टाचणी व तारांपासून गाड्या व विमानांपर्यंत सर्वच वस्तूंमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधक, प्रयोगशाळा व तांत्रिक सहाय्यक लागतील. भारताने किंबहुना भारतातील एखाद्या राज्याने, जगाची प्रयोगशाळा बनण्याचे स्वप्न पाहिले तर उद्योजकांना नवीन शोधातून अब्जावधी
डॉलर मिळू शकतील. लाखो लोकांना नवीन क्षेत्रात रोजगार मिळू शकेल. यातील बहुतांश संशोधन गावांमध्ये होणे शक्य असल्याने युवकांना शहरांकडे येण्याची गरज राहणार नाही. गावे संपन्न होतील व शहरांची स्थिती सुधारेल.
संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०.
भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. या एका गोष्टीचे विविधांगी दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. यामुळे एकूणच तिथल्या स्थानिक नागरिकाचे जीवनमानही खालावले आहे. पण या समस्येवर तंत्रज्ञान हा क्रांतीकारी उपाय ठरू शकतो. उत्पादनासाठी लागणाऱ्या अगदी बारिक-सारीक भागांचे उत्पादन आणि संशोधन हे ग्रामीण भागात सहज होउ शकते. हे सर्व अंमलात आणण्यासाठी लागणारे मनुष्यबळ हे ग्रामीण भागात उपलब्ध आहेच. ही कल्पना साकार झाल्यास ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या तर सुटेल आणि जीवनमानही सुधारेल. याबरोबरच नवीन उद्योजकांनाही यातून संधी मिळतील. मुख्य म्हणजे यामुळे ग्रामीण भागाकडून शहराकडे जाणारे लोंढे आपोआप रोखले जातील आणि शहरांचे सौंदर्यही अबाधित राहील. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विकासात्मक संकल्पना संदिप वासलेकरांनी आपल्या एका दिशेचा शोध या पुस्तकात मांडल्या आहेत.
— तुषार भामरे
Leave a Reply