहीतरी आपल्याला एकमेकांकडे खेचायला कारण ठरते.

बर्‍याचदा कोणतेही समान बंध नसलेल्या व्यक्तीशीदेखील आपली झकास मैत्री जमते, तर काही वेळा आपल्या आवडी-निवडी एकमेकांना पूर्णतः समजल्यामुळे म्हणा, किंवा त्या जुळल्यामुळे म्हणा, आपल्याला एकमेकांशिवाय करमतच नाही. कुठे काही नवीन पाहिले, वाचले, अनुभवले की कधी आपल्या खास सखीला सांगतो असे आपल्याला झालेले असते. एखादा आपल्याला आवडणारा मुलगा किवा ज्याला आपण आवडतो असा मुलगा, त्याला दिलेले कोडनेम, न आवडणांर्‍या मुला-मुलींना, शिक्षकांना दिलेली टेरनावे, आवडता हीरो-हिरॉइन यांचे नवे चित्रपट, नुकतेच जमलेले-मोडलेले प्रेमप्रकरण, एकमेकांशी/ एखादीशी असलेली स्पर्धा अशा अनंत विषयांवर सतत अखंड एकमेकांना सांगणे, भेटायला थोडासाही वेळ झाला तर एकमेकांवर रुसणे… अशा अनंत अनुभवांनी खास मैत्रीचे नाते दिवसेंदिवस फुलत असते. रक्तसंबंधाच्या नात्यापलिकडचे एक सुंदर नाते अशा रीतीने बहरायला लागते. बर्‍याचदा आपल्या घरच्यांना ज्या गोष्टी आपण सांगत नाही किवा सांगायला कचरतो त्या गोष्टी दिलखुलासपणे आपल्या खास मैत्रिणीला सांगतो. ती देखील आश्वासकपणे, शांतचित्ताने सारे ऐकून तिच्यापण मनातले असेच सारे साठलेले

आपल्यापुढे निःसंकोचपणे उलगडते. अन् एक वेगळाच तरल असा अनामिक बंध आपल्या नात्यात निर्माण

होतो. असा बंध निर्माण झाल्यावर काहीवेळा या सुंदर, तरल नात्यामध्ये ‘पझेसिव्ह‘ होण्याचा धोकादेखील निर्माण होतो. जर त्या मैत्रिणींमधील एखादीला अजून दुसरी कुणी समानधर्मी मैत्रिण मिळाली तर पहिल्या मैत्रिणीला ते किती निकोपपणे घेता येते, यावर खरे तर त्या मैत्रीचा पाया ठरलेला असतो. काहीजणी फार निकोपपणे हे सारे स्वीकारतात, तर काहीजणी अंतर्बाह्य उन्मळून पडतात. अर्थात यातून त्या नात्याविषयीचे खरे तर अनेक प्रश्न निर्माण होतात. काही मैत्रिणी मात्र वेगवेगळ्या समज-गैरसमजातूनही एक
मेकांना सांभाळून आपली मैत्री घट्टपणे टिकवून ठेवतात. अन् या सहप्रवासात भुर्रकन कॉलेजविश्व कधी संपत तेदेखील कळत नाही.

— Bhalchandra Hadage, Sindhudurga

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..