शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. पक्षाघातामुळे स्नायू लुळे व दुबळे होतात. अशा स्थितीत जर संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात.
पक्षाघात पक्षाघाताच्या इतर कारणांमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे (स्ट्रोक), डोक्याला किंवा पाठीला मार बसून चेतांना किंवा मेरुरज्जूला इजा पोहोचणे, पोलो, बोटुलिन या जीवविषाचा परिणाम, चेतातंतू आवरणदाह इत्यादींचा समावेश होतो. चेतापेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते. काही कारणाने उदा., मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीतील गाठ अवरोधामुळे रक्तपुरवठा थांबला तर चेतापेशींचे कार्य थांबते. अशा चेतापेशी ज्या अवयवाचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि पक्षाघात होतो. काही वेळा अचानक रक्तदाब वाढल्यास मेंदूमधील धमनी फुटून मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो. या रक्तस्रावामुळे चेतापेशींवरील दाब वाढून पक्षाघात होतो. मस्तिष्कस्तंभामध्ये (मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागामध्ये) रक्तस्राव झाल्यास पक्षाघाताबरोबर मृत्यूही ओढवतो.
पक्षाघात एखाद्या विशिष्ट भागापुरता (स्थानिक) किंवा सार्वदेहिक असू शकतो. शरीराच्या ज्या भागावर परिणाम घडतो त्यानुसार पक्षाघाताचे वर्णन करता येते. उदा., एका बाजूचा हात आणि त्याच बाजूचा पाय लुळा पडणे (अर्धपक्षाघात), कमरेखालील भाग व दोन्ही पाय लुळे पडणे (अधरपक्षाघात), दोन्ही हात व पाय लुळे पडणे (चतुरांगघात).
पक्षाघाताचे सामान्यपणे सौम्य आणि तीव्र असे दोन प्रकार करता येतात. सौम्य पक्षाघात बहुतेक वेळा रेम झोपेच्या कालखंडामध्ये होतो (पहा: झोप). अंथरुणातून उठताना चालणे, बोलणे किंवा डोळे न उघडता येणे, चेहरा निश्चल होणे, डाव्या किंवा उजव्या बाजूच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होणे, ओठ खाली पडणे, हातातून वस्तू खाली पडणे, चप्पल घातल्यानंतर ती नकळत पायातून निसटणे ही सौम्य पक्षाघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. वेळीच उपचार झाल्यास सौम्य पक्षाघात बरा होतो.
अतिधूम्रपानामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. तसेच रक्तदाबाची औषधे नियमित न घेतल्यास किंवा उच्च रक्तदाब नियंत्रणाखाली न ठेवल्यास मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. मेंदूमध्ये रक्तस्रावाचे निदान चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा (एमआरआय) तंत्राने करता येते. निदानानंतर लागलीच शस्त्रक्रिया करून मेंदूमधील रक्ताची गुठळी काढली तरी मेंदूच्या ज्या भागात गुठळी झाली होती तो भाग पूर्ववत कार्यरत होणे कठीण असते. शरीराचा डावा किंवा उजवा भाग पक्षाघाताने लुळा पडल्यास संवेदी चेतापेशींच्या कार्यामध्ये फारसा अडथळा येत नाही. भौतिक चिकित्सा उपचारांनी काही प्रमाणात अशा अवयवांची हालचाल पुन्हा होऊ शकते. घसा आणि ग्रसनी यांचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागाला पक्षाघात झाल्यास बोलणे आणि गिळणे या क्रियांवर परिणाम होतो.
मेंदूमध्ये वाढलेली गाठ लगतच्या निरोगी पेशीवरील दाब वाढवते. त्यामुळे निरोगी पेशी निकामी होतात आणि पेशीनियमन करणाऱ्या भागाचा पक्षाघात होतो. पोलिओसारख्या विकारामध्ये चेतांच्या संदेशवहन क्षमतेमध्ये बिघाड होऊन स्नायू दुर्बल होतात. हा सुद्धा पक्षाघाताचा प्रकार आहे. पक्षाघात झाल्यानंतर त्वरित उपचार केल्यास काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता वाढते. ज्या चेतापेशी मृत होतात त्यांच्याजवळील चेतापेशींच्या वृक्षिका मृत चेतापेशींची जागा घेऊन अवयवांचे नियंत्रण करतात. मर्यादित प्रमाणात अवयवांची हालचाल, बोटांची हालचाल किंवा हातापायांचा उपयोग करता आल्यास पक्षाघात झालेल्या रुग्णाचे जीवन परावलंबी होत नाही.
प्राणिमात्रांमधील पक्षाघात काही प्राण्यांच्या जाती भक्ष्य पकडण्यासाठी त्या भक्ष्यामध्ये परिणाम घडून येईल अशा जीवविषाचा वापर करतात. काही प्राणी अशा तंत्राचा वापर शिकारी प्राण्यापासून सुटका करून घेण्यासाठीही करतात. गांधीलमाशीच्या काही जाती प्रजनन चक्र पूर्ण करताना तिची मादी नाकतोडयासारख्या भक्ष्याला दंश करून पक्षाघात घडवून आणते आणि त्याला घरट्यात आणून ठेवते. त्यानंतर ती या नाकतोडयाच्या शरीरात अंडी घालते. अंडयातून बाहेर पडलेले डिंभ त्या नाकतोडयावर जगतात.
जपानमध्ये आढळणारे फुगू हे विषारी मासे आहेत. या माशांमध्ये टेट्रोडोटॉक्सिन हे चेतासंस्थेवर परिणाम करणारे जीवविष असते. हे मासे ज्यांना दंश करतात त्यांच्या चेतापेशींमधील सोडियम आयनांच्या कार्यात बिघाड निर्माण करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
Leave a Reply