14 ऑगस्ट 1948 रोजी क्रिकेट-इतिहासातील सर्वाधिक (कु-/सु-)-प्रसिद्ध बदक जन्माला आले. धावफलकात शून्याचा आकार बदकाच्या अंड्यासारखा दिसत असल्याने शून्यावर बाद होणार्या फलंदाजाला ‘बदकाचे अंडे घेऊन परतला’ असे म्हणण्याचा प्रघात पडला असे म्हणतात. असेही म्हणतात की कसोटी सामने खेळले जाण्याच्या आधीपासून ‘बदकाचे अंडे’ फलंदाजाकडून (घे-/घा-)-तले जाई. 1948च्या अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात कांगारूंनी इंग्लंडच्या पहिल्या डावाचा अवघ्या पाचावर दोन धावांनी खुर्दा उडविला. सिडनी बार्न्स आणि आर्थर मॉरिस या सलामीच्या जोडीने 117 पर्यंत धावा नेल्या. तिथे सिडनी बाद झाला आणि डोनल्ड ब्रॅडमन खेळायला आले. या सामन्यापूर्वीच्या 69 कसोट्यांतील 79 डावांमधून त्यांनी 6996 धावा काढल्या होत्या. कारकिर्दीतील या 80व्या डावात दुसर्याच चेंडूवर ते एरिक हॉलीजकडून त्रिफळाबाद झाले. 7,000 कसोटी धावांचा टप्पा त्यांच्याकडून हुकला आणि क्रिकेटविश्वाला एक निष्कारण चर्चेचा विषय मिळाला.
डोनल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांची कारकीर्द अशी – 70 सामने, 80 डाव, 10 वेळा नाबाद (त्या 10 डावांमध्ये 1,128 धावा), 6996 धावा, 334 सर्वोच्च, 29 शतके, 13 अर्धशतके, 7 भोपळे, 32 झेल आणि 2 बळी.
क्रिकेटमधील पारंपरिक पद्धतीनुसार फलंदाजी सरासरी काढण्याचे सूत्र असे : एकूण धावा (भागिले) ज्या डावांमध्ये फलंदाज बाद झाला त्या डावांची संख्या. डॉनला हे सूत्र लावल्यास 6996 / (80-10) = 99.96. म्हणजे ‘तथाकथित’ 100च्या सरासरीला 4 धावा कमी. ही सरासरी अर्थातच फसवी आहे कारण तिच्यात फलंदाज ज्या धावांमध्ये नाबाद राहिला त्यांमधील धावा ‘अंशात’ समाविष्ट आहेत पण ‘ते’ नाबाद डाव ‘छेदात’ समाविष्ट नाहीत. धावा मोजायच्या, डाव मात्र नाही हा अजब न्याय आहे.
अस्मादिक नवी चाल रूढ करताहेत कात टाकून (नागपंचमीच्या मुहूर्तावर) – परंपरावाद्यांच्या दिशेने फुत्कार – नाबाद डावांमधील धावा मोजू नका, मोजल्या तर ते डावही मोजा. नाहीतर – नाबाद डावांतील धावा मोजा, डावही मोजा. नाहीतर – दोन वेगवेगळ्या सरासर्या द्या : एक बाद डावांची, एक नाबाद डावांची. पाहिजे तर ह्या दोहोंची सरासरी ‘सरासरी’ म्हणून द्या. असो. सर डॉन यांना अखेर न्याय : नाबाद डावांमधील त्यांची सरासरी 112.8 एवढी आहे. बाद डावांमधील त्यांची सरासरी 97.80 एवढी आहे. परंपरावाद्यांच्या जिवात जीव असेपर्यंत ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.
बयालीस साल बाद…
एसेसीएचायेन – सचिन तेंडुलकर
उमर सतरा साल एकसौ बारा दिन. भारत-इंग्लंड दरम्यानच्या ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत सगळे नाणावलेले घोडे नको तसे चेंडू मारून बाद झालेले असताना एका फलंदाजाने त्याचे कारकिर्दीतील शतक क्र. एक काढले. नाबाद 119 – एसेसीएचायेन – सचिन!!!
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).
Leave a Reply