नावडतीचं मीठ अळणी असं म्हणतात. तसंच मग आणखी कुणाचीशी साखरही निगोड का असू नये? वरवर हा थट्टेचा प्रकार वाटेल. पण खरं पाहता साखरेची गोडी सगळीकडे सारखीच असते असं नाही. अशी ती का बदलते हे समजून घ्यायचं असेल तर आधी साखर म्हणजे काय हेही समजावून घ्यायला हवं. तुमच्याआमच्या रोजच्या जेवणात माधुरी आणणारी साखर ही वैज्ञानिकांच्या भाषेत मोनोसॅकराईड या गटात मोडते. फार फार तर ती मंडळी तिला टेबल शुगर असं म्हणतील. कारण साखर किंवा शर्करा या नावानं ओळखल्या जाणार्या पदार्थांच्या यादीत वैज्ञानिकांनी अनेक रसायनांचा समाचार केला आहे. तांदूळ, गहू , मका यासारख्या धान्याच्या पीठापासून जो मिळतो तो स्टार्च म्हणजेही साखरच. या सगळ्या पदार्थांना कार्बोहायड्रेट्स म्हणतात. कारण त्यांची जडणघडण कशी असते हे जेव्हा बघितलं गेलं तेव्हा ते कार्बन आणि पाण्याचे रेणू यांच्यापासून बनलेले असतात असं दिसून आलं. अर्थात त्यांची रचना इतकी साधीसरळ, म्हणजे एका कार्बनच्या अणूला एक पाण्याचा रेणू जोडला आहे अशी नसते, त्यात बरीच गुंतागुंत असते हे आता कळून आलं आहे. तरीही सुरुवातीला त्यांचं बारसं झालं ते झालं. तेच नाव चिकटलं. आपणही आता त्या अर्थी कर्बोदक असं म्हणायला लागलो आहोत. कर्ब म्हणजे कार्बन आणि उदक म्हणजे पाणी. निरनिराळ्या शर्करामय पदार्थांमध्ये एकाहून अधिक कार्बनचे अणू आणि एकाहून अधिक पाण्याचे रेणूही असू शकतात. काही वेळा अशा एखाद्या छोट्या रेणूंची एक साखळीच या शर्करामय पदार्थात असू शकते. म्हणूनच जर एखादाच रेणू असेल तर त्याला मोनोसॅकराईड असं म्हणतात. दोन असतील तर डायसॅकराईड आणि त्याहून अधिकांची साखळी असेल तर पॉलीसॅकराईड असं नाव दिल ंजातं. या कर्बोदकांचं आपल्या अन्नात फारच महत्त्व आहे. कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा पुरवण्याचं मोठं काम यांच्याकडून केलं जातं. ही ऊर्जा मिळवण्यासाठी जे जाळलं जातं ते इंधन मुख्यत्वे या कर्बोदकांचं बनलेलं असतं.
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply