नवीन लेखन...

नाही ला नाही

लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.
मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे.
अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न विचारणाऱ्या,काहीतरी प्रयोग करु पाहणाऱ्या मुलांपेक्षा एका जागी गप्प बसणारं मूल अधिक समजदार असतं, असं ही काही पालकांना वाटतं. पण हे काही योग्य नाही.
मुलाची जिज्ञासा खच्ची व्हावी यासाठी पालक किंवा शिक्षक प्रयत्नशील असतात,असं नव्हे.
तर एका दोन अक्षरी शब्दामुळे हा सगळा घोटाळा होतो.
आपण बोलताना जर तो दोन अक्षरी शब्द जाणीवपूर्वक टाळला तर सगळे प्रश्न सोपे होतील.
तो महान दोन अक्षरी शब्द आहे ‘नको किंवा नाही.’
किंबहुना या शब्दामुळेच अनेक लहान मोठे अपघात होण्याचा पण संभव असतो. अशावेळी पालकांच्या ‘अशा बोलण्यामुळेच’ नंतर मुलांना पालकांची बोलणी खावी लागतात.

बहुतेककरुन सर्वच घरात घडणारा हा एक छोटासा प्रसंग पाहू.
आई,बाबा किंवा दादा ताई कपड्यांना इस्त्री करत असतात तेव्हा घरातलं लहान मूल त्याकडे अत्यंत कुतूहलाने पाहात असतं. त्यालाही इस्त्री करायची असते. चुरगळलेला कपडा इस्त्री फिरवून सरळ-ताठ करायचा असतो. इस्त्री गरम होते,म्हणजे नेमकं काय होतं? त्यातलं काय गरम होतं? हे त्याला जाणून घ्यायचं असतं. तो तशी इच्छा ही प्रदर्शीत करतो. प्रश्न विचारतो.
त्याबरोबर घरातली मोठी माणसे सावध होतात. त्या जिज्ञासू मुलाला बरोबर खिंडीत पकडून, चारही बाजूने त्याच्यावर ‘नाही,नको,मूर्ख,वेडपट’ अशा धारदार क्षेपणास्त्रांचा हल्लाच चढवतात.
उदा.
1. इस्त्रीला अजिबात हात लावायचा नाही. हात भाजेल.
2. मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. मला उशीर होतोय.
3. हे काय तुझं इस्त्री करायचं वय आहे का? गप्प बैस.
4. आला मोठा शहाणा! म्हणे मला इस्त्री करायची आहे. अजून स्वत:ला एकट्याने आंघोळ नाही करता येत…

असली उत्तरं ऐकल्यावर मुले त्याक्षणी जायबंदी होतात. ती घरातल्या मोठ्या माणसांना हुशार व प्रेमळ समजत असतात. पण ती तशी नाहीत हे कळल्यावर त्यांना मानसिक धक्का बसतो. त्यावेळी मुले आपल्या मानशी ठरवतात की,’आता आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजेत. उगाच या मोठ्या माणसांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही.’ या भावनेतूनच मग ही मुले पालकांच्या नकळत, पालकांनी ‘नको’ सांगितलेली गोष्ट आवर्जून करतात. इस्त्रीला हात लावतात. मग पुढे काय होतं हे सांगण्याची गरजच नाही.

आपण या प्रसंगाकडे जरा दुसऱ्या बाजूने पाहूया.
वरील चार उत्तरं ही वानगी दाखल आहेत.
पण अशी उत्तरं ऐकल्यावर मुलांच्या मनात काय विचार येत असतील ,याचा कधी विचार केलाय? याबाबत मी मुलांशी बोललो आहे.
त्यांना पहिला प्रश्न असा पडतो की,फक्त लहान मुलांनीच इस्त्रीला हात लावला तर हात भाजतो पण मग मोठ्या माणसांचा का नाही भाजत? मोठ्या माणसांना उशीर होत असताना जर प्रश्न विचारले तर ते मूर्खा सारखे का असतात? आणि मला एकट्याने आंघोळ करायचा जाम कंटाळा येतो. कारण आई मला छान घासून आंघोळ घालते. पण आंघोळ आणि इस्त्रीचा काय संबंध?

प्रिय पालकांनो,तुमच्या लक्षात येतंय का? ‘मुलांना काही समजतच नाही. ती वेडपटचआहेत. असं समजून त्यांना काही सांगू नका.’ कारण अशाप्रकारे सांगितल्यास ‘आपल्या पालकांना काही कळत नाही’ हे मुलांना लगेचच समजतं.
केवळ तुमच्या भीतीपोटी ते तसं बोलत नाहीत एव्हढंच!
मुलांशी बोलताना ‘त्याला समजेल.त्याला समजू शकतं’ असा विश्वास मनात ठेवूनच बोला. आणि बोलताना नेमकं,थेट बोला.
आपल्या बोलण्यातला ‘नको’ हा शब्द काढून टाकला तर हा प्रश्न सहजी सुटू शकेल.
कारण ‘नको’ म्हंटलं की ती गोष्ट करण्याची अनिवार इच्छा मनात निर्माण होते. ‘नको’ या शब्दाभोवती कुतूहलाचं प्रचंड वेटोळं आहे. म्हणूनच ‘इस्त्रीला हात लावू नकोस’ असं सांगण्यापेक्षा,
‘इस्त्रीचं हॅण्डल गरम होत नाही. त्याला हात लाव पाहू. इस्त्रीचा तळ गरम होतो. त्याला हात लावला तर हात भाजेल. म्हणून मी इथे हात लावत नाही आणि तू पण लावू नकोस!!’ फक्त सकारात्मक पाच वाक्य!!
या सकारात्मक वाक्यंामुळे इस्त्री कितीही तापली तरी घर शांत राहू शकतं याची गॅरंटी!
दिवसभरात आपण किती सकारात्मक आणि किती वेळा ‘नाही,नको’ बोलतो याचा एकदा शोध घ्याच.
आणि या शोधाची सुरुवात म्हणजेच सकारात्मक गोष्टींना प्रतिसाद.

————————————————————————————————————-
पालकांसाठी गृहपाठ : मुलांना एखादी गोष्ट (समजावून) सांगताना ‘हे त्यांना कितपत कळेल?’ अश मनात शंकासुध्दा आणू नका.
त्यापेक्षा ‘हे त्याला कसं समजेल’ याचा ध्यास घ्या.
त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघांनी मिळून शोधण्याचा प्रयत्न करा.
मुलांसोबत शिकण्याचा,त्यांच्या सोबत फुलण्याचा अनुभव घ्या.

‘जो नाही ला म्हणतो नाही,तोच उद्याची स्वप्नं पाही’ हि चिनी म्हण लक्षात ठेवा.
—————————————————————————————————————

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..