नवीन लेखन...

पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न ?

पाकिस्तानवरील विजयाचे स्मरण देणारा ‘कारगिल विजयदिन’ भारतात साजरा व्हावा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यात दीनानगर येथे दहशतवाद्यांनी १२ तास धुमाकूळ घालावा, हा नियोजित हल्ला आहे. गेले काही दिवस ‘बब्बर खालसा’ ही दहशतवादी संघटना हालचाली करीत होती. गुरुदासपूर हा डावीकडे पाकिस्तानची सीमा तर डोक्यावर काश्मीरची देशांतर्गत सीमा असा भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील जिल्हा आहे. सीमा ओलांडून काश्मीरमध्ये घुसणारे दहशतवादी इतर राज्यांमध्येही कसे घुसू शकतात, याचा इशारा या हल्ल्याने नव्याने दिला आहे. अमरनाथ यात्रेला लक्ष्य करणे फ़ार कठिण असल्यामुळे त्यांनी गुरुदासपूरमध्ये हल्ला केला असावा.

पंजाबातील गुरुदासपूर, होशियारपूर आदी ठिकाणांची नावे जरी ऐकली तरी ऐंशीच्या दशकातील दहशतवादाच्या आठवणी जाग्या होतात. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा गुरुदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त येताच अनेकांना खालिस्तान दिवसांची आठवण आली.

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचे प्रकार आपल्या देशात काही डझनांनी घडले असतील. त्यांनी खासगी मोटारचालकावर गोळीबार केला, प्रवासी बसवर हल्ला केला आणि ते पोलीस स्थानकात हल्ल्यासाठी पोहचले. दहदशवाद्यांनी ठाण्‍यात घुसताच पोलिस कर्मचारी रामलाल आणि एसएचओ मुख्त्यार सिंह यांनाही दहशवाद्यांनी गोळ्या मारल्या. नंतर पोलिस ठाण्‍याच्‍या मागे असलेल्‍या होमगार्ड कक्षात दहशतवादी पोहोचले आणि 3 होमगार्डंना त्‍यांनी मारून टाकले. याच ठिकाणी लपून त्‍यांनी सायंकाळपर्यंत फायरिंग केली.

गुरुदासपूर-अमृतसर रेल्वे मार्गावरही त्यांनी अनेक ठिकाणी सुरुंग पेरून रेल्वे उडविण्याची कारवाईही आखली होती. पोलीस व लष्करी जवानांनी इमारतीला वेढा घालून तीन अतिरेक्याना कंठस्नान घातले.

आर्मीला बसवून ठेवले
पोलिस दलामध्‍ये समन्‍वयाचा अभाव दिसून आला. एवढेच नाही तर घटनास्‍थळी आलेल्‍या आर्मीची मदत घेतली नाही. सकाळी 7 वाजता एसपी बलजीत सिंह यांच्‍या नेतृत्‍वात दहशवाद्यांच्‍या विरुद्ध ऑपरेशन सुरू झाले. सकाळी 8:15 वाजता पठाणकोटवरून आर्मी कमांडो आले. नंतर आणखी तुकडी बोलावण्‍यात आली. मात्र पोलिसांनी आर्मीची मदत घेतली नाही. आर्मीचे फर्स्ट पॅरा कमांडो बोलवण्‍यात आले होते. परिसर खाली केल्‍यानंतरच ते ही मोहीम संभाळू शकले असते. तसे झाले असते तर ते केवळ 2 ते 3 तासातच हे ऑपरेशन संपवू शकले असते. पण, चकमकीसाठी पोलिसांनी आर्मी अधिकार्‍यांना पाठवण्‍याऐवजी पोलिस आणि अमृतसरवरून आलेल्‍या स्पेशल काउंटर सेलच्‍या टीमला पाठवले. त्‍यामुळेच हे ऑपरेशन तब्‍बल 12 तास चालले. दुपारी 12 वाजेपर्यंत डीजीपी सुमेध सिंह सैनी घटनास्‍थळी दाखल झाले. त्यांना यश आपल्या नावावर करायचे होते. त्यामुळे आर्मीचा वापर करण्यात आला नाही.

दहशतवादी हल्ला बीएसएफ, पंजाब पोलीस गुप्तचर यंत्रणांचे अपयशच
दीनानगरमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी पंजाब बरोबरील पाकिस्तानी सीमेतुन भारतामध्ये घुसण्यामध्ये यशस्वी झाले. या सीमारेषेवर सीमा सुरक्षा दलाचा बंदोबस्त असतो. हे नक्कीच सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मोठे अपयश आहे.

कोणताही दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणांचे अपयशच असतो. त्यामुळे पुन्हा वेगळे आरोप करण्यासारखे काहीही नसते. त्यात अनेक वेळा गुप्तचर यंत्रणांना सुगावा लागून दहशतवादी हल्ल्याचा कट वेळीच उधळून लावला तर काही अती हुशार त्याबाबत संशय व्यक्त करतात. हा कसा बनाव आहे, अशी टीका करतात. आणि असे हल्ले जेव्हा वेळीच रोखता येत नाहीत तेव्हा गुप्तचरांच्या अपयशावर झोड उठवतात.

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या वेळीही आम्ही राज्य सरकारला सावध केले होते, अतिरेकी हल्ला झाल्यानंतरही चार राज्यांना अतिरेक्यांचा धोका आहे, हे अगोदरच सांगितले होते, असे सांगून गुप्तचर यंत्रणेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. प्रत्येक घटनेनंतर ‘हाय अँलर्ट’ चा इशारा दिल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात घटना नेमकी कोठे आणि कधी घडणार हे त्यांना सांगता येत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे.

वाहीन्या हल्याचे प्रत्यक्ष प्रक्षेपण दाखवित होत्या
अतिरेक्यांना अमरनाथ यात्रेलाच लक्ष्य करायचे असावे. दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अनेक वृत्तवाहिन्यांनी दहशतवादी मोठ्या प्रमाणात फायरिंग करत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे अर्थातच पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारांमुळे सामान्य माणसांच्या मनामध्ये अकारण दहशत निर्माण होत असते. अनेक वाहीन्या हल्याचे प्रत्यक्ष प्रक्षेपण दाखवित होत्या. २६-११ च्या हल्ल्याच्या वेळीही वाहिन्यांच्या या आततायीपणाची आणि बेजबाबदारपणाची प्रचिती आली होती.

या हल्ल्याची पूर्वसूचना केंद्र सरकारला मिळाली होती. मात्र केंद्र व पंजाब सरकार यांच्यातील दळणवळणाच्या अपुरेपणामुळे वा गलथानपणामुळे ही माहिती गुरुदासपूर व दीनानगरपर्यंत पोहोचली नव्हती. खेदाची बाब ही की लोकसभा वारंवार बंद पाडायच्या ऐवजी असे हल्ले कसे टाळता येतील यावर चर्चा व्हायला हवी.

खलिस्तानी शक्ती पुन्हा सक्रिय ?
उघड युद्ध करण्याची पाकिस्तानची धमकच नाही. त्यामुळे ‘प्रॉक्सी वॉर’ खेळले जात आहे.

खालिस्तानी चळवळीचे कंबरडे मोडण्यात आपल्याला यश आल्यानंतर गेल्या २० वर्षांमध्ये या राज्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली होती. त्यामुळेच काही वर्षांपासून आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तहेर संस्था पंजबमध्ये पुन्हा दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पंजाबमधील काही दहशतवादी गट खलिस्तान कमांडो फोर्स किंवा खलिस्तानी लिबरेशन आर्मी या भारतविरोधी शक्तींना आयएसआय पुन्हा प्रोत्साहन देऊन, त्यांना बळ देऊन, त्यांचे पुनरुज्जीवन करून भारतात आणि खास करून पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

पंजाबचे मुख्‍यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पाकिस्तानचे हाय कमिशनर अब्दुल बासित यांच्‍यासोबत मीटिंग आयोजित केली होती. पण, या हल्‍ल्‍यामुळे त्‍यांनी ती रद्द केली. अमरनाथ यात्रेला लक्ष्य करणे फ़ार कठिण असल्यामुळे त्यांनी गुरुदासपूरमध्ये हल्ला केला असावा. पंजाबमधील खलिस्तानी शक्ती पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी अमृतसरमध्ये निर्माण झालेला तणाव आणि इंदिरा गांधींच्या मारेकर्‍यांना शहीद ठरविण्याचा झालेला प्रयत्न झाला. मुख्य मंत्री बादल यांच्या सभेत अनेक वेळा खालीस्तानी झींदाबाद अशा घोषणा अनेक वेळा देण्यात आल्या पण त्यांच्या विरुध्द मतपेटीच्या राजकारणामुळे त्यांच्या विरुध्द काहीच कारवाई करण्यात आली नाही. उग्रवादाचा सामना लगेच केला पाहिजे.

पंजाब पोलीस प्रशिक्षण
पोलीस जेवढी दक्षता घेतात, त्यातले कच्चे दुवे शोधून दहशतवादी टोळय़ा त्यावर मात करणारे डावपेच शोधतात. काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये जगतारसिंग तारा या शीख दहशतवाद्याला पकडण्यात आले. गुप्तहेर संघटनांकडून झालेल्या चौकशीमध्ये त्याने शीख दहशतवाद्यांसाठी थायलंडमध्ये एक लष्करी प्रशिक्षण केंद्र आयएसआयकडून चालवले जात असल्याचे म्हटले होते, तसेच जम्मू आणि काश्मीरमधील ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘बब्बर खालसा’, ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’, ‘दल खालसा’ या सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘आयएसआय’कडून केला जात आहे.

पंजाब पोलिसांनी १९८० ते ९० च्या दशकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दहशतवाद्यांचा मुकाबला केला होता. त्यांनंतरच्या शांतता प्रस्थापित झालेल्या काळात त्यांना पुरेसे प्रशिक्षण झालेले नाही. त्यामुळेच पंजाब पोलिस दलाचे अधिकारी आणि कॉन्स्टेबल मारले गेलेले आहेत. इथे पोलिस कुठलीही हेल्मेट किंवा बुलेटप्रूफ जॅकेटशिवायच दहशतवाद्यांशी लढताना दिसत होते आणि काही छायाचित्रांमध्ये बघ्यांची गर्दी दिसत होती. मला खात्री आहे की यापासून धडा शिकून पंजाब पोलीस पुन्हा आपल्या प्रशिक्षणाचा दर्जा सुधारतील आणि ९० च्या दशकाप्रमाणे अतिरेक्यांशी लढण्याचे सामर्थ्य आणि कौशल्य आत्मसात करतील.

प्रत्येकानेच सावध राहायला हवे
जेव्हा सगळा देश दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न दहशतवादी करतात तेव्हा केवळ पोलीस, केवळ लष्कर त्याचा प्रतिकार करू शकेल, अशा भ्रमात नागरिकांनी राहू नये. अनेक ठिकाणी असे दिसून आले आहे की, स्थानिक नागरिकही या दहशतवाद्यांना आतून सामील असतात.

महाराष्ट्रात नाशिकला कुंभमेळा सुरू आहे. सिंहस्थ पर्वणीनिमित्त देशभरातून लाखो भाविक नाशिक, त्र्यंबकेश्‍वरला त्याचबरोबर शिर्डीला येण्याची शक्यता आहे. लाखोंच्या गर्दीत केवळ पोलीस यंत्रणांवरच अवलंबून न राहता प्रत्येकाने सावध राहायला हवे. नागरिकांचे लाखो डोळे जास्त सजग राहिले, तर कोणतीही दुर्घटना, घातपात टाळू शकतात. पंजाबमध्ये गुरुदासपूर घटनेच्या वेळीच रेल्वे रुळावर पेरून ठेवलेले पाच जिवंत बाँब ताब्यात घेण्यात यश एका देशभक्त नागरिकामुळे मिळाले. गर्दीच्या ठिकाणांवर सर्वांनी डोळ्य़ांत तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्याचा संबंध याकूबच्या फाशीशी काही आहे का? तो असु शकेल. फाशीची जाहिरात न करता सूर्य उगवण्यापूर्वी फाशीचा कार्यक्रम आटोपायला हवा होता. देशातलीच काही अतिशहाणी मंडळी कुख्यात दहशतवाद्यांना फाशी देऊ नका, अशी मागणी करायला पुढे येतात. या अतिशहाण्या मंडळींना जागेवर आणण्याची गरज आहे. त्यांचा बुद्धिवाद आणि त्यांचा तर्कवाद याची या देशाला गरज नाही. देशाच्या सुरक्षेचा बुद्धिभेद करणार्‍या या अतिशहाण्या मंडळींचा हातभार या दहशतवाद्यांना मिळत आहे. ही गंभीर गोष्ट आहे. म्हणून या अतिशहाण्या बुद्धिवाद्यांना ‘गप्प बसा नाही तर लोक तुम्हाला गप्प बसवतील,’ हे स्पष्ट सांगण्याची वेळ आलेली आहे.

अंतर्गत सुरक्षेबाबत अतिशय सतर्क राहण्याची गरज
दहशतवाद्यांशी चालणारी ही लढाई यापुढेही अनेक वर्षे चालणार आहे आणि ती येत्या काही काळात अधिक रक्तरंजित होऊ शकते. ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेने आपल्या इरादापत्रावर काश्मीरचे नाव ठळक अक्षरात लिहिले आहे. श्रीनगरमध्येही ‘इस्लामिक स्टेट’ चे झेंडे फडकले. काश्मीरचा कब्जा करण्याची इच्छा असणाऱ्या दहशती शक्तींमध्ये उद्या संघर्ष सुरू झाला तर त्यातून अनेक हल्ले सोसावे लागू शकतात. सर्व राज्यांची पोलिसदले वेगाने सुसज्ज, प्रशिक्षित व चपळ करायला हवीत, हा धडा नव्याने मिळतो आहे. भारताने यापुढील काळात सीमेवरील सुरक्षेबाबत अंतर्गत सुरक्षेबाबत अतिशय सजग आणि सतर्क राहण्याची गरज आहे.

एकूणच, अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेणे, तालिबानचे पुनरुज्जीवन, इस्लामिक स्टेटचा वाढता विस्तार, दक्षिण आशियातील इतर दहशतवादी संघटनांची त्यांच्याशी असणारी बांधिलकी या सर्व गोष्टी आपल्यापुढील आव्हाने वाढवणार्‍या आहेत. त्यामुळेच तसेच आता आपण ‘नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर’ (राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्र) लवकरात लवकर कार्यान्वित करणे आवश्यक आहे. एक राष्ट्र म्हणून भारतीय या प्रदीर्घ लढ्याची तयारी कशी करतात, यावरच या दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन अवलंबून आहे.

पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा फाडा
दहशतवादाचे माहेरघर असलेल्या पाकिस्तानला चीन आणि अमेरिकेकडून शस्त्रांची होणारी मदत थांबवण्यासाठी आता भारताने अधिक ठामपणाने आणि जोरकसपणे आवाज उठवणे गरजेचे आहे. या हल्ल्याचा वापर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर करून अमेरिका आणि इतर राष्ट्रांवर दबाब आणून पाकिस्तानला लक्ष्य केले पाहिजे आणि पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा फाडला पाहिजे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..