ना दुःखाचा धांडोळा, ना स्वप्नांचा आढावा
ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा
हे कुठल्या राधेसाठी यमुनेचे व्याकुळ पाणी
कृष्णाची काळी जादू वार्याचा बनवी पावा
हसण्याला उगाच ओढत तू आणलेस ओठांशी
अश्रुंच्या फटकार्याने बघ कोसळला देखावा
मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही
थोडीशी फुरसत मिळता मामाच्या जातो गावा
हदयाने लिहिले होते,ओठांची मोहर होती
हे पत्र तुझे आहे की हा रंगांचा मेळावा
देशाची अन् माझीही का एकच रास असावी?
शेजारी खोड्या करूनी वर रोज करी कांगावा
जग कठोर झाले तेव्हा, अन् उपाय थकले तेव्हा
मज दुसरे दैवत नाही मी प्रेमाचा केला धावा
मी सत्य बोललो त्याचा का गाजावाजा करता?
वाटेला जाता कोणी मुंगीही घेते चावा
जी बालपणाची गोडी ती चिचा बोरे गेली
शाळेच्या दारापाशी विकतात अता ते मावा
सत्तेची नशाच न्यारी,सत्तेच्या जाता दारी
डावाही होतो उजवा, उजवाही होतो डावा
मी ऐसे काही येथे आयुष्य काढले माझे
एखाद्या आजोबांनी भररस्ता ओलांडावा
मी चुकतो अनेक वेळा, माणूस असे मी भोळा
माझेच बरोबर याचा केला न कधी मी दावा
दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो
मी गझला लिहिल्या कोठे ? मी शिपडला ओलावा
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply