पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.
त्या दिवशी दुपारचे साडेतीन झाले असतील, नुकतच सर्वांचा चहा झाला होता, अचानक दरवाजा उघडून हाल एक कर्मचारी आत आला, कापऱ्या पण सर्वाना ऐकू येईल अश्या आवाजात म्हणाला, पंतप्रधान इकडेच येत आहेत. मी चमकलोच, गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्य करतो आहे, या आधी पंतप्रधान तर सोडा कुणा वरिष्ठतम अधिकार्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिन मध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो. सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करणे सुरु गेले. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचारीच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच होते, पहिलेच केबिन असल्या मुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली. कामाबाबत जुजबी माहिती विचारली. प्रत्येक केबिन समोर उभे राहून त्यांनी कर्मचार्यांची विचारपूस केली. सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिन मध्ये बसणाऱ्या स्टाफ ची विचारपूस केली. त्यांची दृष्टी अलमारीवर ठेवलेल्या ७-८ चहाच्या रिकामच्या कपांवर ही गेली. त्यांनी मिस्कीलपणे, विचारले बहुत चाय पितो हो आप लोग. स्टाफ मधल्या एका कर्मचार्याने उत्तर दिले, सर, सारे कप हमारे नाही है और लोग भी यहाँ अपने खाली कप यहाँ रख देते है. पंतप्रधान हसले आणि म्हणाले दोस्तों, आपने अकबर बीरबल की कहानी सुनी है. आम्ही सर्व टक लाऊन त्यांच्या कडे बघू लागलो, पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.
त्यांनी अकबर बीरबलची कहाणी सांगायला सुरवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत)
एकदा अकबर बादशाह, बीरबलच्या घरी गेले, पाहतात काय, बीरबल आपल्या बेगम बरोबर एका मंचकावर बसून आंबे खात होता. आत येताच अकबर बादशाहचे लक्ष आंबे खाऊन जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेले. अकबर बादशाहने मनात विचार केला बीरबल स्वत:ला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे कि बादशाह ही किती बुद्धिमान आहे. अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या. अकबर बादशाह म्हणाला, बीरबल मी सांगू शकतो, माझ्या इथे येण्या अगोदर तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत ते. अकबर बादशाहने मोजलेल्या कोयींच्या आधारावर खालेल्या आंब्यांची संख्या सांगितली. आपणास सर्वांना माहित आहे. बीरबल हा अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे, बीरबलने सहज ओळखले. तो मिस्कीलपणे म्हणाला, जहाँपनाह, आपण चुकत आहात, या खाली टाकलेल्या कोयी, मी खालेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयीं समेत आंबे खाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले, आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय कळला. आम्ही ही मुक्तपणे हसलो. (कहाणीचा अर्थ मला जो अर्थ कळला- बीरबलले आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनविले असेल, पण मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, उगाच दुसर्यांचे नाव कशाला घेता हा सर्व चहा, तुम्हीच गटकला आहे).
पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अश्यारितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.
— विवेक पटाईत
Leave a Reply