ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल, स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही तमा न बाळगता शांतपणे इकडे तिकडे नजर न टाकता, रस्ता ओलांडत होता. दररोज पेपरमध्ये अनेक अपघतांच्या बातम्या वाचण्यात येतात. अशाच बेफिकीर वृतीमुळे व वाहन चालकाच्या नजर चुकामुळे त्याक्षणाला काहीही होण्याची शक्यता असते. काळजी अर्थात दोघानीही घ्यावयाची असते. क्षणार्धात अनेक विचारांचे काहूर मनांत येऊन गेले. मला भासणाऱ्या त्या मूर्ख माणसाला चांगलीच हडसून खडसून समज द्यावी, झापावे, हा विचार आला. एकदम मी ब्रेक दाबून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. अगदी मुठ वळून त्या माणसाच्या पाठीमागे घावलो. प्रथम त्याला ग्राम्य भाषेत एक शिवी हासडली. ” ये साले तुमको क्या मरना है हायवेपर. शरम नही आती, इस बेफिकीर ढंगसे रस्ता क्रॉस करते हो.” मी त्याचा जवळ धाऊन गेलो. त्याला एक लाफा देण्याच्याच पोज मध्ये होतो. माझा आवाज एकूण ऐकून तो थांबला. त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळविली. मला एकदम धक्का बसला. तो माणूस नेत्रहीन होता. क्षणात माझा राग पूर्ण विरघळून गेला. आपल्याच विक्षिप्त विचारांची लाज वाटू लागली.
प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन असला, द्रीष्टीहीन असला तरी मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली.
” हे काय आहे?” हे तो विचारत असतानाच मी त्याचा द्रीष्टीहीनतेचा फायदा उठवत हळूच माघारी फिरलो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply